कोल्हापूरच्या औद्योगिक विकासासाठी तिनही खासदार एकत्रित काम करू- खासदार शाहू महाराज
पुलाची शिरोली / वार्ताहर
कोल्हापूर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी आम्ही तिघे खासदार एकत्रीत काम करू, कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे यासाठी सर्वांचे एकमत असले पाहिजे. असे परखड मत काँग्रेसचे नूतन खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केला. ते शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन स्मँकच्या वतीने आयोजित सत्कार प्रसंगी बोलत होते. खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले जिल्ह्याच्या विकासासाठी कोणाचेही दुमत असायचे कारण नाही. पण प्राधान्य कोणत्या कामाला द्यायला पाहिजे ते सर्वांना विश्वासात घेऊन ठरवले पाहिजे. तसेच विकास कामांचे वेळापत्रक असले पाहिजे.ठरलेल्या वेळेत आणि ठरलेल्या बजेटमध्ये कामे पूर्ण झाली पाहिजेत. अन्यथा कामे रेंगाळणे, बजेट वाढणे अशा कारणांमुळे विकासाला खीळ बसू शकते.
जिल्ह्याच्या विकास कामासाठी चलन पुरवठाही तितकाच आवश्यक आहे. याकरिता आम्ही तिघे खासदार केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करू. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांना जनतेने एक धडा शिकवला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षांनी एकतर्फी निर्णय न घेता सर्वांना विश्वासात घेऊनच काम करावे लागणार आहे. सध्या प्रदूषणाचा विषयी गंभीर बनत चालला आहे. त्याकरिता सर्वच घटकाने योग्य ते उपाय योजना व अंमलबजावणी केली पाहिजे. असे आवाहनही श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केले.
खासदार महाडिक म्हणाले, औद्योगिक वसाहतीचा विकास झाला तरच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो हे वास्तव नाकारता येणार नाही. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी , पर्यटन त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रात ही मोठी प्रगती होणे आवश्यक आहे. सध्या देशाच्या संरक्षण क्षेत्रात फार मोठी संधी उपलब्ध आहे .त्यासाठी कोल्हापुराच्या उद्योजकांनी योगदान दिले पाहिजे. जिल्ह्यातील प्रस्थापित एमआयडीसी पैकी एका एमआयडीसीमध्ये फक्त इलेक्ट्रॉनिक्स स्पेअर पार्ट ची निर्मिती व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील आहे. कोल्हापूरच्या उद्योजकांना व जनतेला प्रवास अधिक शुखकारक होण्यासाठी लवकरच वंदे भारत रेल्वे तसेच इंदोर, नागपूर, शिर्डी आणि गोवा या चार शहरांमध्ये कोल्हापुरातून विमानसेवा सुरू होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. कोल्हापूर वैभववाडी या रेल्वे कामासाठी पीएम गतिशक्ती या योजनेतून चार हजार दोनशे कोटी रुपये मंजूर झाल्याचे महाडिक यांनी सांगितले.
खासदार धैर्यशील माने यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात डोणोली, आवळी, आष्टा आणि जांभळी येथे नवीन चार औद्योगिक वसाहती मंजूर असल्याचे सांगितले. याव्यतिरिक्त एक ड्राय पोर्ट होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अॅन्सिलरी उद्योगाला एक पॅरेन्ट कंपनी मिळावी. यासाठी कुणाशी संवाद साधायला हवा याबाबत उद्योजकांनी मार्गदर्शन करावे असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशिल माने व भाजपचे खासदार धनंजय महाडिक हे तिन पक्षाचे तीन खासदार पहिल्यांदाच स्मँकच्या माध्यमातून एकाच व्यासपीठावर आल्याचे पहावयास मिळाले.
२) खासदार शाहू महाराज यांनी विकासकामात आम्ही तिघें खासदार तिन तिघाडी काम बिघाडी कधीही होवू देणार नाही.
अध्यक्ष सुरेन्द्र जैन यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना उद्योगाच्या समस्या मांडल्या.
यावेळी कोल्हापूर इंजिनियरिंग असोसिएशनचे दिनेश बुधले, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे स्वरुप कदम, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल हातकणंगलेचे हरीषचंद्र धोत्रे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे, आयआयएफचे राहुल पाटील, सीआयआयचे अजय सप्रे, कोल्हापूर फाऊंड्री अॅण्ड इंजिनीअरिंग क्लस्टरचे दीपक चोरगे, आयटी असोसिएशनचे प्रताप पाटील, स्मॅकचे उपाध्यक्ष जयदीप चौगले, सचिव भरत जाधव, खजानिस बदाम पाटील, संचालक अतुल पाटील, शेखर कुसाळे, रणजीत जाधव, संजय भगत, दादासाहेब दुधाळ, दीपक घोंगडी, अमित गांधी, विनय लाटकर, प्रकाश चरणे, किरण चव्हाण, उद्योजक एम. वाय. पाटील, चंद्रशेखर डोली, जयदत्त जोशीलकर, नेमचंद संघवी, सचिन मेनन, सचिन शिरगावकर, संजय पेंडसे, दीपक जाधव, तुकाराम पाटील, विश्वास काटकर, प्रदीपभाई कापडिया ,सौ.आशाताई जैन , सपोनि पकज गिरी आदी उपस्थित होते.