रक्ताच्या कर्करोग रुग्णसंख्येत वाढ
राजेंद्र जोशी
कोल्हापूर : तुम्हाला सतत थकवा जाणवतो?, वजनाचे अनियंत्रित कमी होणे, ताप, थंडी वाजून येणे, वारंवार संसर्ग होणे, हाडे आणि सांधेदुखी शिवाय, असामान्य रक्तस्राव या समस्यांनी आपण त्रस्त आहात? मग आजार अंगावर काढू नका. तातडीने अनुभवी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण रक्ताच्या कर्करोगाची ही सर्वसाधारण लक्षणे आहेत. त्याचे वेळीच निदान झाले आणि उपचार सुरू झाले, तर एकेकाळी असाध्य वाटणारा हा रोगही संपूर्णपणे बरा होऊ शकतो, पण दुर्लक्ष केले, तर मात्र जीव जाण्याचा धोका आहे. (Blood Cancer)
अनुवंशिक पूर्वस्थिती, धूम्रपान, किरणोत्सर्ग, कर्करोगाला आमंत्रण देणार्या रसायनांच्या संपर्कात येणे आणि रोगप्रतिकारक प्रणालीचे विकार यामुळे जगभरात कर्करोगग्रस्त रुग्णांची संख्या वाढते आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीचा आधार घेतला, तर प्रतिवर्षी जगात 12 लाख 40 हजार रक्ताचे कर्करोगग्रस्त रुग्ण नव्याने आढळून येतात. एकूण कर्करोगग्रस्त रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण 6 टक्क्यांवर आहे आणि या रुग्णांपैकी सुमारे 7 लाख 20 हजार रुग्ण वेळीच निदान व उपचार न झाल्यामुळे आपला जीव गमावून बसतात. भारतामध्ये ही स्थिती आणखी गंभीर आहे. कर्करोगग्रस्त रुग्णांच्या यादीमध्ये भारत तिसर्या क्रमांकाचा देश म्हणून ओळखला जातो. भारतात प्रतिवर्षी नव्याने रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त रुग्णांची संख्या 1 लाख 38 हजारांवर आहे आणि ती एकूण कर्करोगग्रस्त रुग्णांच्या तुलनेत 8 टक्क्यावर आहे. (Blood Cancer)
या कर्करोगाचे प्रामुख्याने पाच प्रकार आढळतात. ल्युकेमिया, लिम्फोमा, मल्टिपल मायलोमा, मायलो डिस्प्लास्टिक सिंड्रोम (एमडीएस) आणि मायलो प्रोलिफेरेटिव्ह निओप्लाझम असे हे वर्गीकरण आहे. परंतु, यापैकी महाराष्ट्राच्या ग्रामीण सर्वेक्षणामध्ये रक्त आणि अस्थीमज्जांवर परिणाम करणारा ल्युकेमिया याचे प्रमाण 33.97 टक्क्यांवर असल्याचे आढळून आले आहे. ही संख्या कर्करोगाच्या निदानाची पहिली पायरी म्हणून ओळखली जाते. या रोगाला विशिष्ट असा वयोगट नाही. 0 ते 14 या वयोगटात मुलांमध्ये याचे प्रमाण 29.2 टक्क्यांवर, तर मुलींचे प्रमाण 24.2 टक्क्यांवर आढळते.
रक्ताच्या कर्करोगाचे योग्यवेळी निदान झाले, तर त्यासाठी अनेक उपचारपद्धती उपलब्ध आहेत. निदानासाठी सर्वसमावेशक चाचणी आणि मूल्यमापन यांचा समावेश होतो. यामध्ये रक्तचाचण्या, अस्थिमज्जा आकांक्षा, बायोप्सी, इमेजिंग अभ्यास आणि आण्विक प्रोफायलिंग यांचा समावेश असतो. या प्रक्रियेतून रक्ताच्या कर्करोगाचा टप्पा, प्रकार, अनुवंशिक वैशिष्ट्ये निश्चित करण्यासाठी रक्तशास्त्रज्ञांना मदत होते.
उपचार पद्धतीत केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, टार्गेट थेरपी, स्टेमसेल प्रत्यारोपणाचा उपयोग केला जातो. केमो आणि रेडिएशन थेरपीमध्ये कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करताना शेजारील पेशींनाही इजा होत असल्याने केवळ कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करणारी टार्गेट थेरपी विकसित झाली आहे. याखेरीज अलीकडे कार्ट-टीसेल थेरपी हा नवा उपचारही यशाची खात्री देणारा ठरतो आहे.
या उपचारपद्धतीत मानवी रक्तामध्ये कर्करोगाच्या पेशींशी लढून मृत झालेल्या पेशींना पुन्हा जिवंत करून लढण्यासाठी सज्ज करण्याचे काम केले जाते. अर्थात, त्यासाठी योग्यवेळी निदान आणि उपचार ही काळाची गरज आहे.
Latest Marathi News रक्ताच्या कर्करोग रुग्णसंख्येत वाढ Brought to You By : Bharat Live News Media.