शेवगावात रब्बीची पैसेवारी 50 पेक्षा जास्त !

शेवगाव तालुका : Bharat Live News Media वृत्तसेवा : शेवगाव तालुक्यात रब्बी पिकांची सुधारित आणेवारी पन्नास पैशांपेक्षा जादा जाहीर झाली आहे. दुष्काळ असल्याने ही आणेवारी कमी होईल, अशी शेतकर्यांची अपेक्षा होती. परंतु, या आकडेवारीने त्यावर पाणी फेरले आहे. खरीप पिकांची अंतिम आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी जाहीर झाली होती. त्याच आधारे शासनाने रब्बीच्या अंतिम आणेवारीची वाट न पाहता, तालुक्यात दुष्काळी योजना हाती घेण्याची मागणी शेतकर्यांकडून होत आहे. शेवगाव तालुक्यात खरीप पिकांची 34 गावे आहेत. मात्र, यंदा या गावांसह रब्बीच्या 79 गावांच्या क्षेत्रात दोन तृतियांशपेक्षा जास्त हेक्टरवर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या होत्या.
परंतु, पावसाचा मोठा खंड पडत राहिल्याने हे पीक वाया गेले. शेतकर्यांनी केलेल्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्नात कमालीची घट झाल्याचे निदर्शनास आल्याने, प्रशासनाने खरीप पिकांची अंतिम आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी जाहीर करून, दुष्काळी वस्तुस्थिती मान्य केली. त्यामुळे शेतकर्यांना काहीसा आधार मिळाला. खरिपानंतर 79 गावांत रब्बी पिकांच्या पेरण्या झाल्या. या कालावधीत बदलते हवामान, अवकाळी पाऊस, असा नैसर्गिक अदलबदल होत गेला. त्यात पाण्याची पातळी खालावली जाऊन अनेक विहिरी, बोअर आटल्याने गहू, हरबरा अशी पिके धोक्यात आली. मध्यतंरी धुके पडल्याने कांदा पिकांचे नुकसान झाले.
परिणामी रब्बी पीक पोटापुरतेच होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यातच रब्बी पिकांची नजर आणेवारी पन्नास पैशांपेक्षा जास्त म्हणजे 51 ते 58 पैशांपर्यंत जाहीर झाल्याने शेतकर्यांत संताप निर्माण झाला होता. ही आणेवारी कमी करण्याची मागणी करण्यात आली होती. प्रशासनाने रब्बीची अवस्था पाहून सुधारित आणेवारीत बदल केला. मात्र, ती पन्नास पैशांपेक्षा जास्त 51 ते 52 पैसे जाहीर केली आहे.
सुधारित आणेवारी पुढीलप्रमाणे- शेवगाव, सुलतानपूर खुर्द, शहांजापूर, खरडगाव, मुर्शदपूर, एरंडगाव भागवत, खुंटेफळ, दादेगाव, ताजनापूर, बोडखे, तळणी, विजयपूर, दहिगाव-शे, रावतळे, पिंगेवाडी, घेवरी, लखमापुरी, खामपिंप्री नवीन, खामपिंप्री जुनी, सोनविहीर, चापडगाव, प्रभुवडगाव, कुरुडगाव, ठाकूर पिंपळगाव, बक्तरपूर, सुलतानपूर बुद्रूक, रांजणी, भायगाव, जोहरापूर, खामगाव, मळेगाव-शे, लोळेगाव, आपेगाव, आखतवाडे, वाघोली, वडुले खुर्द, आव्हाणे खुर्द, बर्हाणपूर (51 पैसे).
अमरापूर, आखेगाव तितर्फा, डोंगर आखेगाव, वरूर बुर्द्रूक, वरूर खुर्द, भगूर, एरंडगाव, समसुद, लाखेफळ, जुने दहिफळ, ढोरहिंगणी, कर्जत खुर्द, घोटण, आंतरवाली खुर्द ने, मुंगी, खानापूर, कर्हेटाकळी, बालमटाकळी, कांबी, हातगाव, खडके, मडके, गदेवाडी, दहिगाव-ने, देवळाणे, देवटाकळी, शहरटाकळी, ढोरसडे, अंत्रे, भाविनिमगाव, भातकुडगाव, मजलेशहर, हिंगणगाव-ने, सामनगाव, वडुले बुद्रुक, ढोरजळगाव-शे, मलकापूर, गरडवाडी, ढोरजळगाव-ने, आव्हाणे बुद्रुक, निंबेनांदूर, नांदूरविहिरे (52 पैसे).
Latest Marathi News शेवगावात रब्बीची पैसेवारी 50 पेक्षा जास्त ! Brought to You By : Bharat Live News Media.
