‘सीना’ घेणार मोकळा श्वास ; सुमारे सहा किलोमीटरची मोजणी पूर्ण
डॉ. सूर्यकांत वरकड
नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : सीना नदीत वारंवार होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी महापालिका व भूमिअभिलेख विभागाने नदीची मोजणी हाती घेतली आहे. आतापर्यंत सुमारे पाच ते सहा किलोमीटरची मोजणी पूर्ण झाली आहे. मोजणी झाल्यानंतर नदीच्या दोन्ही बाजूंनी खांब रोवण्यात आले आहेत. किरकोळ अडथळा वगळता अन्य मोजणी पार पडली आहे. नागापूर ते पंपिंग स्टेशनपर्यंत मोजणी पूर्ण झाली आहे. महापालिकेने अनेक वेळा सीना नदी सुशोभीकरण, नदीतील अतिक्रमण हटवून खोलीकरण करण्याचाही प्रयत्न केला. परंतु, नदीची नेमकी हद्द कोणालाच माहिती नसल्याने त्यात अनेक अडचणी येत होते. सीना नदीच्या हद्दनिश्चितीचा चेंडू जिल्हाधिकार्यांच्या कोर्टात गेला होता.
जिल्हाधिकार्यांनी महापालिका, भूमिअभिलेख, महसूल विभागाची बैठक घेऊन भूमिअभिलेख विभागाला डिजीटल मोजणी करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर महापालिका अधिकार्यांनाही उपस्थित राहण्याचे आदेश केले होते. त्यानुसार 27 डिसेंबर 2023 पासून नदीच्या मोजणीला प्रारंभ झाला. नागापूर येथील जिल्हा परिषद शाळेपासून ते भुतकरवाडीजवळील पंपिंग स्टेशनपर्यंत सुमारे पाच ते सहा किलोमीटर मोजणी करण्यात आली. त्यासाठी नदीच्या दोन्ही बाजूंनी खांब रोवण्यात आले आहेत. सध्या मोहीम थंडावली आहे. येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा मोहीम सुरू होणार आहे. या मोहिमेत भूमिअभिलेख विभागाच्या मोजणी अधिकारी ज्योती तिवारी, नगररचनाकार राम चारठाणकर, सर्वेक्ष चाफळे, अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख आदित्य बल्लाळ, रिजवान शेख यांच्यासह कर्मचार्यांचे पथक सहभागी झाले होते.
सीना नदीची डिजीटल मॅपिंग करण्यात आले आहे. त्यामुळे नदीची हद्द निश्चित होणार आहे. त्यानंतर सामान्य माणूसही नदीचा नकाशा पाहू शकतो. डिजीटल मॅपिंग अत्यंत सोपे व सुलभ असल्याचा दावा भूमिअभिलेखच्या अधिकार्यांनी केला आहे.
मोजणीत अडथळे
नागापूर ते पंपिंग स्टेशनपर्यंत मोजणी करताना काही ठिकाणी अडथळे आले. पिकांमध्ये मोजणी गेल्यानंतर शेतकर्यांनी आक्षेप घेतला. आम्ही दोन पिढ्यांपासून जमीन कसतो. त्यामुळे आम्ही अतिक्रमणात नाही, असा दावा केला. एक दोन ठिकाणी खांब रोवण्यासही विरोध झाला. त्यामुळे मोजणी शहराजवळ आल्याने मनपाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मोजणीनंतर बांध
चार वर्षांपूर्वी नकाशानुसार सीना नदीची मोजणी करून हद्द निश्चित करीत दोन्ही बाजूंना सुमारे 350 खांब रोवले होते. अतिक्रमण करणार्यांनी खांब काढून टाकले आहेत. त्यामुळे आता हद्द निश्चित करून दोन्ही बाजूंनी खांब रोवल्यानंतर बांध घालण्यात येणार आहे.
Latest Marathi News ‘सीना’ घेणार मोकळा श्वास ; सुमारे सहा किलोमीटरची मोजणी पूर्ण Brought to You By : Bharat Live News Media.