कुलगुरूंनी ठोस भूमिका घेऊन कारवाई करावी : प्राध्यापकांची मागणी
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या आवारात शुक्रवारी अंतर्गत परीक्षा सुरू होती. यात कोकणातील दशावतारी नाटकास अनुसरून विद्यार्थ्यांच्या नाटकाचा प्रयोग सुरू होता. नाटक पूर्ण होण्याआधीच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी कलाकारांवर हल्ला केला आणि विभागप्रमुखांशी बोलताना अर्वाच्य भाषा वापरली. हे कृत्य विद्यापीठाच्या शैक्षणिक स्वायत्ततेवर घाला घालणारे असून, यासंदर्भात कुलगुरूंनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी विद्यापीठातील प्राध्यापकांनी केली आहे.
प्राध्यापकांनी दिलेल्या निवेदनानुसार, विद्यार्थी सादर करीत असलेले नाटक प्रहसन प्रकारात मोडते. त्यातील संदेश हा कोणालाही दुखावणारा नव्हता. या घटनेनंतर हल्ला करणार्या समाजविघातक घटकांवर कारवाई होण्याऐवजी त्यांनीच केलेल्या खोट्या तक्रारींच्या आधारे विद्यार्थ्यांना व विभागप्रमुखांना अटक करण्यात आली. ही घटना विद्यापीठाच्या शैक्षणिक स्वायत्ततेवर घाला घालणारी होती. आम्ही या अटकेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करतो.
अशा घटनांमुळे विद्यापीठातील प्राध्यापक व विद्यार्थी, यांमध्ये भीतीचे दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. अशा वातावरणामध्ये अध्यापन आणि संशोधन करणे कठीण झाले आहे. अभिव्यक्ती व विचारस्वातंत्र्य हे विद्यार्थ्यांच्या, शैक्षणिक संस्थेच्या आणि राष्ट्रविकासासाठी अत्यावश्यक आहे. या स्वातंत्र्यावर विद्यापीठ परिसरात हिंसेचा वापर करून आक्रमण केले जात आहे. ही बाब विद्यापीठातील सर्व घटकांच्या हितास गंभीर बाधा पोहचविणारी आहे.
आम्ही सर्व प्राध्यापक कुलगुरूंना विनंती करतो की, ललित कला केंद्राचे विद्यार्थी व विभागप्रमुख यांच्यावर हेतुःपुरस्सर दाखल केलेल्या पोलिस तक्रारीविरोधात विद्यापीठाने अधिकृत भूमिका घ्यावी व त्यांच्यावरील केसेस काढून टाकण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. विद्यार्थी-प्राध्यापकांच्या न्यायिक प्रक्रियेची संपूर्ण प्रशासकीय आणि आर्थिक जबाबदारी विद्यापीठाने घ्यावी. प्रा. प्रवीण भोळे यांच्या सेवापुस्तिकेवर संबंधित प्रकरणाची कोणतीही नोंद केली जाऊ नये.
ज्या समाजविघातक घटकांनी विद्यापीठ परिसरात हिंसाचार केला आणि शैक्षणिक मूल्यमापनात बाधा आणली, त्यांच्यावर विद्यापीठाने कायदेशीर कारवाई करण्यासाठी तातडीने पुढाकार घ्यावा. यांसारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कुलगुरूंनी खबरदारी घेऊन ठोस पावले उचलावीत आणि विद्यापीठातील सर्व घटकांची सुरक्षा अबाधित राहील, याची दक्षता घ्यावी. आमच्या या निवेदनाचा सकारात्मक विचार करून आपण योग्य ती कारवाई करावी. त्यानुसार कृती घडली नाही, तर प्राध्यापकांना संवैधानिक पद्धतीने असंतोष व्यक्त करावा लागेल, असे देखील निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा
नंदुरबार : जप्त केलेला वाळूचा ट्रक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातूनच चोरीला गेला
Pune News : ट्रेलर उलटल्याने विद्यापीठ चौकात प्रचंड वाहतूक कोंडी
नोझलमध्ये हेराफेरी : वैधमापनच्या संगनमताने इंधन चोरी!
Latest Marathi News कुलगुरूंनी ठोस भूमिका घेऊन कारवाई करावी : प्राध्यापकांची मागणी Brought to You By : Bharat Live News Media.