अन् रात्री 9 वाजता विद्यार्थी पोहोचले घरी!

गोल्याळी बससेवा विस्कळीत : विद्यार्थी, ग्रामस्थांची हेळसांड : परिवहनच्या कारभाराबाबत संताप बेळगाव : गोल्याळी येथील बससेवा अनियमित झाल्याने विद्यार्थी आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. सोमवारी बससेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांना दुपारी 2 पासून आगारातच बसावे लागले. शिवाय रात्री घरी पोहोचायला 9 वाजले. या प्रकारामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थांतून परिवहनच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे. गोल्याळी […]

अन् रात्री 9 वाजता विद्यार्थी पोहोचले घरी!

गोल्याळी बससेवा विस्कळीत : विद्यार्थी, ग्रामस्थांची हेळसांड : परिवहनच्या कारभाराबाबत संताप
बेळगाव : गोल्याळी येथील बससेवा अनियमित झाल्याने विद्यार्थी आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. सोमवारी बससेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांना दुपारी 2 पासून आगारातच बसावे लागले. शिवाय रात्री घरी पोहोचायला 9 वाजले. या प्रकारामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थांतून परिवहनच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे. गोल्याळी गावाला बेळगाव आगारातून बससेवा दिली जाते. मात्र शक्ती योजनेमुळे प्रवाशांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी गावची बससेवा विस्कळीत झाली आहे. बसफेऱ्या कमी झाल्याने विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांची हेळसांड होवू लागली आहे. बसफेऱ्या अनियमित झाल्याने सकाळपासून रात्रीपर्यंत बसच्या प्रतीक्षेतच थांबावे लागत आहे. यामध्ये महिला आणि विद्यार्थिनींची कुचंबना होवू लागली आहे. सोमवारी दुपारनंतर गावाला जाणारी बसफेरीच बंद करण्यात आली. त्यामुळे 50 ते 60 विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी डेपो मॅनेजरला गाठले. दरम्यान मॅनेजरनी बस चालक आणि वाहकाची कमतरता असल्याचे कारण पुढे केले.
बस सोडेपर्यंत येथून हलणार नाही
दरम्यान विद्यार्थ्यांनी बस स्थानकालाच घेराव घातला. शिवाय जोपर्यंत बस सोडणार नाही तोपर्यंत आपण येथून हलणार नाही, अशी भूमिका घेतली. दरम्यान डेपो मॅनेजरला तजवीज करून बसची व्यवस्था करावी लागली. मात्र दुपारपासून ताटकळत थांबलेल्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचायला रात्रीचे 9 वाजले. या प्रकाराबाबत विद्यार्थी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
शक्ती योजनेमुळे बसची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे विविध मार्गावर बस फेऱ्या कमी झाल्या आहेत. परिणामी वसतीच्या बसफेऱ्याही बंद केल्या जात आहेत. त्यामुळे रात्री उशीराने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. विशेषत: शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल होवू लागले आहेत. दुपारी शाळा आणि कॉलेजचे सुटलेले विद्यार्थी रात्री उशीरापर्यंत ताटकळत थांबलेले पहावयास मिळत आहेत. त्यामुळे शैक्षणिक जीवनावर परिणाम होवू लागला आहे. विद्यार्थ्यांना उपाशीपोटी रात्री 9 वाजेपर्यंत बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. रात्री घरी पोहोचायला उशीर होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

Go to Source