शिरदाळे घाटात वणवा ; उपसरपंचांच्या प्रसंगावधानाने टळला अनर्थ
लोणी-धामणी : Bharat Live News Media वृत्तसेवा : शिरदाळे-धामणी (ता. आंबेगाव) येथील घाटात सोमवारी (दि. 29) रात्री नऊच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी वणवा लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचवेळी तेथून घराकडे निघालेले शिरदाळे गावचे माजी उपसरपंच मयूर सरडे यांच्या ही गोष्ट लक्षात आली. प्रसंगावधान राखत त्यांनी विक्रम बोर्हाडे यांना बोलावून वणवा नियंत्रणात आणला. सध्या हिवाळा सुरू आहे. बरीच जनावरे रानात तसेच खासगी क्षेत्रात चरायला जात असतात. त्यामुळे वणवा भडकला असता तर मोठे नुकसान झाले असते. शिवाय जवळच वन विभागाचे क्षेत्र असल्याने तेथील अनेक झाडे जळून खाक झाली असती तसेच अनेक वन्यजीवांचा होरपळून मृत्यू झाला असता. उपसरपंच मयूर सरडे यांचे प्रसंगावधान आणि जवळ राहणारे विक्रम यांनी वेळीच केलेली मदत, यामुळे या वणव्यावर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
तसेच या दोघांनी धामणी वनक्षेत्राच्या वनपाल सोनल भालेराव यांना यासंदर्भात माहिती दिली. भालेराव यांनी या दोघांच्या कार्याचे कौतुक केले. वणव्यामध्ये गवत जळतेच; परंतु छोटे-मोठे कीटक, पशुपक्षी हेही आगीत जळून खाक होतात. तसेच झाडांना आग लागल्यास पशुपक्ष्यांची घरटीही नष्ट होतात. दरम्यान, वणव्यामुळे निसर्गाचे व पर्यावरणाचे खूप नुकसान होते. वन्यप्राण्यांची आश्रयस्थाने नष्ट होतात. यापुढे कुणीही वणवा लावू नये, असे आवाहन वनपाल भालेराव यांनी केले आहे.
वणवा लावण्याचे प्रयत्न करू नये
समाजात काही जण अशी पर्यावरणाला हानी पोहचविणारी कृत्ये करतात. यामुळे मोठे नुकसान होत असते. जनावरांचे चराऊ रान, वन विभागातील झाडे, वन्यजीव यांची मोठी हानी होत असते. त्यामुळे वणवा लावण्याचे प्रयत्न कुणीही करू नये, असे आवाहन धामणीच्या सरपंच रेश्मा बोर्हाडे आणि उपसरपंच मयूर सरडे यांनी केले आहे.
Latest Marathi News शिरदाळे घाटात वणवा ; उपसरपंचांच्या प्रसंगावधानाने टळला अनर्थ Brought to You By : Bharat Live News Media.