Nagar : सादतपूरला आणखी एक बिबट्या जेरबंद
आश्वी : Bharat Live News Media वृत्तसेवा : संगमनेर व राहाता तालुक्यात बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. या दुर्दैवी घटनांमध्ये लोणी (ता. राहाता) व सादतपूर (ता. संगमनेर) येथे दोन मुलांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे बिबट्या जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असताना सोमवारी एक व मंगळवारी एक असे दोन बिबटे सादतपूर शिवारात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.
वन विभागाचे विशेष पथक सादतपूर शिवारात तळ ठोकून आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून हे पथक व स्थानिक वनविभागाचे अधिकारी बिबट्याचा कसून शोध घेत होते. त्यांनी सादतपूर शिवारात ठिकठिकाणी अनेक पिंजरे लावून शोधमोहीम सुरू ठेवली होती. सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास मगर वस्तीनजीक लावलेल्या पिंजर्यात एक बिबट्या अडकला, तर मंगळवारी रात्री संतोष मगर यांच्या शेतात बिबट्या जेरबंद झाला. बिबट्याची शोध मोहीम सुरूच राहणार आहे.
वाहनाच्या धडकेत बछडा मृत्युमुखी
राहाता तालुक्यातील हसनापूर शिवारातील लोणी-आश्वी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचे पिलू मृत्युमुखी पडले. मंगळवारी (दि 30) रात्री 8 ते 8:30च्या सुमारास हसनापूर शिवारातील लोणी-आश्वी रस्त्यावर आश्वी दिशेने साधारणपणे दोन महीन्याचे असणारे बिबट्याचे पिल्लू अज्ञात वाहनाच्या धडकेत रक्ताच्या थारोळात मृत्यु असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने हसनापूर शिवारात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. बिबट्याच्या पिल्लूचे मृत्यु झाल्याने शेजारीचं बिबट्या मादी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने आजू-बाजूच्या प्रवाशांनी सावधपणे प्रवास करावा असे आवाहन होत आहे.
दाढ खुर्दला बिबट्याकडून कालवडीचा फडशा
दोन बिबट्यांच्या हल्ल्यात कालवड ठार झाली. संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथे ही घटना घडली. अनिल वाघमारे यांच्या वस्तीवर मध्यरात्री दोन बिबट्यांनी हल्ला केला. या परिसरामध्ये शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चार दिवसांपूर्वी लोणी व सादतपूर येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 2 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दोन्ही घटना ताज्या असताना दाढ खुर्द येथे वाघमारे यांच्या कालवडीवर बिबट्याने हल्ला करीत नरडे फोडल्याचे वाघमारे यांनी सांगितले. बिबट्यांसह डुक्कर, तरसांचा संचार या भागात वाढला आहे. येथे बिबट्यांची संख्या वाढत आहे. बिबट्यांसह हिंस्र वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, ड्रोन कॅमेर्याच्या सहाय्याने वन अधिकार्यांनी प्राण्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी दाढ खुर्दचे काँग्रेसचे गट नेते किशोर जोशी, श्रीखंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष किशोर वाघमारे, उपसरपंच राजेश्वरी जोशी, नितीन पाबळे, रावसाहेब जमधडे, चेतन पर्वत, गंगाधर जमदाडे, संजय जोशी, रिपब्लिकनचे शाखाप्रमुख राजेंद्र जमधडे, लहुजी सेनेचे डॉ. राजेंद्र साळवे, दगडू साळवे, सतीश वाघमारे यांनी केली आहे.
Latest Marathi News Nagar : सादतपूरला आणखी एक बिबट्या जेरबंद Brought to You By : Bharat Live News Media.