अ‍ॅमेझॉनच्या नव्या तंत्रज्ञानानं वादाला तोंड फोडलेलं ‘एआय वॉशिंग’ म्हणजे काय आहे?

अ‍ॅमेझॉननं यावर्षी ‘जस्ट वॉक आऊट’ (Just Walk Out) हे तंत्रज्ञान आपल्या किराणा मालाच्या दुकानांमध्ये बसवल्यानंतर त्यांच्यावर टीका करणाऱ्या बातम्या प्रसारित झाल्या.अ‍ॅमेझॉनच्या ‘जस्ट वॉक आऊट’ या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेवर …
अ‍ॅमेझॉनच्या नव्या तंत्रज्ञानानं वादाला तोंड फोडलेलं ‘एआय वॉशिंग’ म्हणजे काय आहे?

अ‍ॅमेझॉननं यावर्षी ‘जस्ट वॉक आऊट’ (Just Walk Out) हे तंत्रज्ञान आपल्या किराणा मालाच्या दुकानांमध्ये बसवल्यानंतर त्यांच्यावर टीका करणाऱ्या बातम्या प्रसारित झाल्या.अ‍ॅमेझॉनच्या ‘जस्ट वॉक आऊट’ या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणालीमुळे ‘अमेझॉन फ्रेश’ आणि ‘अ‍ॅमेझॉन गो’ या दुकांनामधील खरेदीचं स्वरूप बदललं आहे. या नव्या प्रणालीमुळे ग्राहक त्यांना हवा असणारा माल किंवा वस्तू घेऊन सहजपणे दुकानातून बाहेर पडू शकतात. नेहमीप्रमाणे त्यांना काऊंटरवर जाऊन कोणकोणत्या वस्तू घेतल्या आहेत, त्याचं बिल किती झालं आहे हे सोपस्कार करण्याची गरज पडणार नाही.

 

आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित या सुविधेत दुकानात असंख्य सेन्सर्स लावलेले असतात. ग्राहक जेव्हा एखादी वस्तू घेतात तेव्हा या सेन्सर्सच्या माध्यमातून त्या वस्तूची ओळख पटवली जाते आणि ग्राहकांचे बिल ऑटोमॅटिक तयार होतं.

 

मात्र, एप्रिल महिन्यात अ‍ॅमेझॉनच्या या सेवेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या बातम्या सर्वत्र आल्या. फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ‘जस्ट वॉक आऊट’ काम करू शकत नाही, तर भारतातील स्टोअरमध्ये त्यांना यासाठी जवळपास 1,000 कर्मचाऱ्यांची गरज पडते आहे.

 

ग्राहकांनी केलेल्या व्यवहारांमधील जवळपास तीनचतुर्थांश भाग त्यांना मनुष्यबळाचा वापर करून तपासावा लागतो आहे, असं या बातम्यांमध्ये म्हटलं होतं.

 

अ‍ॅमेझॉननं मात्र लगेचच या बातम्या चुकीच्या असल्याचं सांगितलं. अ‍ॅमेझॉनचं म्हणणं होतं की, भारतातील त्यांचे कर्मचारी सर्व दुकानांमधून व्हीडिओ फुटेज पाहत नव्हते.

या सर्व विषयाबाबत खुलासा करताना अ‍ॅमेझॉनचं म्हणणं होतं की, भारतातील कर्मचारी फक्त त्यांच्या प्रणालीचा आढावा घेत होते.

 

अ‍ॅमेझॉननं पुढं असंही सांगितलं की, “अतिशय अचूकतेनं काम करणाऱ्या इतर कोणत्याही आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणालीपेक्षा ही प्रणाली वेगळी नाही. अशा प्रणालींमध्ये माणसांकडून प्रणालीवर लक्ष ठेवणं ही सामान्य बाब असते.”

