तरूणाई : ‘परीक्षा पे चर्चा’ चिंतन आणि चिंता

शालेय शिक्षणाच्या प्रक्रियेत महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या दहावीच्या परीक्षांचे विद्यार्थ्यांच्या मनावरील दडपण हा अलीकडील काळात चिंतेचा विषय बनला आहे. यावरील चर्चेमध्ये पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानाच पालकांची कानउघाडणी केल्याचे दिसून आले. विशेषतः, मुलांचा वाढता स्क्रीनटाईम याबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केलेली चिंता अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे शरीरावर, आरोग्यावर, अभ्यासावर, बुद्धिमत्तेवर होणार्‍या नकारात्मक परिणामांविषयी जाणून घेणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र … The post तरूणाई : ‘परीक्षा पे चर्चा’ चिंतन आणि चिंता appeared first on पुढारी.

तरूणाई : ‘परीक्षा पे चर्चा’ चिंतन आणि चिंता

संदीप वाकचौरे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

शालेय शिक्षणाच्या प्रक्रियेत महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या दहावीच्या परीक्षांचे विद्यार्थ्यांच्या मनावरील दडपण हा अलीकडील काळात चिंतेचा विषय बनला आहे. यावरील चर्चेमध्ये पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानाच पालकांची कानउघाडणी केल्याचे दिसून आले. विशेषतः, मुलांचा वाढता स्क्रीनटाईम याबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केलेली चिंता अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे शरीरावर, आरोग्यावर, अभ्यासावर, बुद्धिमत्तेवर होणार्‍या नकारात्मक परिणामांविषयी जाणून घेणे गरजेचे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षांपूर्वी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा, चर्चा करण्याचा आणि त्यांना उपयुक्त ठरतील अशाप्रकारचे कानमंत्र देण्याचा एक नवा प्रवाह अलीकडील काळात सुरू केला आहे. यासाठी गेल्या सात वर्षांपासून ‘परीक्षा पे चर्चा’ हा उपक्रम राबवला जात आहे. त्यांतर्गत पंतप्रधान स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना करिअरच्या वाटेवर महत्त्वाच्या असणार्‍या या परीक्षेमधील यशासाठी तसेच एकंदरीतच अभ्यासाच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करतात. यंदाच्या वर्षी या उपक्रमांतर्गत बोलताना पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना काही कानमंत्र देतानाच त्यांची व पालकांची कानउघाडणीही केल्याचे दिसून आले.
पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण घेण्याऐवजी त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा मौलिक सल्ला दिला आहे. त्याचबरोबर सध्या संगणक आणि मोबाईलच्या काळात आपण लिहिणं विसरत चाललो आहोत, याकडे त्यांनी लक्ष वेधत फक्त परीक्षेचीच उत्तरं नाही, तर त्याआधीही लिखाणाची सवय ठेवण्याची गरज स्पष्ट केली. एकदा लिहिणे म्हणजे दोनदा वाचणे असते. त्यामुळे लेखनामुळे लक्षात राहण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते. हे लक्षात घेऊन पंतप्रधानांनी लेखन सरावावर भर देण्याचा आग्रह धरला.
यंदाच्या चर्चेमध्ये पंतप्रधानांचा अधिक भर पालकांच्या मार्गदर्शनावर राहिला. यामध्ये मुलांना मिळणार्‍या मार्कांवरून त्यांची तुलना करणे टाळण्याचा सल्ला त्यांनी दिला. कारण, त्यामुळे मुलांवरचा अभ्यासाचा ताण वाढतो. तसेच मुलांनी ज्या अडचणी येतात त्या आई-वडील आणि शिक्षकांशी बोलल्या पाहिजेत. परीक्षेचा फार विचार न करता योग्य पद्धतीने तयारी केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. ही बाब सध्याच्या काळात खूप महत्त्वाची आहे. पालकच नव्हे, तर अनेकदा शिक्षकही विद्यार्थ्यांना ताण देतात. हे लक्षात घेऊन त्यांनाही मार्गदर्शन केले आहे. तुलना करायचीच असेल, तर स्वतःशी करा. एखाद्याला 100 पैकी 90 गुण मिळत असतील, तर आपण मेहनत जास्त केली पाहिजे किंवा आपण गुण वाढवण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे, हा त्यांनी मांडलेला मुद्दा महत्त्वाचा आहे.
