Fraud Case : टास्क फ्रॉडचा विळखा घट्ट; सहा जणांना 72 लाखांचा गंडा
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पार्ट टाईम नोकरीचे आमिष आणि गुंतवणुकीवर जादा परताव्याचे प्रलोभन दाखवत सायबर चोरट्यांनी सहा जणांना तब्बल 72 लाख रुपयांचा आर्थिक गंडा घातला आहे. टास्क फ्रॉडद्वारे ही फसवणूक केली आहे. संर्वात गंभीर प्रकार म्हणजे फसवणूक झालेल्यांमध्ये सुशिक्षित तरुण- तरुणींचा समावेश आहे. गवळीवाडा-कॅम्प परिसरातील एका 30 वर्षीय तरुणीला सायबर चोरट्यांनी टेलिग्रामद्वारे संपर्क करून पार्ट टाईम जॉबची ऑफर दिली.
विविध प्रकारचे टास्क पूर्ण करण्याचे काम तिला देण्यात आले होते. काम केल्यानंतर त्याचा 1 हजार 500 रुपये तिच्या खात्यात जमा देखील केले. तिला वाटले सोपे काम आहे. त्यानंतर मात्र तरुणीचा विश्वास संपादन करून सायबर चोरट्यांनी तिला पेड टास्कच्या माध्यमातून जादा पैसे मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत तिच्याकडून वेळोवेळी 2 लाख 81 हजार रुपये ऑनलाइन स्वरूपात घेतले. मात्र, काही कालावधीनंतर आपली फसवणूक झाल्याचे तरुणीच्या लक्षात आले. आता तिने दिलेल्या फिर्यादीनुसार लष्कर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार सायबर चोरट्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
आंबेगाव पठार येथील 29 वर्षीय तरुणीची कहाणी देखील काही वेगळी नाही. तिला देखील सायबर चोरट्यांनी अशाच प्रकारे आपल्या जाळ्यात खेचून 8 लाख 10 हजार 715 रुपयांचा आर्थिक गंडा घातला आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 8 ते 12 डिसेंबर 2023 या कालावधीत ही घटना घडली आहे. टेलिग्रामद्वारे सायबर चोरट्यांनी तिला संपर्क करून जादा परतावा देण्याच्या आमिषाने टास्कच्या माध्यमातून 8 लाख 10 हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर मात्र ना तिला गुंतवणूक केलेले पैसे परत दिले, ना आकर्षक परतावा. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करीत आहेत.
गुरू गणेशनगर कोथरूड येथील एका 44 वर्षीय व्यक्तीला पार्ट टाईम नोकरीचे आमिष दाखवून 10 लाख 54 हजारांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोथरूड पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी त्यांना व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामद्वारे संपर्क केला. त्यानंतर पार्ट टाईम नोकरीचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. पुढे टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून त्यांच्याकडून 10 लाख 54 हजार रुपये घेतले. फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक देशमाने करीत आहेत.
खासगी कंपनीत उच्च पदावर काम करणार्या व्यक्तीला 27 लाख 51 हजारांचा टास्क फ्रॉडच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी गंडा घातला आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार, चतुःशृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 11 ते 13 जानेवारी या कालावधीत घडली आहे. फिर्यादी हे सूस-बाणेर रोड परिसरात राहण्यास आहेत. एका मोठ्या कंपनीत ते नोकरी करतात. सायबर चोरट्यांनी त्यांना टेलिग्रामद्वारे संपर्क केला. टास्क पूर्ण केल्यानंतर चांगले पैसे मिळतील, असे सांगून त्यांच्याकडून 27 लाख 51 हजार रुपये घेतले. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादीने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. त्यानुसार चतुःशृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गुन्हे निरीक्षक अंकुश चिंतामण करीत आहेत.
वाघोली येथील 59 वर्षीय व्यक्तीकडून सायबर चोरट्यांनी हॉटेल रिव्ह्यू लाईक करून शेअर केल्यास मोठा परतावा मिळेल, असे सांगून 18 लाख 42 हजार 537 रुपयांची फसवणूक केली आहे. संबंधित व्यक्तीला सुरुवातीला विश्वास वाटावा म्हणून त्यांना सायबर चोरट्यांनी 48 हजार रुपये कामाचा मोबदला देखील दिला. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी 59 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर चोरट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलिस निरीक्षक ढाकणे करीत आहेत. मुंढवा येथील 40 वर्षीय महिलेला गुंतवणुकीवर जादा परतावा मिळेल, असे सांगून टास्कच्या माध्यमातून 4 लाख 66 हजार 248 रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी 40 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला.
सायबर पोलिसांच्याा सूचनांचे पालन करा
गेल्या काही दिवसांपासून सायबर चोरट्यांनी नागरिकांना आपल्या जाळ्यात खेचून लुटण्यासाठी टास्क फ—ॉड फंड्याचा वापर केला आहे. सुरुवातीला हे सायबर चोरटे तुम्हाला ऑनलाइन काम देऊन, त्याचा मोबदलाही तुमच्या बँक खात्यात जमा करतात. एकदा तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकले, की तुम्हाला ते पेड टास्क देऊन जास्त पैसे कमवा, असे सांगतात. येथेच तुम्ही फसता, तुम्हाला वाटते आपल्या खात्यावर काम केलेले पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे तुम्ही अंधविश्वास ठेवत त्यांच्या खात्यावर पैसे पाठवता. त्यानंतर मात्र तुम्हाला ना नफा मिळतो, ना गुंतवणूक केलेले पैसे. यामुळे वेळीच सावध व्हा आणि सायबर पोलिसांनी केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा
Accident News : शहरात पाच अपघातांत पाच जणांचा मृत्यू
Sanjay Raut On MH: महाराष्ट्रात कायदा, सुव्यवस्थेचे मुडदे पडलेत; खासदार राऊत यांचा घणाघात
Don Murray : ऑस्कर नामांकित अभिनेता डॉन मरे काळाच्या पडद्याआड
Latest Marathi News Fraud Case : टास्क फ्रॉडचा विळखा घट्ट; सहा जणांना 72 लाखांचा गंडा Brought to You By : Bharat Live News Media.