शरद पवारांचे पक्षाध्यक्षपद घटनेला धरून नव्हते
मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवारांचे अध्यक्षपद हे पक्षाच्या घटनेला धरून नव्हते. पंचायत समित्यांपासून राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत कधीच निवडणुका झाल्या नाहीत. पक्षाची रचनाच कधी अस्तित्वात नव्हती, असा युक्तिवाद अजित पवार गटाने बुधवारी आमदार अपात्रता याचिकांवरील सुनावणी दरम्यान केला. विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणीचे कामकाज पूर्ण झाले असून आता निकालाची प्रतीक्षा आहे.
विधानसभा अध्यक्षांसमोर आठवडाभर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांची साक्ष नोंदणी, उलटतपासणी झाली. त्यानंतर सलग दोन दिवस दोन्ही गटाच्या वकिलांनी अंतिम युक्तिवाद मांडला. शरद पवार हेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे सांगत अजित पवार यांची अध्यक्षपदी झालेली निवड अवैध असल्याचा युक्तिवाद शरद पवार गटाचे वकील शरण जगतियानी यांनी केला. त्यावर अजित पवार गटाच्या वकिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेचा हवाला देत प्रतिहल्ला केला.
पक्षाच्या घटनेनुसार पंचायत समिती ते राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदांच्या निवडणुका व्हायला हव्या, त्या कधीच झाल्या नाहीत. निवडणूक घेऊ असे सांगितले; पण पक्षातील पदरचनाच नाही. पक्षात निवडून आलेल्या पदाधिकार्यांनी कार्यकारी समितीची निवड करायची असते. यात अध्यक्षांसह खजिनदार आदी पदे असतात. पण या कार्यकारी समितीचा कुठे पत्ताच नाही, ही समिती कुठे अस्तित्वातच नसल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाच्या वकिलांनी केला.
राष्ट्रवादीचे धोरणच नव्हते
पक्षाच्या धोरणाविरोधात अजित पवारांचा गट सरकारमध्ये गेला, असा ठपका ठेवत त्यांच्या विरोधात अपात्रतेची नोटीस बजावली गेली. पण 2014 साली भाजपची सोबत, 2019 ला शिवसेनेच्या सोबत. मग राष्ट्रवादीचे नेमके धोरण तरी कोणते? पक्षाचे असे कोणते धोरणच नव्हते, त्यामुळे अपात्रतेची मागणीच गैरलागू असल्याचा युक्तिवादही अजित पवार गटाने केला.
लेखी म्हणणे मांडा – विधानसभा अध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचा युक्तिवाद संपल्यानंतर सभापती राहुल नार्वेकर यांनी त्यांना शुक्रवार 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत दोन्ही गटांना आपापले लेखी म्हणणे मांडण्याच्या सूचना केल्या.
एक व्यक्ती म्हणजे पक्ष नव्हे
सरकारांमध्ये पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांनाही एकट्याने निर्णय घेता येत नाही. त्यासाठी त्यांना मंत्रिमंडळासमोर जावे लागते. येथे एक व्यक्ती अध्यक्ष आहे म्हणून सगळे निर्णय एकट्यानेच घेऊ शकत नाही. एक व्यक्ती कधीच सगळा पक्ष बनू शकत नाही, असा दावा अजित पवार गटाच्या वकिलांनी केला.
हेही वाचा :
मनसेप्रमुख राज ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर, पदाधिकाऱ्यांमधील शीतयुद्ध रोखण्याची कार्यकर्त्यांना…
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एक देश एक निवडणुकीला पाठिंबा
एक देश, एक निवडणुकीच्या निमित्ताने
Latest Marathi News शरद पवारांचे पक्षाध्यक्षपद घटनेला धरून नव्हते Brought to You By : Bharat Live News Media.