असे असले तरी पंतप्रधानांनी मांडलेला एक मुद्दा सर्वात महत्त्वाचा असून, तो आजच्या काळात वाढत चाललेल्या स्क्रीनटाईमचा. नवतंत्रज्ञानाच्या होणार्‍या नकारात्मक परिणामांबद्दल चिंता व्यक्त करत पंतप्रधानांनी पालकांचे कान टोचले आहेत. एकीकडे माहिती-तंत्रज्ञानाचे जग उभे राहते आहे. विद्यार्थ्यांच्या हाती मुबलक प्रमाणात मोबाईल आणि तत्सम साधने दिसू लागली आहेत. नवतंत्रज्ञानाच्या उपयोजनात शालेय विद्यार्थी आघाडी घेत आहेत. मात्र, त्या तंत्रज्ञानाचा विकास आणि शैक्षणिक प्रगतीसाठी लाभ उठवण्याची गरज असताना त्याचे अधिकाधिक दुष्परिणामच समोर येत आहेत. आपली तरुणाई जागेपणातील अधिक वेळ स्क्रीनटाईमवर खर्च करते आहे. त्यामुळे पालकांनी आपापल्या घरात ‘नो गॅजेट झोन’ तयार करण्याबरोबर किमान जेवताना तरी मोबाईलपासून दूर राहण्याची गरज असल्याचा कानमंत्र पंतप्रधानांनी दिला आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ करताना त्यांनी मोबाईलसंदर्भातील धोके आणि करावयाच्या उपाययोजनांचा गंभीरपणे विचार करत अंमलात आणण्याची गरज आहे; अन्यथा उद्याच्या प्रकाशातही तरुणाईला अंधारात चाचपडताना पाहावे लागेल.
वर्तमानात शिक्षणाची गुणवत्ता ढासळताना दिसत आहे. तणाव सहन करण्याची क्षमता हरवत चालल्याने तरुणाई आत्महत्येची वाट चालत आहे. अधिकाधिक हिंसेच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. ताणतणावामुळे विद्यार्थी अनेक विकारांना सामोरे जात आहेत. याबरोबरच अधिकाधिक वेळ विद्यार्थी समाजमाध्यमांवर गुंतलेले दिसताहेत. त्यामुळे स्क्रीनटाईमपासून सावध राहण्याचा इशारा जगभरात विविध संस्था आणि तज्ज्ञ देत आहेत. आज अनेक विद्यार्थी मोबाईल वापरत आहेत. त्यांचे वापरण्याचे प्रमाण तासन्तास आहे. झोपेचा वेळ रील्स पाहण्यासाठी वापरला जात आहे. त्यामुळे आरोग्यासाठी आवश्यक असणार्‍या शांत व पुरेशा झोपेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. याबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केलेली काळजी अत्यंत रास्त आहे. पंतप्रधानांनी संवाद साधताना जो विचार प्रतिपादन केला आहे त्यामागे विद्यार्थी आणि पालक यांना आधुनिक काळातील या धोक्यांबाबत सजग करण्याचा विचार आहे.
जगात मोबाईल क्रांती झपाट्याने विस्तारत आहे. आंतरजाल आता सर्वदूर पोहोचत आहे. त्यामुळे जगभरात विद्यार्थिदशेतील मुले-मुलीच नव्हे, तर सर्वच जण स्क्रीनटाईमवर अधिकाधिक वेळ देत गुंतलेली दिसत आहेत. सद्यस्थितीत जगातील नागरिकांचा दिवसाचा सरासरी स्क्रीनटाईम हा सुमारे सहा तास अठ्ठावन मिनिटे इतका आहे. 2013 नंतरचा कालखंड विचारात घेतल्यास तो सरासरी पन्नास मिनिटांनी वाढलेला दिसतो आहे. भारतातील नागरिकांचा गेल्या एका वर्षात म्हणजे 2021 ते 2022 या काळात सुमारे 0.42 स्क्रीनटाईम वाढलेला आहे. भारतात सरासरी एकूण स्क्रीनटाईम साधारणत: 7 तास 18 मिनिटे इतका आहे. त्यापैकी 4 तास 5 मिनिटे हा स्क्रीनटाईम केवळ मोबाईलवर खर्च केला जात आहे. एकूण वेळेपैकी सुमारे 56 टक्के वेळ मोबाईलच्या स्क्रीनटाईमवर खर्च केला जात आहे.
3 तास 13 मिनिटे हा संगणक स्क्रीनटाईम आहे, म्हणजे सुमारे 44 टक्के वेळ संगणक स्क्रीनटाईम खर्च होतो आहे. हा वेळ कमी करण्याची गरज आता सर्वदूर व्यक्त होऊ लागली आहे.
भारतात नुकत्याच करण्यात आलेल्या ‘प्रथम’च्या सर्वेक्षणानुसार, देशातील 9 टक्के विद्यार्थ्यांकडे संगणक सुविधा उपलब्ध आहेत. 89 टक्के विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्टफोनची सुविधा उपलब्ध आहे. 92 टक्के विद्यार्थी स्मार्टफोनचा उपयोग करतात. 31 टक्के विद्यार्थ्यांकडे स्वतःसाठीचा स्मार्टफोन उपलब्ध आहे. ई-मेलचा उपयोग करणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण सुमारे 41 टक्के आहे. 90 टक्के विद्यार्थी समाजमाध्यमांचा उपयोग करतात.