 

अ‍ॅमेझॉनच्या प्रकरणातला नेमका तपशील काहीही असो, पण हे एका नवीन स्वरुपाच्या आणि वाढत्या प्रमाणात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उच्च पातळीवरचं उदाहरण आहे. हा प्रश्न म्हणजे आर्टिफिशियल तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत कंपन्यांकडून अतिशयोक्तीपूर्ण दावे केले जातात का?

 

अलीकडच्या काळात आर्टिफिशियल तंत्रज्ञान आणि त्याचा वापर हा मोठा ट्रेंड बनला आहे. त्यामुळे अनेकदा कंपन्यांकडून त्यांच्या सेवांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचं सांगितलं जातं. या प्रकारच्या गोष्टीला आर्टिफिशियल इंटेलिजन्स वॉशिंग (AI Washing) असं म्हटलं जातं. त्याचा संदर्भ पर्यावरणाच्या बाबतीत वापरल्या जाणाऱ्या ग्रीन वॉशिंग (Green Washing) या संकल्पनेशी आहे. म्हणजेच प्रत्यक्षात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पूर्णपणे किंवा सक्षम वापर होत नसताना तसा तो होत असल्याचं सांगणं.

 

(ग्रीन वॉशिंग म्हणजे एखादं उत्पादन, सेवा किंवा कृतीचे पर्यावरणासंदर्भात असणाऱ्या फायद्यांबद्दल खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती देणं किंवा प्रचार करणं. अनेकदा एखादं उत्पादन किंवा सेवा ही पर्यावरणपूरक असल्याचं ग्राहकांना भासवलं जातं. प्रत्यक्षात तशी ती नसतेही.)

 

मात्र, त्याआधी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेची निश्चित अशी कोणतीही व्याख्या नसली तरी सोप्या भाषेत या तंत्रज्ञानामुळं कॉम्प्युटर्सना समस्या किंवा अडचणींबद्दल शिकता येतं, जाणून घेता येतं आणि त्यातून मार्ग काढता येतो. यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स असणाऱ्या प्रणालींना प्रचंड प्रमाणात माहिती देऊन त्याआधारे प्रशिक्षित केलं जातं. त्यानंतर मग या तंत्रज्ञानाचा वापर करून या प्रणाली काम करतात.

 

अलीकडच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सर्वत्र चर्चा होते आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे त्याच्या वापरानुसार वेगवेगळे प्रकार आहेत. मागील काही वर्षात ज्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सर्वाधिक चर्चा होते आहे ते म्हणजे ‘जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (generative AI). या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून नवीन माहिती निर्माण करता येते. ही माहिती मजकूर, मजकूरातील संभाषण, संगीत किंवा प्रतिमा, फोटोंच्या स्वरुपात असते.

 

चॅटजीपीटी (ChatGPT), गुगलचं जेमिनी (Gemini) आणि मायक्रोसॉफ्टचं कोपायलट (Copilot) ही जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्सची काही लोकप्रिय उदाहरणं आहेत.

 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स वॉशिंगचे (AI washing) अनेक प्रकार आहेत. काही कंपन्या तुलनेनं कमी आधुनिक कॉम्प्युटर प्रणाली वापरत असतानासुद्धा दावा करतात की, त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत आहेत. तर काही कंपन्या आधीच अस्तित्वात असलेल्या पद्धतींपेक्षा त्यांच्याकडून वापरलं जाणारं आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती अधिक कार्यक्षम आहे हे दाखवतात. काही कंपन्या असं दाखवतात की त्यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेवा पूर्णपणे कार्यान्वित आहेत. प्रत्यक्षात त्या तशा नसतात.

 

काही कंपन्या तर त्यांच्या सध्याच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स विरहित ऑपरेटिंग सॉफ्टवेअरला एआय चॅटबोट जोडत आहेत.

