तडका : मेड इन इंडिया

श्रीमंत लोकांचे सगळे काही वेगळेच असते. म्हणजे काय असते की, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, आपल्यासारख्या सामान्य लोकांना असलेला पैशाचा प्रश्न त्यांना नसतो, त्यामुळे खर्च कुठे करायचा? ही मोठीच समस्या त्यांच्यापुढे असते. सेलिब्रिटी नावाचे लोक, म्हणजे चित्रपट अभिनेते, गायक, गायिका, क्रिकेटपटू आणि बरेचसे राजकारणी हे नियमित परदेशामध्ये जात असतात. साहजिकच, असे लोक त्यांचे स्वतःचे किंवा घरातील विवाह … The post तडका : मेड इन इंडिया appeared first on पुढारी.

तडका : मेड इन इंडिया

श्रीमंत लोकांचे सगळे काही वेगळेच असते. म्हणजे काय असते की, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, आपल्यासारख्या सामान्य लोकांना असलेला पैशाचा प्रश्न त्यांना नसतो, त्यामुळे खर्च कुठे करायचा? ही मोठीच समस्या त्यांच्यापुढे असते. सेलिब्रिटी नावाचे लोक, म्हणजे चित्रपट अभिनेते, गायक, गायिका, क्रिकेटपटू आणि बरेचसे राजकारणी हे नियमित परदेशामध्ये जात असतात. साहजिकच, असे लोक त्यांचे स्वतःचे किंवा घरातील विवाह समारंभ एखाद्या परदेशी भूमीवरील बेटावर करत असतात. त्यांच्या विवाहाला येणारे पाहुणे तितकेच मोठे असतात. त्यामुळे परदेशी विवाह करणे त्यांना सोपे जाते.
मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया यानंतर काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी विवाह समारंभ भारतातच करावेत, असा सगळ्यांना आग्रह केला. त्यांनी हे केलेले आवाहन म्हणजेच ‘वेड इन इंडिया’ म्हणावे लागेल. इथे वेड म्हणजे मराठी ‘वेड’ नसून इंग्रजी ‘वेड’ आहे आणि लग्नाला ‘वेडिंग’ म्हणत असतील तर लग्न करण्याला ‘वेड’ असे म्हटले जाते. तसेही लग्न करणे हे एकप्रकारचे वेडच असते. तरुण मुला-मुलींना कधी एकदा लग्न होईल, असे झालेले असते. लग्न झाल्यानंतर काही काळानंतर वेड लागण्याची वेळ येते, हे बहुदा इंग्लिश लोकांनी आधीच ओळखले असावे. त्यामुळेच त्यांनी लग्नाला ‘वेडिंग’ हा शब्द शोधून काढला असावा.
नुकतीच रकुलप्रीत सिंह या अभिनेत्रीने अशी घोषणा केली आहे की, ती स्वतः लग्न भारतातच करणार आहे. तिचे लग्न ठरले आहे आणि ते परदेशात करायचे, असेही ठरले होते; परंतु पंतप्रधान मोदींच्या आवाहनानुसार तिने विचार बदलला आणि आता भारतातच म्हणजे गोव्यात लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न समारंभात खर्च केले जात असलेले पैसे पाहता फार मोठी आर्थिक उलाढाल या माध्यमातून देशभर होत असते. देशातील पैसा देशातच राहावा, या द़ृष्टीने पंतप्रधानांनी लग्न करा; पण भारतातच करा, असा आग्रह धरला तर त्यात काही चुकीचे नाही.
मुलीचे लग्न करून देणे ही एक सामान्य वधू पित्यावर फार मोठी जबाबदारी असते. बरेचसे लोक मुलगी जन्माला आल्याबरोबर तिच्या नावाने नियमित बचत करतात, जेणेकरून ती पुढे वीस-बावीस वर्षांची झाली की, तिच्या लग्नाचा खर्च आपल्याकडे तयार असेल. तशा प्रकारच्या अनेक बचत योजनाही आपल्या देशामध्ये उपलब्ध आहेत. अगदी ग्रामीण भागातील लग्न करतानासुद्धा हात आणि खिसा मोकळा सोडला जातो. आता इथून पुढे सेलिब्रिटींनी जर भारतात लग्ने लावली किंवा केली, तर त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चांगलीच चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय, सेलिब्रिटी लोकांचे लग्न कधी होईल, घटस्फोट कधी होईल आणि पुन्हा दुसरे लग्न कधी होईल, याची काही खात्री नसते. त्यामुळे एखादी व्यक्ती पहिले लग्न, दुसरे लग्न, तिसरे लग्न अशाप्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेला आणखी गती देऊ शकते. आपल्यासारखे सामान्य लोक परदेशात जायला मिळावे, यासाठी प्रयत्न करत असतात. काही उच्च मध्यमवर्गीय लोक चार-आठ दिवसांची सहलही काढून फिरतात; परंतु लग्नकार्य आणि समारंभ मात्र भारतातच केले जातात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, त्यांच्या हातात लग्न करण्याइतके किंवा घडवून आणण्याइतके पैसे असतात; परंतु परदेशात लग्न लावावे इतके पैसे कधीच नसतात.
Latest Marathi News तडका : मेड इन इंडिया Brought to You By : Bharat Live News Media.