वीर जवान संदीप मोहिते यांना अखेरचा निरोप
नांदगाव ; Bharat Live News Media वृत्तसेवा – अमर रहे.. अमर रहे.. वीर जवान संदीप मोहिते अमर रहे..या घोषात शनिवार दि. ३ रोजी सकाळी मांडवड तालुका नांदगाव येथे वीर जवान संदीप मोहिते यांना शासकीय इतमात हजारो नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला. संदीप मोहिते यांचे छोटे बंधू श्रीकांत मोहिते यांच्या हस्ते अग्निडाग देत, धार्मिक रीतीनुसार हा अंत्यविधी पूर्ण करण्यात आला.
यावेळी संदीप मोहिते यांना पोलीस दलाच्या, सैन्य दलाच्या तुकडीने हवेत गोळीबाराच्या तीन फैरी करत मानवंदना दिली. तसेच माजी सैनिकांच्या वतीने देखील संदीप मोहिते यांना अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी संदीप मोहिते यांचे पार्थिव दिल्लीवरून पुणे येथे आणण्यात आले होते. पुण्यावरून लष्करा तर्फे रुग्ण वाहिकेच्या माध्यमातून त्यांचे पार्थिव मांडवड गावात शनिवार दि. ३ रोजी त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले. संदीप मोहिते यांचे पार्थिव घरी काही काळ दर्शनासाठी ठेवून, राहत्या घरापासून, यांच्या पार्थिवाची लष्कराच्या गाडीतुन गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीसाठी लष्कराची गाडी फुलांच्या हराने सजवण्यात आली होती. तर संपूर्ण मांडवड गावात सडा रांगोळी करण्यात आली होती.
शालेय विद्यार्थ्यांनी मिरवणुकीच्या पुढे रॅली काढत अमर रहे. अमर रहे.. संदीप मोहिते अमर रहे..अशा घोषणा दिल्या. विद्यार्थी आणि नागरिकांच्या जयघोषाने मांडवड चा परिसर दुमदुमून गेला होता. मांडवड गावाच्या वतीने अंत्यसंस्काराच्या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने विशेष सजावट करण्यात आली होती.
जवान संदीप मोहिते यांच्या पार्थिवास आमदार सुहास कांदे, माजी आमदार गणेश धात्रक, माजी आमदार संजय पवार, माजी आमदार अनिल आहेर, माजी नगराध्यक्ष राजेशजी कवडे, अमित बोरसे, विलास आहेर, राजाभाऊ पवार, विजय पाटील, महेंद्र बोरसे, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी संदीप दळवी, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्यासह संदीप मोहिते यांचे आई-वडील पत्नी मुले भाऊ भावजाई यांच्या वतीने पुष्पचक्र वाहत आदरांजली देण्यात आली.
लेह लद्दाख येथे भारतीय सैन्य दलात 105 इंजिनिअरिंग रेजिमेंट मध्ये हवालदार या पदावरती संदीप मोहिते कार्यरत होते.
कर्तव्य बजावत असताना गुरुवार दि. 1 रोजी जवान संदीप मोहिते यांना वीरमरण आले होते. सन २००९ या वर्षी संदीप मोहिते भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. त्यांनी पुणे येथे प्रशिक्षण पूर्ण करून सैन्य दलात असताना चंदीगड, आसाम, पठाणकोट, अरुणाचल प्रदेश, लेह लद्दाख आदि ठिकाणी तसेच विदेशात साउथ सुडान या ठिकाणी सेवा बजावली होती .
संदीप मोहिते यांच्या पश्चात वडील भाऊसाहेब मोहिते, आई प्रमिला मोहिते, पत्नी मनीषा मोहिते, भाऊ शिवाजी मोहिते, श्रीकांत मोहिते व दोन मुलं देवराज आणि दक्ष संदीप मोहिते असा परिवार आहे. जवान संदीप मोहिते यांचा छोटा बंधू श्रीकांत मोहिते देखील सध्या स्थितीत भारतीय सैन्यात आपले कर्तव्य बजावत आहे. यावेळी आमदार सुहास कांदे यांनी जेवण संदीप मोहिते यांना श्रद्धांजली वाहत, गावात संदीप मोहिते यांचे स्मारक उभारणार असल्याचे सांगितले.
हे काय केलं रे देवा, संदीप मोहिते यांच्या आईचा टाहो
जवान संदीप मोहिते यांचे पार्थिव घरी येताच, कुटुंबातील सदस्यांनी एकच टाहो फोडला होता. पार्थिव घरात येताच. हे काय केलं रे देवा असा टाहो फोडला होता. कुटुंबाचा हा टाहो बघून उपस्थित्यांना देखील अश्रू अनावर झाले.
मला कुणीतरी काही सांगा ना. पत्नी मनीषा यांचा टाहो
संदीप मोहिते आपली सुट्टी संपवून दोन दिवसापूर्वीच ड्युटीवर गेले होते. आणि दोनच दिवसात ती विरगती झाल्याची बातमी आली. संदीप मोहिते यांचे पार्थिव घरी येताच त्यांची पत्नी मनीषा हिने माझ्या पतीला काय झालं मला कोणीतरी सांगा ना असं म्हणत टाहो फोडला.
हेही वाचा :
प्राचीन काळात होता करवतीसारख्या जबड्याचा मासा
नगरपंचायत कर्मचार्यांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा
Kolhapur News : रेडी…स्टेडी, गेट-सेट-गो…: ‘Bharat Live News Media राईज अप महिला अॅथलेटिक्स स्पर्धे’चा दिमाखात प्रारंभ
Latest Marathi News वीर जवान संदीप मोहिते यांना अखेरचा निरोप Brought to You By : Bharat Live News Media.