 

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभाव किती वाढत चालला आहे किंवा ते चलनी नाणं कसं बनत चाललं आहे हे आणखी एका गोष्टीतून लक्षात येतं. ओपनओशन (OpenOcean) या यूके आणि फिनलंडस्थित नवीन तंत्रज्ञान कंपन्यांसाठीच्या गुंतवणूक फंडानुसार 2022 मध्ये तंत्रज्ञानाशी संबंधित (टेक स्टार्टअप) फक्त 10 टक्के स्टार्ट अप्सनी त्यांच्या मांडणीत किंवा गुंतवणुकदारांसमोर केलेल्या प्रेझेन्टेशन्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत असल्याचं सांगितलं होतं. तर 2023 हेच प्रमाण 25 टक्क्यांपेक्षाही अधिक झालं होतं. यावर्षी हे प्रमाण एकतृतियांशापेक्षा अधिक होण्याचं म्हणजे एक तृतियांश टेक स्टार्टअप याचा वापर करतील असा अंदाज आहे.

श्री अयंगार हे ओपनओशनच्या टीममधील सदस्य आहेत. स्टार्टअपना गुंतवणूक मिळवण्यासाठी आता अधिक स्पर्धेला तोंड द्यावं लागतं आहे. त्याचबरोबर आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचं दिसावं या इच्छेमुळं या कंपन्या किंवा स्टार्टअप त्यांची आर्टिफिशियल तंत्रज्ञानाचा वापर करण्याची क्षमता वाढवून दाखवत आहेत.

 

“स्टार्टअपच्या काही संस्थापकांना असं वाटतं की, जर त्यांनी त्यांच्या मांडणीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उल्लेख केला नाही किंवा गुंतवणूकदारांसमोर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत असल्याचं दाखवलं नाही तर यामुळे त्यांना तोटा किंवा नुकसान होईल. मग भलेही त्यांच्या कंपनीकडून पुरवल्या जात असलेल्या सेवेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करण्याची माफक आवश्यकता असो किंवा कोणतीही आवश्यकता नसो, कंपन्या किंवा स्टार्टअपना त्यांच्या सेवा किंवा उत्पादनाशी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा संबंध दाखवणं अतिशय महत्त्वाचं वाटतं आहे,” असं श्री अयंगार म्हणतात.

 

“आमच्या विश्लेषणानुसार कंपन्या त्यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी निगडित क्षमतांचा जो दावा करत आहेत, त्यामध्ये आणि प्रत्यक्षात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून केल्या जाणाऱ्या त्यांच्या कामाचे जे परिणाम दिसतात, यामध्ये मोठी दरी आहे.”

 

ही समस्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे असं एमएमसी वेंचर्स कंपनीच्या माहितीतून दिसतं. एमएमसी वेंचर्स ही तंत्रज्ञानाशी निगडीत स्टार्टअप किंवा कंपनीत गुंतवणूक करणारी आणखी एक कंपनी आहे.

 

2019 मध्ये असं आढळून आलं की, तंत्रज्ञानविषयक नवीन स्टार्टअपपैकी 40 टक्के स्टार्टअप स्वत:चा उल्लेख एआय स्टार्ट अप असा करतात. प्रत्यक्षात त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोणत्याही प्रकारे वापर करत नव्हत्या.

 

“आजही हीच समस्या आहे. शिवाय एक वेगळी समस्या आहे,” असं एमएमसी वेंचर्समधील सर्वसाधारण भागीदार सिमॉन मेनाशी सांगतात.

ते सांगतात की “आजच्या काळात स्टॅंडर्ड सॉफ्टवेअरच्या किंमतीत प्रत्येक कंपनीला अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेवा उपलब्ध आहेत. अशावेळी एक संपूर्ण आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित प्रणाली तयार करण्याऐवजी अनेक कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स नसलेल्या एखाद्या उत्पादनाला फक्त चॅटबोटची जोडणी करत आहेत.”

