निवडणुकीसमवेतच सट्टाबाजारही तेजीत!

? सट्टेबाजांसाठी सध्या महापर्वणीचा काळ आहे. क्रिकेटमध्ये आयपीएल आणि राजकारणात लोकसभा निवडणूक, अशा दोन मैदानांमध्ये त्यांना एकाच वेळी खेळण्याची संधी मिळत आहे. या दोन्ही घटनांमध्ये लोकांना कमालीचे स्वारस्य असतेच. तसेच ‘रिझल्ट काय लागणार’ हा सर्वाधिक उत्सुकतेचा विषय या दोन्हींध्ये असतो. आतापर्यंतच्या काळात कदाचित प्रथमच सट्टेबाजांना लोकसभा निवडणूक आणि आयपीएल अशी दुहेरी संधी साधणे एकाच वेळी […]

निवडणुकीसमवेतच सट्टाबाजारही तेजीत!

? सट्टेबाजांसाठी सध्या महापर्वणीचा काळ आहे. क्रिकेटमध्ये आयपीएल आणि राजकारणात लोकसभा निवडणूक, अशा दोन मैदानांमध्ये त्यांना एकाच वेळी खेळण्याची संधी मिळत आहे. या दोन्ही घटनांमध्ये लोकांना कमालीचे स्वारस्य असतेच. तसेच ‘रिझल्ट काय लागणार’ हा सर्वाधिक उत्सुकतेचा विषय या दोन्हींध्ये असतो. आतापर्यंतच्या काळात कदाचित प्रथमच सट्टेबाजांना लोकसभा निवडणूक आणि आयपीएल अशी दुहेरी संधी साधणे एकाच वेळी साध्य झाले आहे.
? यंदाच्या लोकसभेत सट्टेबाजांसाठी एकमेव प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान होणार का ? हाच असल्याचे सट्टाबाजारांचा कानोसा घेतल्यानंतर दिसून येते. यंदा लोकसभा निवडणुकीवर किमान 50 हजार कोटी ते जास्तीत जास्त 2 लाख कोटी रुपयांचा सट्टा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीचा एकंदर अधिकृत आणि अनधिकृत खर्च आणि सट्ट्याची रक्कम जवळपास समान असेल असे या क्षेत्रातील तज्ञ म्हणतात.
भाजपच्या बाजूने कल
? भारतात सहा सट्टाबाजार महत्वाचे मानले जातात. त्यात राजस्थानातील फलोदी सट्टाबाजाराचे स्थान वरचे मानले जाते. याशिवाय लखनौ, भोपाळ, दिल्ली मुंबई आणि चेन्नई येथील सट्टाबाजार अशा राष्ट्रीय घटना जेव्हा घडत असतात तेव्हा अक्षरश: फुललेले असतात. सध्या सट्टाबाजारात भारतीय जनता पक्ष पुन्हा बहुमत मिळविणार असा कल दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळलेच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा अर्थात सलग तिसऱ्या वेळेला बाजी मारणार हे ओघाने मानले जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या बहुमताच्या बाजूने पैका लावल्यास सर्वात कमी लाभ होणार आहे, अशी स्थिती आहे.
सट्टाबाजाराचे गणितच उलटे !
? सट्टाबाजारात ज्या पक्षाच्या किंवा संघाच्या बाजूने पैसे लावले जातात, त्या पक्षाचा किंवा संघाचा विजय झाल्यास पैसे लावणाऱ्यास कमी लाभ मिळतो. याउलट ज्या पक्षाचा, आघाडीचा किंवा खेळाच्या संदर्भात संघाचा विजय होण्याची शक्यता कमी असते, त्याच्या बाजूने पैसा लावल्यास आणि खरोखरच त्याचा विजय झाल्यास बख्खळ लाभ होतो. कारण सट्टाबाजारातील पैशाचा खेळ ‘जास्त धोका पत्करणाऱ्यास जास्त लाभ’ या तत्वावर चालतो. असे हे उलटे गणित आहे.
काय म्हणतो सट्टबाजार
? सध्या विविध सट्टाबाजारांमध्ये जे वातावरण आहे, त्यानुसार भारतीय जनता पक्ष किमान 330 ते 333 जागा मिळवेल, याकडे अधिक कल आहे. तर काँग्रेसला 41 ते 43 जागा मिळतील असे बहुसंख्य सट्टेबाजांना वाटते. भारतीय जनता फक्ष 330 ते 335 जागा मिळवेल या अनुमानावर जितके पैसे लावले असतील, तितकेच हे अनुमान खरे ठरल्यास परत मिळतील. याला ‘इव्हन कंडिशन’ म्हणतात. या पक्षाला 350 जागा मिळतील या अनुमानावर पैसा लावल्यास आणि हे अनुमान खरे ठरल्यास 1 रुपयामागे 3 रुपये असा परताव्याचा दर आहे. या पक्षाला 400 जागा मिळतील या अनुमानासाठी हा दर 1 रुपयाला 12 ते 15 रुपयांचा परतावा असा आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 400 जागा मिळतील या अनुमानावर पैसा लावल्यास 1 रुपयामागे 4 ते 5 रुपये परताव्याचा दर आहे. महत्वाची बाब अशी की हे दर परिस्थितीनुसार सातत्याने कमी-अधिक होत असतात.
सट्टेबाजांची भाकिते किती खरी किती खोटी…
शेवटी हा सट्टा आहे. याचाच अर्थ असा की अनुमाने दोन्ही बाजूंकडून चुकू शकतात. यामध्ये ‘फिक्सिंग’ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष मतगणनेचा परिणाम समोर आल्यानंतर खरी परिस्थिती समजणार, हे जसे कोणत्याही अनुमानांसंबंधी खरे आहे, तसेच ते सट्टबाजाराविषयीही खरे आहे.
स्पष्ट कायदेशीर इशारा
सट्टा खेळणे भारतात बेकायदेशीर आहे. त्यामुळे या सदरात दिलेली माहिती केवळ माहितीसाठी असून तो कोणालाही पैसा लावण्यासाठी दिलेला सल्ला किंवा आवाहन नाही, हे समजून घेणे आवश्यक आहे. सट्टा जरी बेकायदेशीर असला तरी तो खेळण्याकडे असंख्यांचा कल असतो. म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येत  नाही. या हेतूने या क्षेत्रात काय वातावरण आहे, हे स्पष्ट करण्यात आलेले आहे.