अंगणवाड्या नवीन मेन्यूपासून वंचित

संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : अनेक बालक पौष्टिक आहारापासून दूर बेळगाव : राज्यभरात अंगणवाडीतील बालकांना देण्यात येणाऱ्या आहाराच्या मेन्यूमध्ये बदल करण्यात आला आहे. 15 जानेवारीपासून तयार फूडपॅकेट वाटप केले जात आहेत. मात्र जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नवीन आहारापासून बालकांना वंचित रहावे लागले आहे. बालकांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाने गतवर्षी मेन्यूमध्ये बदल करण्याचे आदेश दिले होते. […]

अंगणवाड्या नवीन मेन्यूपासून वंचित

संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : अनेक बालक पौष्टिक आहारापासून दूर
बेळगाव : राज्यभरात अंगणवाडीतील बालकांना देण्यात येणाऱ्या आहाराच्या मेन्यूमध्ये बदल करण्यात आला आहे. 15 जानेवारीपासून तयार फूडपॅकेट वाटप केले जात आहेत. मात्र जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नवीन आहारापासून बालकांना वंचित रहावे लागले आहे. बालकांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाने गतवर्षी मेन्यूमध्ये बदल करण्याचे आदेश दिले होते. यानुसार 15 जानेवारीपासून राज्यातील अंगणवाडी केंद्रातील बालकांना गोड पदार्थ आणि बाजरीचे लाडू दिले जात आहेत. मात्र बेळगाव जिल्हा यापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे बालकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होवू लागला आहे. बालकांना भात देण्याऐवजी तीन दिवस खिचडी आणि तीन दिवस बाजरीचे लाडू देण्याची सूचना करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील 5 हजार 531 अंगणवाडी केंद्रे आहेत. अलिकडे यामध्ये नवीन लहान, मोठ्या अंगणवाडी केंद्रांची भर पडली आहे. या केंद्रांमध्ये बालक, गर्भवती महिला आणि बाळंतिणींना पौष्टिक आहार दिला जातो. शिवाय क्षीरभाग्य योजनेंतर्गत बालकांना दूध पावडर दिली जाते. मात्र मागील वर्षभरापासून दूध पावडरचा पुरवठाही बंद झाला आहे. त्यामुळे बालकांच्या कुपोषणाची भीती व्यक्त होवू लागली आहे. बालकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी पौष्टिक आहार पुरविणे आवश्यक आहे. मात्र बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे बालकांना सकस आहारापासून दूर रहावे लागले आहे. बेळगाव जिल्ह्यातील महिला व बाल कल्याण खात्याच्या सहसंचालकपदासाठी मागील काही दिवसांपासून रस्सीखेच सुरू आहे. याचा परिणाम शासनाच्या सुविधा पुरविण्यावर होवू लागला आहे. मध्यंतरी सहसंचालकांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोपही झाला होता. त्याबरोबर सहसंचालक खुर्ची मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांची धडपड सुरू आहे. यामुळे बालकांना आहार पुरविण्याकडे दुर्लक्ष होवू लागले आहे. केएमएफने जिल्ह्यातील निम्या भागात दूध पावडरचा पुरवठा बंद केला आहे. जोपर्यंत सुधारित किंमत यादी सरकारकडून मंजूर होत नाही, तोपर्यंत दूध पुरवठा सुरू होणार आहे, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे.
लवकरच अंगणवाडी केंद्रांना दूध पावडरचा पुरवठा
संपूर्ण राज्यात नवीन मेन्यूचे वाटप केले जात आहे. बेळगाव जिल्ह्यातही हे नवीन मेन्यू दिले जात आहेत की नाही, याची तपासणी केली जाणार आहे. केएमएफने दूध दरात वाढ केल्याने काही भागात दूध पुरवठा थांबला आहे. केएमएफला नवीन सुधारित यादी दिली जाणार आहे. त्यानंतर अंगणवाडी केंद्रांना दूध पावडरचा पुरवठा होणार आहे.
 – मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर-महिला व बाल कल्याण खाते