 

अकाउंटिंग क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या केपीएमजीमध्ये उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे धोके या विभागाचे (यूकेसाठी) डग्लस डिक म्हणतात, एआय वॉशिंगच्या समस्येवर कोणताही मार्ग निघत नाही किंवा मदत होत नाही. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सर्वांना मान्य असेल अशी एकही व्याख्या नाही.

 

डग्लस डिक पुढे म्हणतात, “जर मी एखाद्या खोलीतील लोकांना विचारलं की त्यांच्या मते आर्टिफिशियल इंटेलिजन्सची व्याख्या काय आहे, तर प्रत्येकजण यासाठी वेगवेगळं उत्तर देईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संकल्पना फारच व्यापक आणि ढोबळ स्वरुपात वापरली जाते. यासाठी कोणताही स्पष्ट संदर्भ नाही. या गोंधळामुळे किंवा अस्पष्टतेमुळेच एआय वॉशिंगच्या समस्येत वाढ होते आहे.”

 

“एआय वॉशिंगचे व्यवसायावर परिणाम होऊ शकतात. कंपन्यांकडून तंत्रज्ञानासाठी अधिक रक्कम मोजली जाण्यापासून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून त्यांच्या कामकाजात, सेवांसंदर्भात उद्दिष्टांची पूर्तता होण्यास अपयश येणं अशा व्यापक स्वरुपात हा परिणाम असू शकतो.”

 

अशा परिस्थितीत, एखादी कंपनी खरोखरच नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारी किंवा सेवा पुरवणारी कंपनी आहे की नाही हे ठरवणं गुंतवणूकदारांसाठी कठीण होऊ शकतं.

 

अयंगार म्हणतात, “जर एखादं उत्पादन अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असल्याचा दावा करत असेल मात्र त्यातून जर ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता झाली नाही तर त्याचा फटका इतर चांगल्या किंवा रास्त स्टार्टअपला बसू शकतो. यामुळे जे स्टार्टअप खरोखरंच आमुलाग्र बदल घडवणारं काम करत आहेत त्यांच्यावरील ग्राहकांचा विश्वास कमी होऊ शकतो किंवा संपू शकतो.”

 

किमान अमेरिकेतील नियामक संस्थांनी या गोष्टीची नोंद घेण्यास सुरूवात केली आहे. यावर्षीच्या सुरुवातीला अमेरिकन सेक्युरिटीज अॅंड एक्सचेंज कमिशननं (SEC) म्हटलं की, त्यांनी गुंतवणूक सल्ला देणाऱ्या दोन कंपन्यांवर त्यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरासंदर्भात खोटी आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

 

“त्या कंपनी संदर्भात एसईसीनं घेतलेल्या ठाम भूमिकेतून दिसून येतं की किमान अमेरिकेत तरी एआय वॉशिंगसंदर्भात कोणतीही सूट मिळणार नाही. ज्या कंपन्यांकडून यासंदर्भातील नियमांचं उल्लंघन करण्यात येईल त्यांच्यावर अधिक दंड आकारणी आणि कारवायांची आपण अपेक्षा बाळगू शकतो,” असं निक व्हाईट म्हणतात. ते चार्लस रसेल स्पीचलीज या कायदेविषयक सेवा पुरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीत भागीदार आहेत.

 

यूकेमध्ये एआय वॉशिंगशी निगडीत नियम आणि कायदे आधीच अस्तित्वात आहेत. यात अ‍ॅडव्हर्टाझिंग स्टॅंडर्ड्स ऑथोरिटीच्या (ASA’s)नियमाचाही समावेश आहे. यामध्ये म्हटलं आहे की मार्केटिंगसाठी करण्यात आलेलं संभाषण किंवा दिली जाणारी माहिती यातून दिशाभूल होता कामा नये किंवा तसं करण्याची शक्यता असता कामा नये.

