आंबोली पर्यटकांनी तुडुंब

वाहतूक खोळंबली : कावळेसाद पॉईंटकडे जाणारी वाहतूक रोखली वार्ताहर /आंबोली आंबोलीत रविवारी पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. पर्यटक आणि गाड्यांची संख्या जास्त असल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. पोलीस भरती प्रक्रियेमुळे बंदोबस्त कमी असल्याने त्याचा फटका वाहनचालकांना बसला. एसटीमधील प्रवासी अडकून पडले होते. मुसळधार पावसाच्या प्रवाहामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून पर्यटकांना मुख्य धबधब्यापर्यंत जाण्यापासून काहीवेळ रोखण्यात आले. तर हिरण्यकेशी नदीला पूर आल्याने गेळे येथील […]

आंबोली पर्यटकांनी तुडुंब

वाहतूक खोळंबली : कावळेसाद पॉईंटकडे जाणारी वाहतूक रोखली
वार्ताहर /आंबोली
आंबोलीत रविवारी पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. पर्यटक आणि गाड्यांची संख्या जास्त असल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. पोलीस भरती प्रक्रियेमुळे बंदोबस्त कमी असल्याने त्याचा फटका वाहनचालकांना बसला. एसटीमधील प्रवासी अडकून पडले होते. मुसळधार पावसाच्या प्रवाहामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून पर्यटकांना मुख्य धबधब्यापर्यंत जाण्यापासून काहीवेळ रोखण्यात आले. तर हिरण्यकेशी नदीला पूर आल्याने गेळे येथील पुलावर पुराचे पाणी येऊन कावळेसाद पॉईंटकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे नुकसान झाले. कावळेसादकडे जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांवर पुराचे पाणी आल्याने तेथे जाणारी वाहतूक ठप्प होती.
आंबोलीत पावसाळी पर्यटन सुरू झाल्यानंतर रविवारी पर्यटकांची गर्दी होणार हे निश्चित होते. जवळपास 50 हजार पर्यटक आंबोलीत दाखल झाले होते. पर्यटक आणि त्यांची वाहने यामुळे घाटात पाच कि. मी. च्या पट्ट्यात वाहतूक कोंडी झाली. गर्दीमुळे हॉटेल व्यावसायिकाचा धंदा झाला नाही. कारण वाहनांची गर्दी असल्याने पर्यटकांनी पुढे जाणे पसंत केले. पार्किंग व्यवस्था असती तर धंदा झाला असता. ज्यांची रस्त्याकडेला हॉटेल्स आहेत त्यांचे हाल झाले. घाटातील पर्यटकांची गर्दी पाहून फॉरेस्ट चेकपोस्ट येथे वाहने थांबवून ती चौकुळ रस्त्याला पार्क केली, त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचा धंदा झाला नाही. नेहमीप्रमाणे सायंकाळी पाच वाजता पर्यटकांना धबधब्याकडे जाण्यास बंदी घालण्यात आली.