कचरा संकलनासाठी मॉनिटरिंग अधिकाऱ्यांची नेमणूक

जि. पं. कडून पुढाकार, कचरावाहू वाहने ग्रा. पं. समोर पडून : सदस्यांची उदासिनता-पीडीओंच्या दुर्लक्षामुळे शासनाचा कचरा निर्मूलनाचा उद्देश कागदावरच बेळगाव : ग्राम पंचायतींच्या व्याप्तीमध्ये कचऱ्याची समस्या गंभीर स्वरुप धारण करीत आहे. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी राज्य सरकारकडून जिल्ह्यातील 486 ग्रा. पं. ना कचरावाहू वाहन उपलब्ध करून दिले आहेम. मात्र, या वाहनांचा अपेक्षित उपयोग होत नसल्याने […]

कचरा संकलनासाठी मॉनिटरिंग अधिकाऱ्यांची नेमणूक

जि. पं. कडून पुढाकार, कचरावाहू वाहने ग्रा. पं. समोर पडून : सदस्यांची उदासिनता-पीडीओंच्या दुर्लक्षामुळे शासनाचा कचरा निर्मूलनाचा उद्देश कागदावरच
बेळगाव : ग्राम पंचायतींच्या व्याप्तीमध्ये कचऱ्याची समस्या गंभीर स्वरुप धारण करीत आहे. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी राज्य सरकारकडून जिल्ह्यातील 486 ग्रा. पं. ना कचरावाहू वाहन उपलब्ध करून दिले आहेम. मात्र, या वाहनांचा अपेक्षित उपयोग होत नसल्याने वाहने ग्रा. पं. समोर पडून आहेत. त्यामुळे शासनाचा उद्देश कागदावरच राहिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. तर जि. पं. कडून कचरा संकलनासाठी मॉनिटरिंग अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. ग्रामीण भागाचा झपाट्याने विकास होत आहे. विशेष करून शहराजवळ असणाऱ्या ग्रा. पं. च्या व्याप्तीत कचऱ्याची मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे गावांना विद्रुप स्वरुप प्राप्त होत आहे. गावच्या प्रवेशद्वारामध्येच कचऱ्याचे ढीग निदर्शनास येत आहेत. ग्रा. पं. सदस्यांसह ग्रा. पं. विकास अधिकाऱ्यांकडून प्रभावीपणे योजना राबविण्यात दुर्लक्ष केले जात असल्याने शासनाच्या योजना कागदावरच राहात आहेत. कचरा समस्या सर्वच ग्रा. पं. ना भेडसावत आहे. त्यामुळेच सरकारकडून कचरा निर्मूलनासाठी पुढाकार घेतला आहे. कचऱ्याचे संकलन करण्यात यावे, त्याची योजनाबद्धरित्या विल्हेवाट लावण्यासाठी ग्रा. पं. ना पुढाकार घेण्यासाठी आवाहन केले आहे. मात्र, याची अंमलबजावणी होत नसल्याने सरकारच्या आवाहनाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
बादल्यांचा उपयोग पाणी भरण्यासाठी
जिल्ह्यातील 486 ग्रा. पं. ना कोट्यावधी रुपये खर्च करून राज्य सरकारकडून कचरावाहू वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कचरा संकलन करण्यासाठी ग्रा. पं. कडून घरोघरी प्लास्टिकच्या बादल्या वितरीत केल्या आहेत. मात्र, कचरावाहू वाहन ग्रा. पं. समोर पडून आहे. तर बादल्यांचा उपयोग पाणी भरण्यासाठी केला जात आहे. कचरा समस्येबाबत जनजागृती करण्यात ग्रा. पं. कडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने गावच्या वेशीवरच कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. ग्रा. पं. सदस्यांची उदासिनता व विकास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे शासनाचा कचरा निर्मूलन उद्देश कागदावरच आहे.
जागृतीचा अभाव
कोट्यावधी रुपये खर्च करूनही कचरावाहू वाहने धूळखात पडली आहेत. या वाहनांवर महिला चालक नेमण्यासाठी जि. पं. कडून 242 पेक्षा अधिक महिलांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. स्वसाहाय्य संघाच्या माध्यमातून कचरा संकलन करून कचरा खरेदी करण्याची योजना असली तरी जागृतीचा अभाव आहे.
टप्प्याटप्प्याने जागृती करणार
कचरा निर्मूलनावर शासनाकडून भर दिला आहे. योजनेची जिल्ह्यात अपेक्षित प्रमाणात अंमलबजावणी झाली नसली तरी बेळगाव तालुक्यात योजना समर्पकपणे राबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कचरा संकलनावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मॉनिटरींग अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही कचरा निर्मूलनासाठी जागृती करून सदर योजना यशस्वी करण्यात येईल.
– हर्षल भोयर, जि. पं. कार्यकारी अधिकारी