वार्षिक राशिभविष्य 2024 : वृश्चिक
यश मिळेपर्यंत जिद्द न सोडणाऱ्या व्यक्ती वृश्चिक राशीच्याच. प्रभावशाली व आकर्षक व्यक्तिमत्व. आयुष्यात या व्यक्तींना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. पुढे होणाऱ्या घटनांबाबत यांना बऱ्याचदा आधीच कल्पना आलेली असते. तसंच लोकांचा चेहरा वाचण्यात आणि स्वभाव जाणून घेण्यात या व्यक्ती तरबेज असतात.
चिन्ह – विंचू
राशीस्वामी – मंगल
शुभवार – मंगळवार
अशुभ वार – शुक्रवार
घात मास – आश्विन
शुभ रंग – लाल
भाग्यरत्न – पोवळा
आराध्य देवता-श्री गणेश व श्री दुर्गादेवी
आयुष्यात या व्यक्तींना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. प्रतिभा, पैसा आणि भाग्य यांची साथ देते. करिअरपासून ते अगदी नात्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत पॅशनशिवाय या व्यक्ती कामच करत नाहीत. ही पॅशनच त्यांना अपयश पचवायला मदत करते आणि अपयश मिळूनही यश मिळेपर्यंत या व्यक्ती प्रयत्न करत राहतात. ही सर्वात जास्त रहस्यमयी राशी म्हणून ओळखली जाते. या व्यक्ती अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्वाच्या असून कोणालाही सहज आकर्षित करू शकतात. आपल्या स्वभावाने आणि व्यक्तीमत्वाने जेथे जातात तेथे आपली छाप सोडतात. जोडीदाराची प्रत्येक लहान मोठी इच्छा पूर्ण करणे आपले कर्तव्य आहे, असंच यांना वाटते आणि त्या बदल्यात त्यांना जोडीदाराच्या प्रेमाशिवाय कोणतीही अपेक्षा नसते. प्रेम या व्यक्तींसाठी केवळ एक भावना नाही तर एक पॅशन आणि जबाबदारी आहे. पण प्रेम न मिळाल्यास, या व्यक्ती अत्यंत दुखावल्या जातात. तुम्ही या व्यक्तींचा विश्वास जिंकलात तर या व्यक्ती कधीही तुम्हाला दूर करत नाहीत. एखाद्या व्यक्तीसाठी कायम उभं राहणं आणि अगदी मनापासून प्रेम करणं आणि सतत पाठिंबा देणं हे या व्यक्तींचे वैशिष्ट्या आहे. आपले प्रत्येक काम योग्य असावे आणि ते व्यवस्थितच पार पडायला हवे याचा कायम प्रयत्न या व्यक्ती करतात. तसंच आपल्या जोडीदाराकडूनही त्यांची हीच अपेक्षा असते. कोणीही काहीही बोललं तरीही या व्यक्तींना फरक पडत नाही. पण जर जवळच्या व्यक्तींपैकी कोणी मन दुखावलं तर मात्र यांचा स्वत:वर ताबा राहत नाही. वृश्चिक राशीच्या व्यक्तींमध्ये कामाच्या बाबतीत अत्यंत संयम असतो. कितीही वेळा अपयश आले तरीही न डगमगता पुन्हा त्याच जिद्दीने या व्यक्ती ती गोष्ट मिळविण्याचा प्रयत्न करतात. साध्य होईपर्यंत सतत प्रयत्न करत राहणं हे त्यांचे वैशिष्ट्या आहे. यांना कोणत्याही गोष्टी सहजासहजी मिळत नाहीत. मेहनतीशिवाय कधीच या व्यक्तींना फळ मिळत नाही. भूतकाळात घडलेल्या गोष्टींशी यांचे अतूट नाते असते. आपल्या प्रत्येक पहिल्या गोष्टीबाबत या व्यक्ती अत्यंत हळव्या असतात आणि त्या गोष्टी जपून ठेवतात. या व्यक्तींची इंट्यूशन पॉवर अफलातून असते. पुढे होणाऱ्या घटनांबाबत यांना बऱ्याचदा आधीच कल्पना आलेली असते. तसंच लोकांचा चेहरा वाचण्यात आणि लोकांचा स्वभाव जाणून घेण्यात या व्यक्ती तरबेज असतात.
