विजेच्या धक्क्याने लाईनमनचा मृत्यू
गडचिरोली, Bharat Live News Media वृत्तसेवा : येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या डीपीवर वीज दुरुस्तीचे काम करीत असताना अचानक विजेचा धक्का लागल्याने महावितरण कर्मचाऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि.४) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. जितेंद्र वसंतराव गज्जलवार (३५) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.
चामोर्शी मार्गावरील जिल्हा परिषद हायस्कूलजवळच्या डीपीवर आज (दि.४) सकाळी जितेंद्र गज्जलवार यांच्यासह महावितरणचे अन्य दोन कर्मचारी वीज दुरुस्तीसाठी आले होते. दोन कर्मचारी खाली होते, तर जितेंद्र गज्जलवार हे डीपीवर चढून दुरुस्ती करीत होते. एवढ्यात अचानक वीज प्रवाह सुरु झाल्याने त्यांना जोरदार धक्का लागला. ते खाली पडल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर नागरिकांनी एकच गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. जितेंद्र गज्जलवार हे चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील बोदली(हिरापूर) येथील मूळ रहिवासी असून, त्यांना पत्नी व लहान मुलगा आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वीज पुरवठा बंद असताना अचानक तो कोणी आणि कोणाच्या आदेशावरुन सुरु केला, याविषयी चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
Latest Marathi News विजेच्या धक्क्याने लाईनमनचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.