हलगा-मच्छे बायपासचाही ठेका रद्द करा
झाडशहापूर-बेन्नाळी बायपासचा ठेका रद्द : शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत, बायपास रद्द होणार का? : रिंगरोडमध्ये समाविष्ट करण्याची मागणी
बेळगाव : झाडशहापूर-बेन्नाळी बायपासचा ठेका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रद्द केला आहे. त्याचप्रकारे हलगा-मच्छे बायपासचा ठेका रद्द करून हा रस्ताही रिंगरोडमध्येच समाविष्ट करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. झाडशहापूर-बेन्नाळी परिसरापेक्षाही हलगा-मच्छे बायपासची जमीन ही सुपीक आहे. तेंव्हा महामार्ग प्राधिकरणाने याचाही गांभीर्याने विचार करून संबंधित कंत्राटदाराच्या रस्त्याचा ठेका रद्द करावा, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी दोन विभागामध्ये बायपास करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला होता. या दोन्ही रस्त्याच्या कामांचा ठेका दिला होता. यामधील झाडशहापूर ते बेन्नाळी या रस्त्याचा ठेका जीआर कंपनीला दिला होता. तर हलगा-मच्छे बायपास रस्त्याचा ठेका अशोका बिल्टकॉनला दिला होता. मात्र कंपनीने माघार घेतली. सध्या पुण्याच्या एका कंपनीने ठेका घेतला आहे. त्यांचाही ठेका रद्द करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. गोव्यातून येणारी वाहने झाडशहापूरपासून बेन्नाळीपर्यंत राष्ट्रीय महामार्गाकडे जाण्यासाठी हा बायपास केला होता. तर राष्ट्रीय महामार्ग अलारवाड क्रॉस येथून खानापूर-बेळगाव रस्त्याला हलगा-मच्छे बायपास जोडला जाणार आहे. सदर रस्ता हा 10 कि.मी.चा असून या रस्त्यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण बऱ्याचअंशी कमी होणार होता. मात्र काही वर्षांतच रिंगरोडचा प्रस्ताव तयार झाला. त्यानंतर रिंगरोडला जमिनी घेण्यासाठी महामार्ग प्राधिकरण धडपडत आहे. त्यालाही शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. रिंगरोडचे काम युध्दपातळीवर सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. रिंगरोड झाला तर बायपासचा काहीच उपयोग नाही. आता त्या रस्त्याप्रमाणेच हलगा-मच्छे बायपासही रद्द करावा, अशी मागणी होत आहे.
ठेका रद्द करणे हितकारक
हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम बेकायदेशीररित्या सुरू करण्यात आले. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात शेतकऱ्यांच्यावतीने धाव घेतली. त्या ठिकाणी शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडली. न्यायालयाने कामाला स्थगिती दिली. आता तर दुसऱ्या टप्प्यातील बायपासच्या कामाचा ठेका रद्द केला आहे. त्यामुळे हलगा-मच्छे बायपासचा ठेकाही रद्द करणे हितकारक ठरणार आहे.
– अॅड. रविकुमार गोकाककर
कायद्याच्या चौकटीतच आमची लढाई
हलगा-मच्छे बायपास रस्त्यामध्ये तिबारपिकी जमीन जात आहे. याचबरोबर या रस्त्याचे नोटीफिकेशन काढताना चुकीच्या पद्धतीने काढण्यात आले आहे. झिरो पॉईंट देखील या रस्त्याच्या परिसरात नाही. त्यामुळे आम्ही कायद्याच्या चौकटीतच आतापर्यंत लढाई लढलो आहे. तेंव्हा याचा सारासार विचार करून या रस्त्याचा ठेकाही रद्द करावा.
– रमाकांत बाळेकुंद्री-शेतकरी
जमीन गेल्यास आम्ही भूमीहीन
हलगा-मच्छे बायपास रस्त्यामध्ये आमची तीन एकर जमीन जात आहे. त्यामुळे आम्ही भूमीहीन होणार आहे. या जमिनीमध्ये विहीर काढून पाईपलाईन घातली आहे. त्याला जवळपास पाच लाखांहून अधिक रुपये खर्च केला आहे. त्यानंतर हा रस्ता घालण्याचा घाट घालण्यात आला आहे. यामुळे आम्हाला धक्का बसला असून तातडीने हा रस्ताही रद्द करावा.
– हणमंत बाळेकुंद्री-शेतकरी
उसामध्येच जेसीबी फिरवला
मच्छे गावाजवळ आपली सुपीक जमीन आहे. त्या जमिनीमध्ये ऊसपीक घेतो. हा रस्ता करण्यासाठी आमच्या वडिलोपार्जित जमिनीतील उभ्या उसामध्येच जेसीबी फिरविला. यामध्ये आमचे मोठे नुकसान झाले आहे. रिंगरोड होणार असेल तर या रस्त्याची काहीच गरज नाही. तेंव्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आपला हट्ट सोडावा.
-अनिल अनगोळकर-शेतकरी
शेतकऱ्यांनी संघटितपणे लढा द्यावा
शेतकऱ्यांना आमिषे दाखविली जात आहेत. मात्र शेतकऱ्यांनी संघटितपणे राहून लढा लढणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी जर पैसे घेवून जमिनी दिल्या तर भविष्यात त्या जमिनीवर कोणताच अधिकार राहणार नाही. त्या जमिनीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नाव दाखल केले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. तेंव्हा कोणत्याही शेतकऱ्यांनी पैसे घेवू नयेत.
-राजू मरवे-शेतकरी
Home महत्वाची बातमी हलगा-मच्छे बायपासचाही ठेका रद्द करा
हलगा-मच्छे बायपासचाही ठेका रद्द करा
झाडशहापूर-बेन्नाळी बायपासचा ठेका रद्द : शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत, बायपास रद्द होणार का? : रिंगरोडमध्ये समाविष्ट करण्याची मागणी बेळगाव : झाडशहापूर-बेन्नाळी बायपासचा ठेका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रद्द केला आहे. त्याचप्रकारे हलगा-मच्छे बायपासचा ठेका रद्द करून हा रस्ताही रिंगरोडमध्येच समाविष्ट करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. झाडशहापूर-बेन्नाळी परिसरापेक्षाही हलगा-मच्छे बायपासची जमीन ही सुपीक आहे. तेंव्हा महामार्ग प्राधिकरणाने […]