ग्रहमान
गुरु 1 मेपर्यंत तुमच्या सहाव्या स्थानात राहील आणि त्यानंतर सप्तम भावात राहील. तेव्हा वर्षाच्या उत्तरार्धात तुमचा तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत विवाहही होऊ शकतो. राहू तुमच्या पंचम भावात विराजमान असेल तर, केतूही एकादश भावात राहील. राहू आपल्यासाठी तितकेसे चांगले नाही, मुलांशी मतभेद होऊ शकतात, पोटाचे विकारसुद्धा उद्भवतील. केतुचे भ्रमण आपल्यासाठी शुभ ते मिश्र फळ देणारे असेल. विद्यार्थ्यांसाठी वर्ष काहीसे कमजोर राहणार आहे. शनी, तुमच्या चतुर्थ भावात आपल्या कुंभ राशीमध्ये विराजमान राहतील. ग्रहांचीही स्थिती तुमच्या जीवनाची दशा आणि दिशा दोन्ही बदलू शकते. तुम्हाला आर्थिक दृष्ट्या उन्नती करण्याच्या बऱ्याच संधी मिळतील. मे नंतर तुम्ही काही नवीन व्यवसाय सुरु करू शकता. किंवा आपल्याच वर्तमान व्यवसायाचा विस्तार करण्यावर विचारही करू शकता आणि त्यात तुम्हाला यशही मिळू शकते. विवाहासाठी वर्षभर उत्तम गुरुबळ आहे. शनी पूर्ण वर्ष चतुर्थ भावात राहून तुमच्या सहाव्या भाव आणि दशम भावावर दृष्टी ठेवतील. या कारणाने तुम्हाला आपल्या नोकरीमध्ये स्थिरता वाटेल. सूर्य देवाचे गोचर एप्रिलमध्ये जेव्हा तुमच्या सहाव्या भावात होईल तेव्हा ही वेळ नोकरीमध्ये मोठ्या पद प्राप्तीकडे इशारा करते. तुमच्यासाठी बृहस्पतीच्या सप्तम भावात जाणे ही अनुकूल परिणाम घेऊन येईल. वर्षाच्या पूर्वार्धात बृहस्पती सहाव्या भावात राहून काही आव्हानेही ठेऊ शकतो. यासाठी वित्तीय प्रबंधनावर लक्ष द्यावे लागेल.बृहस्पती सप्तम भावात जाऊन मे महिना तुमच्या एकादश, प्रथम आणि तृतीय भावाला पाहतील. यामुळे तुम्हाला वित्तीयदृष्ट्या चांगले होण्याची संधीही मिळेल. शनी आपल्या राशी कुंभमध्ये स्थित होऊन तुमच्या चतुर्थ भावात राहील परंतु, हे तुम्हाला कामात इतके व्यस्त करेल की, कुटुंबासाठी तुमच्याजवळ थोडा कमी वेळ असेल.
