डॉ. सुनील जाधव
मूल गर्भात असतानाच्या काळात आईच्या आहारामध्ये ड जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण झाला की, त्याचे परिणाम मुलांवर होतात. त्याच्या मेंदूतल्या भाषेच्या केंद्रामध्ये कमतरता राहून जाते.
बाळ जसजसे मोठे होत जाते तसतसे आई- वडील त्याचा आवाज ऐकण्यासाठी उत्सुक होतात. मुलाचे बोबडे बोल त्यांना एक वेगळाच आनंद देतात. सहसा मुले एक वर्षानंतर हळूहळू बोलायला सुरुवात करतात. स्पष्ट नसले बोलत, तरी कानावर सततचे शब्द पडल्याने आणि आपल्या ओठांच्या हालचाली ओळखून ते बोलण्याचा प्रयत्न करतात आणि अशा प्रकारे त्यांच्या बाललीला सुरू होतात; मात्र बर्याचदा काही मुले याला अपवाद ठरतात.
अलीकडील काळात मुलामुलींच्या बोलण्यामध्ये आढळणारे दोष हा संशोधनाचा मोठा विषय बनला आहे. या दोषाचे मूळ त्या मुलामुलींच्या मेंदूमध्ये असते आणि मेंदूतल्या भाषेच्या केंद्रामध्ये काही कमतरता राहिली की, त्या मुलाला किंवा मुलीला स्पष्टपणे बोलता येत नाही; पण ही कमतरता नेमकी काय असते आणि ती का निर्माण होते, यावर बराच काळ संशोधन करण्यात आले. तेव्हा असे आढळले की, मूल गर्भात असतानाच्या काळात आईच्या आहारामध्ये ड जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण झाला की, त्याचे परिणाम मुलांवर होतात. त्याच्या मेंदूमध्ये ही कमतरता राहून जाते.
विशेषतः ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी या संबंधात बरेच संशोधन केल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की, ज्या माता गरोदर अवस्थेत ड जीवनसत्त्व प्राप्त करू शकतात, त्या मातांची मुले भाषिकद़ृष्ट्या सक्षम असतात आणि ज्या मातांना ड जीवनसत्त्व कमी मिळते त्यांची मुले याबाबतीत सक्षम नसतात. या निरीक्षणांनी निघालेल्या निष्कर्षाची माहिती ऑस्ट्रेलियातील पेडियाट्रिक्स या मासिकात प्रसिद्ध करण्यात आली होती.
यापूर्वी अशा प्रकारचे अनेक प्रयोग झालेले आहेत. मातेच्या गरोदरावस्थेत तिला ड जीवनसत्त्व किंवा ड जीवनसत्त्वयुक्त आहार मिळाला नाही, तर त्याचे परिणाम मुलांच्या शरीरावर विशेषत: हाडांच्या मजबुतीवर आणि शारीरिक वाढीवरही होतात, असे मागे आढळून आलेले होते; परंतु या अभावाचे मनावर आणि मेंदूवर काय परिणाम होतात, याचा अभ्यास केला गेला नव्हता; पण काही शास्त्रज्ञांच्या मनात अशी कल्पना आली आणि त्यांनी तसे प्रयोग केले तेव्हा मुलामुलींच्या भाषिक कौशल्यावर या ड जीवनसत्त्वाचा परिणाम असतो, असे त्यांना आढळले. त्यामुळे गरोदर स्त्रियांनी या दिवसात ड जीवनसत्त्वयुक्त आहार घेणे गरजेचे आहे.
हेही वाचा :
Jalgaon News : आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद
Dhule Accident : कोंडाईबारी घाटात एसटी बसचा भीषण अपघात; वीस प्रवासी जखमी
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळेल : संजय बनसोडे
Latest Marathi News बोलण्यातील दोष आणि ‘ड’ जीवनसत्त्व Brought to You By : Bharat Live News Media.