Test Rankings : शुभमन गिल-श्रेयस अय्यरची घसरण, कोहलीला एक स्थानाचा फायदा
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ICC Test Rankings : आयसीसीने बुधवारी कसोटी खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला (767 रेटींग) एका स्थानाचा फायदा झाला असून तो आता सहाव्या स्थानावर पोहचला आहे. कोहली इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये खेळत नाहीये. वैयक्तिक कारणामुळे त्याने नाव मागे घेतले आहे. कर्णधार रोहित शर्मा (729) 12 व्या क्रमांकावर आहे.
शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना नुकसान झाले आहे. या दोन्ही खेळाडूंना अलीकडच्या काळात चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याचा फटका त्यांना आयसीसी क्रमवारीत बसला आहे. अय्यरची (534 रेटिंग) 6 स्थानांची घसरण झाली आहे. तो आता 48व्या स्थानावर आला आहे. दुसरीकडे शुभमन गिल 52 व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याला तीन स्थानांचे नुकसान झाले आहे. त्याचे रेटिंग 509 आहे. अय्यरने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 35 धावा आणि दुसऱ्या डावात 13 धावा केल्या. तर गिल पहिल्या डावात 23 धावांवर बाद झाला आणि दुसऱ्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही.
त्याचबरोबर इंग्लंडचा फलंदाज ओली पोलने 20 स्थानांची मोठी झेप घेतली आहे. तो 15 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या खात्यात 684 रेटींग जमा झाले आहे. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पोपने शानदार फलंदाजी केली. त्याने कठीण काळात 278 चेंडूंचा सामना करून 21 चौकारांच्या मदतीने 196 धावा केल्या. भारताला या कसोटीत 28 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पोपला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. मालिकेतील दुसरा सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. (ICC Test Rankings)
न्यूझीलंडचा केन विल्यमसन (864 रेटींग) कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. इंग्लंडचा जो रूट (832) आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ (818) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल (786) चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा बाबर आझम (768) 10व्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज उस्मान ख्वाजा (765) सातव्या क्रमांकावर आहे. त्याने दोन स्थानांची प्रगती केली आहे. (ICC Test Rankings)
कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (825) एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो चौथ्या क्रमांकावर आहे. हैदराबाद कसोटीत बुमराहने 6 विकेट घेतल्या होत्या. अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (853) अव्वल स्थानावर कायम आहे. अश्विनने पहिल्या सामन्यातही 6 विकेट घेतल्या होत्या. पॅट कमिन्स (828) तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. कागिसो रबाडाचा दुस-या क्रमांकावर पोचला आहे. रवींद्र जडेजा (425) अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.
Latest Marathi News Test Rankings : शुभमन गिल-श्रेयस अय्यरची घसरण, कोहलीला एक स्थानाचा फायदा Brought to You By : Bharat Live News Media.