तडका : अति अपारंपरिक ऊर्जास्रोत..!
सध्या देशामध्ये इलेक्शनचे वारे वाहते आहे. लवकरच येऊ घातलेल्या विधानसभा लोकसभा आणि दरम्यान असणार्या नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुकांमध्ये भरपूर आरडाओरड होणार आहे. आताही टीव्हीवर सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक राजकीय भोंगे आवाज काढत असतात. आपल्या देशामध्ये ऊर्जेची कमतरता आहे. बरेचदा ग्रामीण भागात बारा-बारा तास वीज नसते. लोड शेडिंग हा प्रकार लोकांच्या अंगवळणी पडला आहे.
आमच्या मनात असा विचार आला की, नेत्यांच्या बडबडीमधून बाहेर पडणारी ऊर्जा जर विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित करता आली तर महाराष्ट्र पूर्ण देशाचा प्रश्न सोडवू शकेल. काय म्हणताय, लक्षात आले नाही? थांबा. सोपे करून सांगतो. म्हणजे पाहा, ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्ट करता येत नाही, हे आपण शाळेत शिकलो आहोत. केवळ एका प्रकारची ऊर्जा दुसर्या ऊर्जेमध्ये रूपांतरित करता येते. तुम्हाला उष्णता पाहिजे असेल तर लाकूड जाळले पाहिजे, वाहने चालवायची असतील तर इंधन जाळले पाहिजे. इंधनरूपी ऊर्जा वेगवेगळ्या प्रकारच्या इतर ऊर्जांमध्ये रूपांतरित करता येणे शक्य आहे आणि खरे सांगायचे, तर त्यावरच सगळा कारभार सुरू आहे. मग माणसे जी बडबड करतात, त्यामधून जी बाहेर ऊर्जा पडते, ती हवेमध्ये विरून जाते. त्याऐवजी ही ऊर्जा पकडून तिला विद्युत शक्तीमध्ये रूपांतरित केले तर राज्यामध्ये आणि देशामध्ये ऊर्जेची टंचाई असणार नाही. ग्रामीण भागात लोड शेडिंग होणार नाही. 24 तास लाईट सुरळीत सुरू राहील. शेतकरी बांधवांना रात्री-अपरात्री शेतामध्ये जाऊन मोटारी सुरू करण्याची घातक पद्धत बंद करता येईल.
शास्त्रज्ञांनी या बडबडीचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करण्याचे यंत्र तयार केले पाहिजे. यंत्र पोर्टेबल असेल तर आणखी चांगले. एखादा राजकीय नेता भाषण द्यायला उभा राहिला किंवा सकाळी लागणारा एखादा भोंगा पत्रकारांसमोर बोलायला लागला की, त्याच्या बाजूला ते यंत्र उभे करायचे. त्याच्या बडबडीमधील एनर्जी ते यंत्र साठवून ठेवेल आणि अशी ऊर्जा तत्काळ विद्युत शक्तीमध्ये रूपांतरित करून गावांमध्ये वीज खेळवता येईल.
अशा प्रकारचे संशोधन करणे ही आपल्या देशाची नितांत गरज आहे. वायफळ बडबड करणारे राजकारणी हा विद्युत ऊर्जेचा चांगला स्रोत आहे, हे आधी शासनाने लक्षात घेतले पाहिजे. निधीची तरतूद करून शास्त्रज्ञांना कामाला लावले पाहिजे, जेणेकरून राज्याचा आणि पुढे चालून देशाचाही वीजपुरवठ्याचा प्रश्न सोडवता येईल. ज्या देशातील शास्त्रज्ञ चंद्रावर यान पाठवतात, सूर्याच्या दिशेने यान पाठवतात, भविष्यकाळामध्ये भारतीय माणूस चंद्रावरही पाय ठेवेल, असा प्रगत शास्त्रीय विकास असलेल्या देशाला असे बडबडीचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करणारे यंत्र तयार करणे अजिबात अवघड नाही. आमच्या या संकल्पनेचा शासनाने जरूर विचार करावा ही आग्रहाची विनंती आहे. नेत्यांची बडबड आणि त्याचे वाहिन्यांवरून प्रसारण ही नित्याचीच बाब झाली आहे. लोकही त्यांची बडबड दिवसभर पाहताना दिसतात. एखादा वादग्रस्त मुद्दा असला की, तज्ज्ञांना बोलवायचे आणि तो विषय दिवसभर वाजवयाचा, हे आता नित्याचे झाले आहे. ही ऊर्जा या लोकांनी जनतेच्या कल्याणासाठी वापरली तर त्याचा नक्कीच देशाला फायदा होईल.
Latest Marathi News तडका : अति अपारंपरिक ऊर्जास्रोत..! Brought to You By : Bharat Live News Media.