पाणी समस्या निवारणासाठी प्रशासनाकडून कसरत
तालुका अधिकाऱ्यांना निविदा मागविण्याची सूचना
बेळगाव : जिल्ह्यात पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. यासाठी जिल्हा पंचायतीकडून तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना राबविण्यासाठी सूचना करण्यात आली आहे. पाणी असलेल्या विहिरी व कूपनलिका मालकांशी संवाद साधून भाडेतत्त्वावर पाणी घेण्यासाठी बोलणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. तर काही तालुक्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी निविदा मागविण्याची तयारी सुरू आहे. जिल्ह्यात बहुग्राम पाणी पुरवठा योजनांसह जलजीवन मिशन अंतर्गत केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाली आहे. पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या तलाव व नद्यांचे पाणी आटले आहे. नद्या कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे नद्यांच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या बहुग्राम पाणीपुरवठा योजनेंतर्गत केला जाणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. सीमावर्ती भागातील अनेक गावांना बहुग्राम पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. सदर नद्या कोरड्या पडल्याने महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी पाण्यासाठी संवाद साधला जात आहे.
ताम्रपर्णी नदीतून पाणी सोडण्यासाठी प्रयत्न
घटप्रभा नदीवर अवलंबून असणाऱ्या बहुग्राम पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा करण्यासाठी ताम्रपर्णी नदीतून पाणी सोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र महाराष्ट्रातील प्रशासनाकडून अद्याप कोणताच प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला उपलब्ध पाण्याच्या स्तोत्रांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासाठी तयारी करावी लागली आहे. तालुकास्तरीय अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून घेऊन पाणी पुरवठ्यासाठी निविदा मागविण्याची सूचना करण्यात आली आहे.
टँकरने पाणी पुरवठ्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू
पाण्याची समस्या निर्माण झालेल्या तालुक्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली आहे. टँकरने पाणी पुरवठा याकरिता निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
– राहुल शिंदे-जि. पं. सीईओ
समस्या निवारणासाठी वॉटरशेड योजना राबवा : अहिंद वकील संघटनेचे जिल्हा पंचायतीला निवेदन
ग्रामीण भागात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांवर स्थलांतर होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पाण्याची कायमस्वरुपी समस्या निवारण करण्यासाठी वॉटरशेड योजना राबविण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन अहिंद वकील संघटनेतर्फे जि. पंचायत योजना अधिकाऱ्यांना देण्यात आले. पावसाअभावी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. ग्रामीण भागामध्ये नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची गरज आहे. बेळगाव तालुक्यातील बंबरगा, कट्टणभावी, निंगेनट्टी, गुरामट्टी या गावांमध्ये समाजसेवक डॉ. शिवाजी कागणीकर यांच्या पुढाकारातून वॉटरशेड योजना राबवून या गावांमधील पाण्याची समस्या दूर करण्यात आली आहे. या योजनेची दखल राष्ट्र पातळीवर घेण्यात आली आहे. यामुळेच मेघालय, पश्चिम बंगाल, राजस्थान इतर राज्यांमधील वनाधिकाऱ्यांकडून योजनेची माहिती घेतली जात आहे. बेळगाव तालुक्यामध्येही अशा प्रकारे वॉटरशेड योजना राबवून ग्रामीण भागात निर्माण झालेली पाण्याची समस्या कायमस्वरुपी दूर करण्यात यावी, अशी मागणी सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी अॅड. एन. आर. लातूर, अॅड. अनिल शिंदे, अॅड. के. के. यादगुडे, अॅड. विनोद पाटील, अॅड. निंगाप्पा मास्ती, अॅड. दऱ्याप्पा बिळगे, अॅड. रुपेश लातूर, अॅड. शितल बैलवार यांच्यासह आदी उपस्थित होते.


Home महत्वाची बातमी पाणी समस्या निवारणासाठी प्रशासनाकडून कसरत
पाणी समस्या निवारणासाठी प्रशासनाकडून कसरत
तालुका अधिकाऱ्यांना निविदा मागविण्याची सूचना बेळगाव : जिल्ह्यात पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. यासाठी जिल्हा पंचायतीकडून तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना राबविण्यासाठी सूचना करण्यात आली आहे. पाणी असलेल्या विहिरी व कूपनलिका मालकांशी संवाद साधून भाडेतत्त्वावर पाणी घेण्यासाठी बोलणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. तर काही तालुक्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी निविदा मागविण्याची तयारी सुरू आहे. जिल्ह्यात बहुग्राम […]