खानापुरात नवीन वर्षाचे उत्साही स्वागत

ओल्डमॅनच्या प्रतिकृती जाळून मावळत्या वर्षाला दिला निरोप :  अनेक ठिकाणी पार्ट्यांचे नियोजन खानापूर : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहाने करण्यात आले. यावर्षी दि. 31 डिसेंबर रविवारी आल्याने सकाळपासूनच सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. ठिकठिकाणी ओल्डमॅनच्या प्रतिकृती तयार करून उभारण्यात आल्या होत्या. तर मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वत्र पार्ट्यांचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी […]

खानापुरात नवीन वर्षाचे उत्साही स्वागत

ओल्डमॅनच्या प्रतिकृती जाळून मावळत्या वर्षाला दिला निरोप :  अनेक ठिकाणी पार्ट्यांचे नियोजन
खानापूर : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहाने करण्यात आले. यावर्षी दि. 31 डिसेंबर रविवारी आल्याने सकाळपासूनच सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. ठिकठिकाणी ओल्डमॅनच्या प्रतिकृती तयार करून उभारण्यात आल्या होत्या. तर मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वत्र पार्ट्यांचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी रविवार सकाळपासूनच तयारी सुरू होती. काही युवक आणि ज्येष्ठांनी पश्चिम आणि दक्षिण भागातील निसर्गरम्यस्थळी मावळत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजन केले होते. रात्री 12 नंतर मावळत्या वर्षाला निरोप देऊन जल्लोषी स्वागत करण्यात आले.
चर्चमधून प्रार्थना
रविवारी मध्यरात्री खानापूरच्या केंचापूर गल्लीतील मिलाग्रीज चर्चमध्ये रात्री 11.30 वाजता प्रार्थनेला सुरुवात झाली. 1.30 वाजता प्रार्थना संपल्यानंतर चर्चच्या आवारात ओल्डमॅन जाळण्यात आला. यावेळी चर्चचे प्रमुख फादर कुस्तास लिमा, फादर पेट्रीक यांनी प्रार्थनेचे अधिष्ठान केले. या प्रार्थनेला ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित ख्रिस्ती बांधवांना केक व कॉफीचा प्रसाद वाटण्यात आला. या चर्चप्रमाणेच मन्सापूर, हरसनवाडी, बिडी, संगरगाळी, कक्केरी येथील चर्चमध्येही मुख्य प्रार्थनेसह ओल्डमॅन प्रतिमेचे दहन करण्यात आल्यानंतर नवीन वर्षाचे उत्साही स्वागत करण्यात आले.
गोवा मार्गावर वाहतूक कोंडी
शहरात तसेच तालुक्याच्या विविध ठिकाणी रविवारी रात्री 12 वाजता ओल्डमॅनची प्रतिकृती दहन करण्यात आली. फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. यानिमित्त तालुक्यातील काही मंदिरांत भजन, कीर्तनाचेही कार्यक्रम झाले. तसेच बऱ्याच ठिकाणी विशेषत: शेतवडीत निसर्गरम्य स्थानावर मेजवानीचेही आयोजन करण्यात आले होते.  तसेच खानापूर, नंदगड, जांबोटी येथील हॉटेलमध्ये तसेच धाब्यांवर पार्टीसाठी मोठी गर्दी झाली होती. यानिमित्त हॉटेल्सनाही विद्युतरोषणाई करण्यात आली होती. तसेच तालुक्याच्या पश्चिम भागात अनेक ठिकाणी रिसॉर्टस् झाली आहेत. त्यामध्ये मावळत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतानिमित्त मेजवानीसाठी बरीच गर्दी होती. गेल्या आठ दिवसापासून गोव्याला जाण्यासाठी खानापूर, हेम्माडगा, अनमोडमार्गे तसेच बेळगाव, चोर्लामार्गे वाहनांचीही मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू होती. वाहनांच्या वाढत्या गर्दीमुळे काहीवेळा ट्रॅफीक जॅमचे प्रसंगही निर्माण होत होते.