विश्वस्त नियुक्तीसाठी आळंदी देवस्थानची प्रक्रिया सुरू
आळंदी : Bharat Live News Media वृत्तसेवा : संत श्रीज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवस्थानच्या रिक्त होत असलेल्या तीन विश्वस्त जागांसाठी निवड प्रक्रिया देवस्थानने सुरू केली असून, यासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विश्वस्तपदी निवड करत असताना स्थानिक व्यक्तीला डावलले जात असल्याचा निषेधार्थ आळंदीकरांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केल्याने प्रकाशझोतात आलेल्या आळंदी देवस्थान विश्वस्त निवडीचा मुद्दा पुन्हा एकदा गाजणार असून, इच्छुकांची संख्या वाढणार असल्याचे चित्र आहे.
आळंदी देवस्थानने तीन विश्वस्त निवडीसाठी नोटीस जाहीर केली असून, इच्छुक व्यक्तींकडून अर्ज मागविले आहे.देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड.राजेंद्र उमाप यांनी याबाबत नोटीस काढली आहे.पंधरा दिवसांचे आत इच्छुकांनी अर्ज करायचे आहेत. संस्थान कमिटी, आळंदीचे पदसिध्द अध्यक्ष, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, पुणे हे आहेत, त्यांच्याकडे कोणीही अर्ज सादर करू नयेत. असे अर्ज विचारात घेतले जाणार नसल्याचेही या नोटीसमध्ये म्हटले आहे.यामुळे येत्या काळात निवड प्रक्रिया योग्य वेळेत पार पडणार की विलंब होणार,स्थानिक इच्छुक व्यक्तीची निवड होणार का ?निवड न झाल्यास त्याला आवाहन दिले जाणार का, असे अनेक प्रश्न येत्या काळात पाहायला मिळणार आहेत.
या व्यक्ती या पदासाठी नसणार पात्र
जन्माने व धर्माने हिंदू नसलेली व्यक्ती, एकवीस वर्षांपेक्षा कमी वय असलेली व्यक्ती तसेच ज्या व्यक्तीचे वय सत्तर वर्षांपेक्षा जास्त आहे अशी व्यक्ती, मानसिकदृष्ट्या कमकुवत / दुर्बल / अस्वस्थ असलेली व्यक्ती,आर्थिकदृष्ट्या दिवाळखोर, संस्थानच्या हिताविरुध्द कार्य करणारी व्यक्ती. पुणे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये रहिवास नसलेली व्यक्ती,ज्या व्यक्तीस नैतिक अधिपतनाच्या संबंधाने शिक्षा झाली आहे अशी व्यक्ती, संस्थानच्या नियमाप्रमाणे संस्थानचा अनुवंशिक नोकर, वारसदार, सेवेकरी किंवा संस्थानकडून ज्या व्यक्तीस वेतन/मानधन मिळते किंवा मिळण्यास पात्र आहे अशी व्यक्ती.
हेही वाचा
जेजुरी परिसरात दुष्काळाच्या झळा : नागरीकांचे हाल
राज्यातील चार गावांत साकारतेय पुस्तकांचे गाव
Lasalgaon News : कोण बनेगा सरपंच? लासलगावमध्ये रंगणार हाय व्होल्टेज ड्रामा
Latest Marathi News विश्वस्त नियुक्तीसाठी आळंदी देवस्थानची प्रक्रिया सुरू Brought to You By : Bharat Live News Media.