52 टक्के विद्यार्थ्यांनी प्रोफाईल ब्लॉक केलेले आहे. तितक्याच प्रमाणातील विद्यार्थ्यांना स्वतःचा पासवर्ड बदल करता येतो. 78 टक्के विद्यार्थी स्मार्टफोनचा सिनेमा पाहणे आणि गाणी ऐकण्यासाठी उपयोग करतात. 57 टक्के विद्यार्थी स्मार्टफोनचा उपयोग गेम खेळण्यासाठी करतात. 45 ते 50 टक्के विद्यार्थी अभ्यासक्रमाशी संबंधित ध्वनिचित्रफिती पाहतात. त्याचप्रमाणे अभ्यासासंबंधी जे प्रश्न निर्माण होतात त्याची उत्तरे ऑनलाईनच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करतात. 17 टक्के विद्यार्थी स्मार्टफोनचा उपयोग करत फॉर्म भरतात. स्मार्टफोनद्वारे पेमेंट मोडचा उपयोग करतात. 7 टक्के विद्यार्थी बिल भरण्यासाठी स्मार्टफोनचा उपयोग करतात. 4 टक्के विद्यार्थी विविध प्रकारचे तिकीट बूक करण्यासाठी वापर करतात. 66 टक्के विद्यार्थी स्मार्टफोनवर अलार्म सेट करतात. 71 टक्के विद्यार्थी स्मार्टफोनच्या माध्यमातून योग्य माहिती शोधतात. 37 टक्के विद्यार्थी गुगल मॅपसाठी उपयोग करतात.
गेली काही वर्षे नवनवीन संशोधन पुढे येत आहे की, अधिकाधिक वेळ स्क्रीनटाईमवर खर्च होत असेल, तर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिकण्यावर होतो आहे. विशेषतः, यामुळे आकलन कमी होण्याबरोबर स्मरणशक्तीवरदेखील विपरीत परिणाम होत असल्याची बाब समोर येते आहे. आजची तरुणाई अधिकाधिक वेळ समाजमाध्यमांवर खर्च करत असल्याने भविष्यात गुणवत्तेचा आलेख कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षणासमोर नवे आव्हाने उभे राहणार आहे.
निकोलास कार या हॉर्वर्डचा माजी विद्यार्थी आणि स्तंभ लेखकाने म्हटले आहे की, दहा वर्षे सातत्याने मी आंतरजालचा उपयोग केला आहे. जेव्हा मी या काळात वाचत असायचो, तेव्हा वाचलेल्या मजकुरातील कठीण, जटिल, किचकट असलेला मजकूर वाचताना त्याचे आकलन होताना काहीसे कठीण जात होते. आंतरजालचा अधिकाधिक उपयोग केला जात असल्याने एकाग्रतेवर विपरीत परिणाम झाला होता. त्याचबरोबर स्मरणशक्तीवरदेखील परिणाम झाला होता. आताही तसे परिणाम समोर येत आहेत.
शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थी मोबाईलचा उपयोग करताहेत. तासन्तास विद्यार्थी मोबाईलवर ऑनलाईन आहेत. मोबाईलवरील खेळामुळे विद्यार्थ्यांचे मैदानाशी नातेदेखील तुटत चालले आहे. घरातही माणसांचा संवाद हरवला आहे. तो कमी करण्याबाबत पंतप्रधानांनी प्रतिपादन केल्याने त्याबाबत अधिक गंभीर विचार करायला हवा.
पंतप्रधानांनी जे सांगितले आहे तेच काही महिन्यांपूर्वी ‘युनोस्को’च्या ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्टमध्येदेखील नमूद करण्यात आले असून, जगाला त्यासंदर्भाने इशारा देण्यात आला होता. आता जगभरातच वाढत्या स्क्रीनटाईमची समस्या घर करू लागली आहे. ती समस्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकते, हेही लक्षात घ्यायला हवे. विद्यार्थ्यांच्या मानगुटीवर बसलेले स्क्रीनटाईमचे व समाजमाध्यमांच्या वापराबाबतचे भूत उतरवण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. कोरोनाच्या काळात मोबाईलशी नाते सांगणारी शिक्षणव्यवस्था अजूनही त्याच्याशी नाते कायम टिकवून आहे.
शाळांचे स्वाध्याय, उपक्रम अथवा पालकांना दिल्या जाणार्‍या सूचनादेखील मोबाईलच्या माध्यमातून जोडलेल्या समाजमाध्यम समूहावरच दिल्या जात आहेत. त्यावर प्रतिबंध करण्याची गरज आहे. शाळांच्या आवारात मोबाईल वापरण्याबाबत यापूर्वी राज्य सरकारने नियम करून सक्तीने प्रतिबंध केला होता, तो पुन्हा कायम करण्याची गरज आहे. शाळांची माहितीदेखील ऑनलाईनवर नोंदवण्यासंदर्भात रोज शिक्षकांना गुंतून ठेवण्याऐवजी आठवड्याचा एक वार निश्चित केला, तर बराच मोठा परिणाम साधला जाऊ शकतो. विद्यार्थी आज आभासी स्वरूपात संवादात गुंतले आहे त्यापासून तोडण्याची गरज आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात शाळा आणि शिक्षक यांचे नाते अधिक घट्ट करण्याची गरज आहे. ते नाते सैल होत असल्यानेच विद्यार्थी मोबाईलवर अधिकाधिक वेळ खर्च करत आहेत.
Latest Marathi News तरूणाई : ‘परीक्षा पे चर्चा’ चिंतन आणि चिंता Brought to You By : Bharat Live News Media.