अभय योजनेच्या पहिल्या टप्प्यास 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ..
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्यात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मुद्रांक अभय योजनेच्या पहिल्या टप्प्याला अखेर (बुधवारी) मुदतवाढ मिळाली. त्यानुसार या योजनेचा पहिला टप्पा 29 फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे. पहिला टप्पा बुधवारी (31 जानेवारी) संपणार होता. दरम्यान, या मुदतवाढीमुळे दुसरा टप्पा राबविण्यास केवळ एकच महिना मिळणार आहे.
अभय योजनेस राज्याच्या सर्वच भागांतून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद, योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला झालेला विलंब आणि अनेक संस्था, संघटनांनी मुदतवाढ देण्याची केलेली मागणी लक्षात घेऊन नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागानेही मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविला होता. त्यानुसार राज्य शासनाचे उपसचिव सत्यनारायण बजाज यांनी याबाबतचे आदेश जारी केले. नागरिकांनी कमी भरलेले मुद्रांक शुल्क भरण्यासाठी दंडाची तरतूद आहे. मात्र, सन 1980 ते 2020 या कालावधीत सुमारे दोन लाख 34 हजार प्रकरणांत मुद्रांक शुल्क कमी भरल्याचे महालेखाकार कार्यालय आणि नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाने केलेल्या तपासणीत समोर आले.
मात्र, या मुद्रांक शुल्काची वसुली झालेली नाही किंवा होत नव्हती. त्यामुळे याबाबत अभय योजना राबविण्याचा प्रस्ताव नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने जुलै महिन्यात राज्य सरकारकडे दिला होता. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अभय योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. ही योजना 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 आणि 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 अशी दोन टप्प्यांत राबविण्यात येणार होती. आता पहिला टप्पा 29 फेब्रुवारीपर्यंत, तर दूसरा टप्पा 1 मार्च ते 31 मार्च 2024 या काळात राबविला जाणार आहे.
22 कोटींचा महसूल जमा
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे 15 हजारांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांपैकी सहा हजारांपेक्षा जास्त प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. या माध्यमातून सुमारे 16 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क, पाच कोटींपेक्षा जास्त दंड, तर 23 लाख रुपये नोंदणी शुल्क, असा एकूण 22 कोटींचा महसूल जमा झाला आहे. त्यामुळे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी योजनेच्या पहिल्या टप्प्याला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव पाठविला होता.
हेही वाचा
राखीव जागांबाबत यूजीसीचे एक पाऊल मागे!
Weather Update : राज्यात पुन्हा थंडीची लाट
भाजपा इलेक्शन मोडवर, अध्यात्मिक आघाडी घेणार संत महंतांचे मेळावे
Latest Marathi News अभय योजनेच्या पहिल्या टप्प्यास 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ.. Brought to You By : Bharat Live News Media.