Pune : अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकर्याचा मृत्यू

न्हावरे : Bharat Live News Media वृत्तसेवा : निर्वी-शिरसगाव काटा या रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत निर्वी (ता. शिरूर) येथील शेतकर्याचा मृत्यू झाला. याबाबत शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. बाळासाहेब केशव पवार (वय 62) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी (दि. 31 जानेवारी) रात्री 8 च्या सुमारास बाळासाहेब पवार हे शिरसगाव काटाकडून निर्वीकडे आपल्या गावी येत होते. त्यांनी आपली मोटारसायकल बाजूला उभी करून ते पायी जात असतानाच भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने पवार यांना जोरदार धडक दिली.
काही वेळाने ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. परंतु डोक्याला गंभीर मार बसल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद मयताचे बंधू पोपट पवार यांनी पोलिसात दाखल केली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार हे करीत असून घटनास्थळी सहायक पोलिस उपनिरीक्षक गोपीनाथ चव्हाण व इतर पोलिसांनी पंचनामा केला.
Latest Marathi News Pune : अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकर्याचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.