 

मायकल कोर्डोक्स हे वॉकर मॉरिस या यूकेतील कॉर्पोरेट कायदेविषयक सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या रेग्युलेटरी टीममध्ये असोसिएट आहेत. ते म्हणतात, जाहिरातींमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सविषयी दाव्यांचा सर्रास वापर होण्याचं प्रमाण वाढलं असून त्यावर अॅडव्हर्टाझिंग स्टॅंडर्ड्स ऑथोरिटीकडून तपास झाला पाहिजे.

उदाहरणार्थ इंस्टाग्रामवरील एक पेड पोस्ट. ही पोस्ट एका अ‍ॅपसंदर्भातील असून त्यामध्ये “तुमच्या फोटोचा दर्जा आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे वाढवा” असं म्हटलं होतं. यातून अ‍ॅपच्या कार्यक्षमतेला वाढवून दाखवलं जातं आहे आणि त्यामुळेच त्याला अ‍ॅडव्हर्टाझिंग स्टॅंडर्ड्स ऑथोरिटीनं दिशाभूल करणारं ठरवलं.

 

“आर्टिफिशियल इंटेलिजन्ससंदर्भातील दावे अधिकाधिक प्रचलित होत आहेत आणि बहुधा ते ग्राहकहितासंदर्भात अधिक प्रभावी ठरत आहेत असं दिसतं,” असं कॉर्डेक्स म्हणाले.

 

“माझ्या मते, आपण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल अतिशयोक्तीनं सांगण्याच्या शिखरावर आहोत,” असं सॅंड्रा वॉचर म्हणतात. त्या ऑक्सफर्ड विद्यापीठात तंत्रज्ञान आणि नियमन विभागाच्या प्राध्यापक आहेत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील जगातील आघाडीच्या तज्ज्ञ आहेत.

 

मात्र मला असं वाटतं की आपण या गोष्टीचा विचार करण्यास विसरलो आहोत की सर्वच प्रकारच्या कामांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणं खरोखरंच योग्य ठरतं का. लंडनच्या ट्युबमध्ये (लंडनमधील मेट्रो) आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारा संचलित इलेक्ट्रिक टूथब्रशसाठीच्या जाहिराती पाहिल्याचं मला आठवतं. हे कोणासाठी आहे? याची गरज कोणाला आहे?

 

याशिवाय, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पर्यावरणावरील परिणाम नेहमीच लपवला जातो किंवा त्याबद्दल बोलणं टाळलं जातं, असं त्या म्हणतात.

 

“आर्टिफिशियल इंटेलिजन्स काही झाडावर उगवत नाही. विमानसेवा क्षेत्रापेक्षा या तंत्रज्ञानाचा आधीच हवामान बदलावर अधिक परिणाम होतो आहे. या एकतर्फी अती महत्त्व दिलेल्या चर्चेपासून आपण दूर गेलं पाहिजे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फायदा होईल अशा विशिष्ट कामांचा आणि क्षेत्रांचा आपण खरोखरंच विचार केला पाहिजे. निव्वळ आंधळेपणानं आपण या तंत्रज्ञानाला प्रत्येक गोष्टीत अंमलात आणता कामा नये.”

 

मात्र, दीर्घकाळात एआय वॉशिंगची समस्या आपोआपच कमी होऊ शकते, असं अद्विका जालन यांना वाटतं. त्या एमएमसी वेंचर्समध्ये संशोधन प्रमुख आहेत.

 

“आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे इतकं सर्वव्यापी बनत चाललं आहे – ते जरी फक्त चॅटजीपीटी रॅपर असले तरीही- की काही काळानंतर एखादी गोष्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारा संचलित असणं ही बाब ब्रॅंडिंगचं एक साधन म्हणून कंपन्या किंवा उत्पादनांचं वेगळेपण दाखवू शकणार नाही. काही काळानं या गोष्टीचा उल्लेख करणं हे आम्ही इंटरनेटवर आहोत, असं म्हणण्यासारखं असेल,” असं त्या म्हणाल्या.

 

Published By- Priya Dixit

 

 

 

 

 

 

Go to Source