विजयोत्सव साजरा केला; मग उपोषण कशाला?
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा– मराठा समाज जेव्हा मुंबईच्या दिशेने निघाला होता, तेव्हा मुख्यमंत्री तिथे गेले. त्यानंतर विजयोत्सव साजरा केला गेला. मात्र काय विजय मिळाला? जे मराठा बांधव त्या माेर्चात सहभागी झाले होते, त्यांना त्याविषयी काही कळाले का? मग विजय झाला, तर आता परत उपोषणाला कशाला बसता? अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनोज जरांगे-पाटील यांना सवाल केला. त्या दिवशी जरांगे यांना सर्व काही मिळाले, पण आरक्षण मिळाले नसल्याचेही राज यांनी म्हटले.
नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना मनाेज जरांगे-पाटील यांच्या उपोषणासह मराठी शाळा, महाविकास आघाडीतील प्रवेश, अयोध्या दौरा, टोल तसेच ईडी कारवाई आदी विषयांवर भाष्य केले. जरांगे दि. १० फेब्रुवारीपासून उपोषणाला बसत असल्याबाबत विचारले असता, राज ठाकरे म्हणाले, मी यापूर्वीच लोकांसमोर सांगितले होते की, आरक्षण दिले जाणार नाही. आरक्षणाबाबतचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकणार नाही. हा टेक्निकल विषय असून, त्यात कायदेशीर बाबी आहेत. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल. त्यामुळे मराठा बांधवांनी मोर्चात सहभागी होण्यापूर्वी याबाबतचा विचार करायला हवा. जर विजयोत्सव साजरा केला गेला, तर पुन्हा उपोषणाला कशाला बसता? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान कोणता नेता असावा? याविषयी राज म्हणाले, २०१४ मध्ये नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असावेत असे म्हटले होते. यावेळी तसा काही विचार केलेला नाही. पंतप्रधानपदी कोण असावा, याची चाचपणी सुरू आहे झाली की सांगेन, असेही मिश्किलपणे ते म्हणाले. मराठी शाळांविषयी विचारले असता, मराठी शाळा सेमीइंग्रजी केल्याशिवाय त्या चालणार नाहीत. प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याला इंग्रजी यावे, असे साहजिकच वाटते. हा वैयक्तिक प्रश्न असल्यामुळे त्याला सामाजिक दृष्टिकोनातून पाहणे योग्य नाही. ज्यांनी सेमीइंग्रजी शाळा केल्या, तेथील पटसंख्या 100 टक्के असल्याचेही त्यांनी सांगितले.
टोलविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले, माझा टोलला विरोध नाही. टोलवसुलीसाठी रोख रक्कम घेतली जाते, त्याचा हिशेब पारदर्शक नाही, त्याला विरोध आहे. किती गाड्या जातात, किती पैसे जमा होतात, सरकारला किती पैसा जातो, यात पारदर्शकता नाही. टोल हा जनरल असतो. पण विषय टोल नसून टोल वसुली आहे, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे सुरू होऊन इतकी वर्षे झाली मग इतक्या वर्षांत पैसे वसूल झालेत की नाही. याची उत्तरे मिळणार की नाही? मी मुख्यमंत्र्यांना उद्या भेटणार आहे. आम्ही टोलनाक्यांवर गेलो असता, जी आकडेवारी दिसली, ती त्यांच्यासमोर ठेवणार आहे. मी पैसे देत आहे, तर ते सरकारला गेले पाहिजेत. त्यातून सरकार नव्या योजना करू शकेल. पण ते टोलवाल्याच्या खिशात जात असतील, तर मला आवडणार नाही. त्या पैशांचा वापर राजकीय पक्षासाठी केला जात असेल, तर तुम्हाला आव़डेल का? मला ऑफर आल्या होत्या, पण मी त्यांना इथेच मारीन, असे म्हटले असल्याचा गौप्यस्फोटही राज यांनी केला.
मविआचा भरवसा नाही
खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना मविआत घेण्याबाबत केलेल्या विधानावर राज ठाकरे म्हणाले, आताचे लवंडे कुठे जातील, याचा पत्ता नाही. यांच्या महाविकास आघाडीकडे कोण जाणार? त्यांचाच काही भरवसा नाही. इंडिया आघाडीत नितीशकुमारही होते, ते कुठे गेले? असा सवालही राज यांनी उपस्थित केला. दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या सर्व जागा लढवाव्यात, अशी पक्षातून मागणी होत आहे. त्यामुळे कुठे निवडणूक लढवावी, याबाबत चाचपणी करत आहे. सत्ताधारी पक्षही चाचपणी करत आहे. तशीच आम्हीही करतोय, असेही राज यांनी स्पष्ट केले.
काळाराम मंदिरात जाणार
अयोध्येला जाणार, पण आताच नाही. अयोध्येला रोज 10 लाख लोक दर्शनासाठी जात आहेत. त्या गर्दीत कोण जाणार? तोपर्यंत काळारामाचे दर्शन घेणार. अयोध्येला रामाची मूर्ती काळी आहे, मग काळारामाचेच दर्शन घेणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
ईडी भाजपला परवडणार नाही
राज्य तसेच देशभरातील नेत्यांवर ईडीच्या कारवाया केल्या जात आहेत. यावर प्रतिक्रिया देताना राज म्हणाले, देशात सुरू असलेले अशा प्रकारचे राजकारण भविष्यात भाजपलादेखील परवडणार नाही. सत्तेचा अमरपट्टा कुणीही घेऊन आलेले नाही. उद्या सत्ता गेली, तर दामदुपटीने भाजपकडून वसूल केले जाईल, याचा त्यांनी विचार करायला हवा. इंदिरा गांधींनी जे केले, तेच तुम्ही करत असाल, तर ते अयोग्य आहे.
हेही वाचा :
सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया प्रकरण : प्राप्तिकर विभागाकडून कारवाई केव्हा होणार?
चेतेश्वर पुजारा संधीची वाट पाहतोय..! रवी शास्त्रींनी गिलला दिला धोक्याचा इशारा
Maratha reservation | मराठा समाजाचे सर्वेक्षण संपले; विशेष अधिवेशनाची तयारी
Latest Marathi News विजयोत्सव साजरा केला; मग उपोषण कशाला? Brought to You By : Bharat Live News Media.