नोकरदार
आर्थिकदृष्ट्या ग्रहमान चांगले राहील. काही चढ-उतार असतील पण तुमच्या कामात यश मिळेल. उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे असतील. नोकरीत बदलही शक्य आहे. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. कुटुंबातील सदस्यांचे वागणे तुम्हाला आनंद देईल. तुमच्या आजूबाजूचे वातावरण खूप रोमँटिक असेल. प्रेमसंबंधांमध्येही आनंदाचे क्षण येतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तब्येत सुधारेल. खर्च कमी होतील आणि उत्पन्न स्थिर होऊ लागेल. यासोबतच शुभ धनलाभाचे योगही येतील. अचानक धन प्राप्ती होऊ शकते, काही प्रकारची वडिलोपार्जित मालमत्ता किंवा वारसा मिळण्याचीही शक्यता आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. यामुळे तुमचा आत्मविश्वास परत येईल, तुम्ही पूर्ण मनोबलाने काम कराल. दीर्घकाळ प्रवास कराल. काही सुंदर ठिकाणी जाऊन कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधही घट्ट होतील. काही नवीन कौशल्येही शिकता येतील. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर मिळू शकते. वर्षाच्या सुरुवातीला भावंडांसोबत तणाव वाढेल, परंतु, मे पासून परिस्थिती चांगली राहील आणि तुम्हाला त्यांचे सहकार्य मिळेल. तुमच्या सर्व आर्थिक आव्हानांपासून दूर व्हाल. धर्मकर्म आणि इतर महत्त्वाच्या कामांवर खर्च होणार, तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत अधिक गंभीर व्हाल. आणि आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. जुनाट आजारांपासून हळूहळू मुक्ती मिळेल. हे वर्ष तुमचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व वाढवेल. तुम्ही एक परिपूर्ण व्यक्ती व्हाल आणि जीवनात यश मिळवाल. हे वर्ष तुमच्याकडून खूप मेहनत करवून घेईल. तुमच्या करिअरमध्ये स्थायित्व येईल.वर्षाच्या सुरवातीला आर्थिक आव्हाने राहतील. परंतु, तुम्ही त्या आव्हानांचा सामना करून हळुहळू आपल्या वित्तीय स्थितीला मजबूत बनवण्यात यशस्वी व्हाल.
स्त्री वर्ग
आर्थिक लाभ होतील. जिथे हात लावाल तिथे पैसे येण्याची शक्यता आहे. ही वेळ तुमच्या मनोकामना पूर्ण करण्याची असेल. तुम्हाला हवे ते करू शकता. तुमच्या प्रेम प्रकरणात चांगले यश मिळेल आणि तुमचे नाते परिपक्व होईल. या काळात तब्येत सुधारेल. रखडलेल्या कामांना गती मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल. एकमेकांप्रती भक्ती, आकर्षण आणि रोमान्सची भावना निर्माण होईल. या काळात तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी आनंद मिळावा असे वाटेल आणि तुमचा व्यवसायही भरभराटीला येईल. या वर्षी तुम्हाला प्रवासाचे योग येतील आणि धार्मिक स्थळांना भेटी द्याल. यामुळे तुम्हाला जीवनात ताजेपणा आणि नाविन्यता जाणवेल. आनंद आणि शांती प्राप्त होईल आणि नवीन ऊर्जा जाणवेल. तुमच्या सध्याच्या निवासस्थानात बदल होऊ शकतो. तुमचे घर बदलू शकते किंवा कुटुंबापासून थोडे अंतर लांब असू शकते. मानसिक तणावात किंचित वाढ होण्याची शक्यता. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. काही जुनी गुपितेही बाहेर येऊ शकतात, करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. तुमचे अधिकार वाढतील. सन्मान मिळेल. तुमच्या क्षेत्रातील काम पाहता तुम्हाला चांगली बढती आणि पगारवाढ मिळू शकते. व्यवसायातही प्रगतीची संधी मिळेल. तुमच्या कामामुळे तुम्ही खूप व्यस्त असाल आणि कुटुंबाला कमी वेळ देऊ शकाल. तुमच्या सर्व प्रयत्नांचे एकत्रित परिणाम म्हणजे तुमच्यावर पैशांचा वर्षाव होईल. तुम्ही उत्साही व्हाल. रोगप्रतिकारशक्ती वाढेल. तथापि, तुमच्या स्वभावात थोडासा राग देखील वाढू शकतो, व्यवसायात प्रगती होईल आणि चांगल्या लोकांचे सहकार्य मिळेल. घर बांधण्यात किंवा स्थावर मालमत्ता खरेदी करण्यात यश मिळू शकते.
विद्यार्थी वर्ग
विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष खूप चांगले जाणार आहे. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे. दुसरीकडे, कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जन्मस्थानापासून दूर जावे लागेल. वर्षाचा मध्यकाळ विद्यार्थ्यांसाठी आव्हाने घेऊन येईल, त्यामुळे विद्यार्थ्यांना नेहमीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. गुरूच्या शुभदृष्टीचा लाभही तुम्हाला मिळेल आणि तुमच्या प्रयत्नांना यशही मिळेल. पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल आहे. शालेय विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होऊन एकाग्रतेमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.