गृहज्योतीपासून अंगणवाड्या वंचित

मोफत वीजपुरवठा करण्याच्या योजनेत समावेश करण्याची मागणी : आठ महिन्यांपासून बिले थकीत, कारभार अंधारात बेळगाव : गृहज्योती योजनेंतर्गत सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा व महाविद्यालयांना मोफत वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यातून अंगणवाड्यांना वगळण्यात आले आहे. आधीच अंगणवाडी इमारतींची वीज बिलासाठी मिळणारे अनुदान वेळेत दिले जात नाही. त्यामुळे काही अंगणवाड्यांची वीजबिल थकबाकी आहे. […]

गृहज्योतीपासून अंगणवाड्या वंचित

मोफत वीजपुरवठा करण्याच्या योजनेत समावेश करण्याची मागणी : आठ महिन्यांपासून बिले थकीत, कारभार अंधारात
बेळगाव : गृहज्योती योजनेंतर्गत सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा व महाविद्यालयांना मोफत वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यातून अंगणवाड्यांना वगळण्यात आले आहे. आधीच अंगणवाडी इमारतींची वीज बिलासाठी मिळणारे अनुदान वेळेत दिले जात नाही. त्यामुळे काही अंगणवाड्यांची वीजबिल थकबाकी आहे. अशा परिस्थितीत गृहज्योतीतून अंगणवाडींना वगळण्यात आल्याने नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. राज्यात 21,045 सरकारी पूर्व प्राथमिक शाळा, 22068 उच्च प्राथमिक शाळा तर 5051 माध्यमिक शाळा व 1497 पदवीपूर्व महाविद्यालये आहेत. अशा एकूण 49,679 सरकारी शाळा, महाविद्यालयांना येत्या शैक्षणिक वर्षापासून मोफत वीजपुरवठा केला जाणार आहे. याबाबतचा आदेश नुकताच राज्य सरकारने जारी केला आहे. मात्र, यातून राज्यातील 62,580 अंगणवाडी केंद्रांना डच्चू देण्यात आले आहे.
जिल्ह्यात 5531 लहान मोठी अंगणवाडी केंद्रे
जिल्ह्यात 5531 लहान-मोठी अंगणवाडी केंद्रे आहेत. या अंगणवाडी केंद्रांमध्ये विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. काही अंगणवाडी केंद्रांमध्ये लाईट, फॅन आणि विजेची उपकरणे वापरली जातात. त्यामुळे अंगणवाडी केंद्रांमध्ये विजेचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. महिन्याकाठी वीज बिलही येते. मात्र, शासनाकडून वेळेत अनुदान दिले जात नाही. त्यामुळे वीजबिल भरण्याचा प्रश्न अंगणवाडी सेविकांसमोर उभा ठाकतो. अशा परिस्थितीत गृहज्योती अंतर्गत अंगणवाड्यांना मोफत विजेचा पुरवठा करावा, अशी मागणी सेविकांतून होऊ लागली आहे. लहान मुलांना घडविण्याचे काम अंगणवाडी केंद्रामधून केले जाते. मात्र याच अंगणवाडी केंद्रांना गृहज्योती योजनेतून वगळल्याने संताप व्यक्त होऊ लागला आहे. तर काही अंगणवाडी केंद्रांना अद्यापही वीज आणि पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते.
महिला व बाल कल्याण खात्याकडून खर्च मंजूर नाही
इमारत आहे मात्र वीज आणि पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे बालकांच्या शैक्षणिक जीवनावर परिणाम होऊ लागला आहे. काही अंगणवाडी केंद्रांची वीजबिले थकली आहेत. दरम्यान वीज वितरण कंपनीकडून बिलासाठी तगादा लावला जातो आहे. मात्र मागील काही दिवसापासून अनुदानच उपलब्ध झाले नसल्याने वीजबिल थकले आहे. बालविकास खात्याकडून तीन महिन्यातून एकदा मिळणारे प्रशासकीय खर्चातून वीजबिल, पाणीपट्टी भरली जाते. मात्र मागील आठ महिन्यांपासून महिला व बाल कल्याण खात्याकडून खर्च मंजूर झाला नसल्याने बिले थकीत आहेत. त्यामुळे अंगणवाडीचा कारभार अंधारात सुरू आहे.
विजेची नितांत गरज : विमल इंगोले (अंगणवाडी मदतनीस)
अंगणवाडी केंद्रामध्ये वीज व्यवस्था आहे. मात्र वीजपुरवठा बंद आहे. त्यामुळे अंधारात शैक्षणिक कार्य चालते. गृहज्योती योजनेंतर्गत वीजपुरवठा सुरळीत करावा. लहान बालकांना आणि गर्भवती महिलांना आहार तयार करावा लागतो. त्यामुळे विजेची नितांत गरज आहे.