बचत गट चळवळ प्रभावीपणे राबविणे आवश्यक : पालकमंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : महिलांना सक्षम करण्याबरोबरच देशाच्या आर्थिक विकासामध्येदेखील महिला बचत गटांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे बचत गटाची चळवळ आणखी प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे विभागस्तरावरील प्रदर्शन ताराराणी महोत्सव प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
महिला किती चांगल्या पद्धतीने काम करू शकतात, हे बचत गटांच्या चळवळीच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. स्वयंसहाय्यता बचत गटांची चळवळ प्रभावी मार्ग ठरला आहे. त्याच्या माध्यमातून महिलांची नवी शक्ती निर्माण झाली आहे. निर्मलग्राम, ग्रामस्वच्छता अभियान, दारूबंदी, वृक्षारोपण अशा अनेक सामाजिक कामांत महिला बचत गटांनी प्रभावी काम केले आहे. महिला बचत गटांचे महत्त्व दाखवून देणारा हा महोत्सव असून, याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री मुश्रीफ यांनी केले.
बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना अशा प्रकारच्या प्रदर्शन व महोत्सवातून बाजारपेठ उपलब्ध होते. बचतगट व उमेदसाठी पूर्ण सहकार्य करू, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. या प्रदर्शनास चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी व्यक्त केला. प्रस्ताविक प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांनी केले.
कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, शिल्पा पाटील, माधुरी परीट, कार्यकारी अभियंता श्रीप्रसाद बारटक्के, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर आदी उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी आभार मानले. सूत्रसंचालक सुषमा पाटील यांनी केले.
या कार्यक्रमात गणेश गोडसे, गोरख शिंदे, आशितोष जाधव, राजकुमार सिंग, रवींद्र माने, प्रमोद शिंदे, त्र्यबंक माने, सादिक, चेतन पाटील, नितीन जाधव, सचिन म्हस्के, शिवाजी अडनाईक, राजीव गुप्ता, किशोर पाटील या बँक अधिकार्यांचा तसेच अमृत महाआवास अभियानात उत्कृष्ट काम करणार्या ग्रामपंचायती, पंचायत समिती यांचा गौरव करण्यात आला.
Latest Marathi News बचत गट चळवळ प्रभावीपणे राबविणे आवश्यक : पालकमंत्री हसन मुश्रीफ Brought to You By : Bharat Live News Media.