घरपट्टी खासगीकरणाला प्रतिसाद, नऊ कंपन्या इच्छुक
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- घरपट्टी देयक वाटपाच्या खासगीकरणाला महापालिकेने चालना दिली असून, यासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत सिडको-सातपूर विभागांसाठी सहा, तर नाशिक पूर्व-नाशिक पश्चिम विभागांसाठी तीन मक्तेदार कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे. पंचवटी-नाशिकरोड विभागांसाठी दोनच निविदा प्राप्त झाल्याने स्पर्धात्मक दर मिळण्यासाठी या विभागांकरीता निविदा भरण्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
घरपट्टी देयक व नोटीस वाटपाच्या खासगीकरणासाठी महापालिकेने सर्वप्रथम ११ सप्टेंबर रोजीच्या महासभेत प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानंतर २४ नोव्हेंबरला सुधारित मंजुरी घेण्यात आली होती. पाठोपाठ ११ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या निविदा समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मनपाच्या संकेतस्थळावर कोटेशन नोटीस प्रसिद्ध करून दरपत्रक मागविण्यात आले होते. न्यूनतम दर विचारात घेऊन तिसऱ्यांदा सुधारित प्रस्ताव तयार करून महासभेची सुधारित मंजुरी घेण्यात आली. यात महापालिका हद्दीतील मालमत्ता करांकरिता मिळकतींचा इंडेक्सनिहाय संपूर्ण पत्ता, मिळकतींचे अक्षांश, रेखांश, मिळकतीतील नळजोडणी क्रमांक, विद्युत देयकावरील ग्राहक क्रमांक, मिळकतीचे छायाचित्र, मनपाने दिलेल्या कार्यप्रणालीत अथवा एक्सल शिटमध्ये डाटा एन्ट्री करण्यासाठी प्रतिमिळकत किमान दर ३५ रुपये निश्चित करण्यात आला. त्यानुसार मिळकतींची माहिती संकलित करण्यासाठी २.५७ कोटींचे प्राकलन तयार करण्यात आले होते. मालमत्ता करांचे देयक तयार करून वितरीत करण्यासाठी प्रतिमिळकत किमान दर २५ रुपयांप्रमाणे ११.१४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर मिळकतींचा भाडेतत्त्वावरील वापर व वापरात बदल आदींचा शोध घेण्यासाठी ११ रुपये प्रतिमिळकत दरानुसार १७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. अशाप्रकारे मिळकतींचे देयक व नोटिसा वाटपासाठी ३२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. नवीन नाशिक व सातपूरकरिता १०.८२ कोटी, नाशिक पश्चिम व नाशिक पूर्व करिता ७.७५ कोटी, तर नाशिकरोड व पंचवटी विभागांतील ठेक्यासाठी १२.२२ कोटींचा स्वतंत्र ठेका दिला जाणार आहे. पाच वर्षे मुदतीसाठी हा ठेका असणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जात आहे.
पंचवटी-नाशिकरोडसाठी मुदतवाढ
घरपट्टी देयक व नोटिसांच्या वाटपासाठी महापालिका हद्दीतील सहा विभागांपैकी प्रत्येकी दोन विभागांकरिता विभागून तीन स्वतंत्र ठेके दिले जाणार आहेत. यासाठी निविदा सादर करण्याच्या मुदतीत सिडको-सातपूर विभागांकरीता सहा, तर नाशिकपूर्व व नाशिक पश्चिम विभागांकरिता तीन निविदा प्राप्त झाल्या. पंचवटी व नाशिकरोड विभागांकरिता मात्र दोनच निविदा प्राप्त झाल्या. स्पर्धात्मक दर मिळण्यासाठी या विभागांकरीता निविदा सादर करण्यासाठी नियमांनुसार पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
निविदा छाननी समिती गठीत
प्राप्त निविदांच्या छाननीसाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली निविदा समिती गठीत करण्यात आली आहे. यात मुख्य लेखापरिक्षक प्रतिभा मोरे, मुख्य लेखापाल दत्तात्रय पाथरूट, उपायुक्त(कर) लक्ष्मीकांत साताळकर, उपायुक्त (कामगार कल्याण) प्रशांत पाटील यांचा समावेश आहे. या समितीमार्फत प्राप्त निविदांची छाननी करून पात्र ठरलेल्या निविदाधारकांचे आर्थिक देकार उघडले जाणार आहेत.
हेही वाचा :
Nashik Kumbh Mela 2027 : सिंहस्थकामांना समित्यांच्या बैठकांची प्रतीक्षा, घोषणेला दीड महिना उलटला तरही मुहूर्त लागेना
Poonam Pandey : पूनम पांडेची मृत्यूची माहिती देणारी बहिण गायब, कुटुंबीयांचे फोनही बंद? मृत्यूचे रहस्य कायम
सर्व्हायकल कॅन्सरबाबत जनजागृतीचा अभाव : जागृतीसाठी शासन राबविणार मोहीम
Latest Marathi News घरपट्टी खासगीकरणाला प्रतिसाद, नऊ कंपन्या इच्छुक Brought to You By : Bharat Live News Media.