आनंदनगरवासियांची पुन्हा सोमवारी रात्री उडाली झोप

महिलांच्या नजरेला चोरटा पडल्याच्या प्रतिक्रिया : गेल्या 15 दिवसांपासून चोरट्याचा अक्षरश: धुमाकूळ बेळगाव : आताच पाहिला, कडीचा आवाज आला, कुत्रा भुंकला, येथूनच पळाला, असे म्हणत आनंदनगरमधील काही महिलांनी त्या चोरट्याबाबत पुन्हा संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या हाकेला ओ देऊन तातडीने दाखल झालेल्या तरुणांनी मात्र परिसर पिंजून काढला तरी तो चोरटा हाती लागला नाही. मात्र आनंदनगरवासियांच्या […]

आनंदनगरवासियांची पुन्हा सोमवारी रात्री उडाली झोप

महिलांच्या नजरेला चोरटा पडल्याच्या प्रतिक्रिया : गेल्या 15 दिवसांपासून चोरट्याचा अक्षरश: धुमाकूळ
बेळगाव : आताच पाहिला, कडीचा आवाज आला, कुत्रा भुंकला, येथूनच पळाला, असे म्हणत आनंदनगरमधील काही महिलांनी त्या चोरट्याबाबत पुन्हा संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या हाकेला ओ देऊन तातडीने दाखल झालेल्या तरुणांनी मात्र परिसर पिंजून काढला तरी तो चोरटा हाती लागला नाही. मात्र आनंदनगरवासियांच्या मनातील भीती काही कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे आनंदनगरवासियांना मोठा धक्का बसला असून सारेच तणावाखाली असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी रात्री चोरट्याने काही घरांच्या कडीकोयंडा तोडण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रतिक्रिया महिलांनी दिल्या आहेत. रात्री 1.30 वाजता एका वृद्ध महिलेला जाग आली. त्यावेळी तिला समोरील घराच्या कडीचा आवाज आला. त्यामुळे तिने घरातूनच वाकून पाहिले असता कोण तरी असल्याचे तिला निदर्शनास आले. यामुळे तिने आरडाओरड केली. तेथून त्याने पलायन केल्याचे त्या वृद्ध महिलेने सांगितले. तर पहाटे 5 च्या सुमारास आणखी एका ठिकाणी तो दिसल्याचे काही महिलांनी सांगितले. या प्रकारामुळे पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या 15 दिवसांपासून चोरट्याने आनंदनगर परिसरात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अनेक घरे फोडली, लाखोंचा माल लंपास केला आहे. त्याला पकडण्यासाठी पोलीस प्रशासनाबरोबरच तरुणही गस्त घालत आहेत. मात्र चोरटा काही हाती लागत नाही. साऱ्यांचीच या चोरट्याने झोप उडविली आहे. पोलीस गस्त घालत आहेत. मात्र त्याचाही काहीच उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. चोरट्याच्या मनात कोणतीच भीती नाही का? असा प्रश्नदेखील आता उपस्थित होत आहे. यापूर्वी एखाद्या भागात चोरी झाल्यानंतर चोरटे इतरत्र चोरी करत होते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये आनंदनगर, केशवनगर, साई कॉलनी, अनगोळ येथील कनकदास कॉलनी या परिसरातच चोरट्याने डल्ला मारला आहे. सध्या लग्न व इतर समारंभांची धामधूम सुरू आहे. त्यामुळे अनेकांना परगावी जावे लागते. मात्र या चोरीच्या मालिकेमुळे परिसरातील जनतेने बाहेर जाणेच बंद केले आहे.
लहान मुले भीतीच्या छायेखाली…
या वाढत्या घटनांमुळे मुलांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. आई-वडील किंवा ज्येष्ठांना बिलगूनच ती वावरत आहेत. एखाद्या रूममधून दुसऱ्या रूममध्ये जाण्यास मुले तयार नाहीत. आई-वडील किंवा ज्येष्ठ उठून बाजूला बसले तरी ती मुले त्यांच्या शेजारीच येत आहेत. यामुळे अक्षरश: मुलांची अवस्था गंभीर बनली आहे. काही तर आजारी पडली आहेत, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. पोलिसांनी चोरट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.