भीती निर्माण करून राज्य करणे, हीच मोदी गॅरेंटी : विरोधकांचा हल्लाबोल
मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : सुसंस्कृत महाराष्ट्राचा महायुतीने युपी, बिहार करून ठेवला आहे. सत्ताधारी आमदार पोलीस स्थानकात गोळीबार करत आहेत. सत्ताधारी आमदार पोलिसांवर हात उचलत आहेत. सत्तेचा माज, बंदूकीचा वापर, बदल्याचे राजकारण या सगळ्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. सरकारच्या मनात नेमकं काय आहे? राज्याला अशांत करून, भीती निर्माण करून राज्य करणे हीच खरी मोदींची गॅरेंटी आहे का? असे सवाल उपस्थित करून सरकारने राज्यातली कायदा सुव्यस्था धुळीस मिळविल्याचा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
राजकीय वैमनस्यातून आमदार गणपत गायकवाड यांचा शिंदे गटाच्या कल्याण पूर्वच्या शहरप्रमुखावर गोळीबार झाल्याची घटना शुक्रवारी घडली. यावर वडेट्टीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया देत सरकारला धारेवर धरले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली. ते भाजपसोबत सुद्धा गद्दारी करणार आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रात फक्त गुन्हेगार पैदा होतील. महाराष्ट्रात गुंड घडवण्याचे काम मुख्यमंत्री करत आहे. “त्यांनी माझे करोडो रुपये त्यांनी खाल्ले, त्यांच्या खासदार मुलाने सगळीकडे भ्रष्टाचार केला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपुढे या सर्व गोष्टी मांडल्या. पण त्यांनी त्यावर काही कारवाई केली नाही,” महायुतीतील आमदार गणपत गायकवाड यांचे हे शब्द ऐकून महाराष्ट्रातील जनतेला या अपात्र महायुतीचे भयंकर रूप लक्षात आले असल्याची खरमरीत टिका वडेट्टीवार यांनी केली आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकारण विदारक परिस्थितीतून जात आहे. महायुतीत शीतयुद्ध सुरूच आहे. निवडणुका जवळ येतील तसे यांचे आपापसातील वाद उफाळून येतील. पैसे कमावणे आणि जमीन हडपणे हा भू-माफियांचा उद्योग तेजीत आहे. अशा उद्योगांना राजाश्रय मिळतो हे गंभीर आहे. एकीकडे सरकारने गुंड पोसायचे आणि दुसरीकडे मात्र केंद्रीय तपास यंत्रणाना विरोध करणाऱ्यांच्या मागे लावायच्या. सरकारचे हे धंदे आता जनतेच्या लक्षात आले आहेत. त्यामुळे जनता यांना धडा शिकवेल, असे ते म्हणाले.
गोळीबाराची घटना चिंताजनक : अशोक चव्हाण
उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात सत्ताधारी आमदारांनी बेछूट गोळीबार करण्याची घटना अतिशय गंभीर आणि चिंताजनक आहे. हे केवळ कायदा व सुव्यवस्थेला आव्हान नाही, तर राज्य सरकारच्या न्यायदानाच्या कर्तव्यावर आणि विश्वासार्हतेवर लागलेले मोठे प्रश्नचिन्ह आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
Latest Marathi News भीती निर्माण करून राज्य करणे, हीच मोदी गॅरेंटी : विरोधकांचा हल्लाबोल Brought to You By : Bharat Live News Media.