काँग्रेस खासदार डी. के. सुरेश यांचे वादग्रस्त विधान, संसदेत तीव्र पडसाद
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : अर्थसंकल्पात राज्यांना मिळणाऱ्या निधीवरून दक्षिण भारताचा वेगळा देश बनविण्याच्या काँग्रेस खासदार डी. के. सुरेश यांच्या वादग्रस्त मागणीचे तीव्र पडसाद आज संसदेत उमटले. सत्ताधारी भाजपने या मुद्द्यावरून काँग्रेसला घेरले. काँग्रेसने देशाची माफी मागावी अशी मागणी केंद्रीय मंत्री पीयुष गोयल, मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली. तर, काँग्रेस अध्यक्ष व राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस पक्ष कोणत्याही परिस्थितीत देशाचे विभाजन सहन करणार नाही, असा इशारा देत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे बंधू असलेले काँग्रेस खासदार डी. के. सुरेश यांच्या वादग्रस्त विधानावरून लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हीही सभागृहांमध्ये सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपल्याचे दिसून आले. राज्यसभेमध्ये सभागृह नेते पीयुष गोयल यांनी हा मुद्दा मांडताना काँग्रेसवर टिकास्त्र सोडले. काँग्रेसच्या खासदाराचे वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचे बोलताना पीयुष गोयल यांनी काँग्रेसची विचारसरणी विभाजनवादी असल्याचाही आरोप केला. त्यानतर लोकसभेमध्ये संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी शून्यकाळात हा विषय उपस्थित करताना काँग्रेस पक्षासोबतच, काँग्रेस नेत्या सोनिया गांधींना त्यांनी लक्ष्य केले. प्रल्हाद जोशी म्हणाले, की महसूल आणि अर्थसंकल्पातील तरतुदींच्या नावाखाली देशाच्या विभाजनाची गोष्ट करणे निंदनीय आहे. असे बोलून काँग्रेस खासदाराने देशाच्या राज्य घटनेचा अपमान केला आहे. काँग्रेसने याचे स्पष्टीकरण द्यावे आणि देशाची माफी मागावी. तसेच लोकसभाध्यक्षांनी हा विषय नैतिक आचरण समितीकडे पाठवावा, अशी मागणी मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचा यावर हरकत नोंदविण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरला.
दरम्यान, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते व कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेमध्ये राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेदरम्यान डी. के. सुरेश यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाष्य करताना देशविभाजनाच्या कोणतेही वक्तव्य सहन केले जाणार नाही. असे विधान करणारा आपल्यापक्षाचा असो की दुसऱ्या पक्षाचा असो, असा इशारा दिला. कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत भारत एक आहे आणि एक राहील, असे सांगताना खर्गे यांनी देशाच्या एकतेसाठी इंदिरा गांधी, राजीव गांधींनी प्राणांचे बलिदान दिले होते याकडेही लक्ष वेधले. सोबतच, काँग्रेस खासदाराने आक्षेपार्ह विधान केले असेल तर लोकसभेच्या हक्कभंग समितीने त्याची दखल घ्यावी अशी पुस्तीही खर्गे यांनी जोडली.
Latest Marathi News काँग्रेस खासदार डी. के. सुरेश यांचे वादग्रस्त विधान, संसदेत तीव्र पडसाद Brought to You By : Bharat Live News Media.