सर्व आमदारांची कामे होतील

कृषिमंत्री रवी नाईक यांचे आश्वासन : कृषी, नागरी पुरवठा व हस्तकला खात्याच्या मागण्यांवर दहा मिनिटांत उत्तर पणजी : अधिवेशनात दर दिवशी जेवणानंतर मागण्यांवर चर्चा होतात. चर्चेत विरोधी तसेच सत्ताधारी आमदार खात्यांविषयी समस्या तसेच मागण्या सादर करतात. विरोधी आमदार कपात सूचनांवर बोलतात. त्यानंतर खात्याचा मंत्री आमदारांच्या समस्या उत्तर देताना खात्याच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देतात. […]

सर्व आमदारांची कामे होतील

कृषिमंत्री रवी नाईक यांचे आश्वासन : कृषी, नागरी पुरवठा व हस्तकला खात्याच्या मागण्यांवर दहा मिनिटांत उत्तर
पणजी : अधिवेशनात दर दिवशी जेवणानंतर मागण्यांवर चर्चा होतात. चर्चेत विरोधी तसेच सत्ताधारी आमदार खात्यांविषयी समस्या तसेच मागण्या सादर करतात. विरोधी आमदार कपात सूचनांवर बोलतात. त्यानंतर खात्याचा मंत्री आमदारांच्या समस्या उत्तर देताना खात्याच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देतात. आमदार जितका वेळ बोलतात त्यापेक्षा अधिक वेळ खात्याच्या मंत्र्याला बोलावे लागते. परंतु आज विधानसभा सभागृहात कृषिमंत्री रवी नाईक यांनी सर्व आमदारांची सर्व कामे होतील, सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांना आमदारांच्या कामे व त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे सांगण्यात येईल, असे आश्वासन देऊन दहा मिनिटांच्या आत भाषण आटोपते घेतले.
कृषी खात्यासाठी भरीव आर्थिक तरतूद
कृषी, नागरी पुरवठा व हस्तकला खात्याच्या मागण्यांवर रवी नाईक यांनी उत्तर देताना सांगितले की, केंद्रात आणि राज्यातही डबल इंजिन असलेले भाजपचे सरकार आहे. त्यामुळे पैशांची कमी नाही. सर्व आमदारांनी शेती प्रश्नावर उपस्थित केलेले प्रश्न मार्गी लागतील, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी खात्यासाठी भरीव आर्थिक तरतूद केली असल्याचेही ते म्हणाले. कार्लुस फेरेरा यांनी खोर्जुवे येथील खाजन शेतीच्या बांधासाठी केलेली मागणी सध्या पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. याबाबतच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्याचे रवी नाईक यांनी सभागृहात सांगितले. आमदार नीलेश काब्राल यांनी गोदामाच्या दुऊस्तीविषयीची मागणी केली होती. त्यावर बोलताना रवी नाईक म्हणाले, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन धान्याच्या गोदामाची दुऊस्ती करण्यात येतील, असे ते म्हणाले. माती संवर्धनाची जागृती करण्यासाठी सद्गुरु जग्गी महाराज यांचा 23 ऑगस्ट 2022 रोजी माती वाचवण्यासाठी जागतिक चळवळ हा कार्यक्रम गोव्यात घेतला होता. यासाठी सरकारने तीन ते साडेतीन कोटी ऊपये मोडले होते. त्याची गरज होती का? असा सवाल युरी आलेमाव यांनी विचारला होता. त्यावर रवी नाईक यांनी सांगितले की, कृषी खात्याने हा खर्च केलेला नाही.
पीएम सफल योजना आणावी : सरदेसाई
राज्यातील सुपारी व काजू बागायतदार शेतकऱ्यांसाठी सरकारने पंतप्रधान सफल योजना आणावी, बागायतदारांची खूप दिवसांची ही मागणी आहे. आम्ही ज्यावेळी जनता दरबार भरविला होता, त्यावेळी बहुतांश बागायतदार शेतकऱ्यांनी सुपारी व काजूसाठी खास योजना आणण्याबाबत आम्हाला विनंती केली होती. म्हणून राज्य सरकारने केंद्रातही त्यांचेच सरकार असल्याने पीएम सफल योजना सुरू करण्यास काही अडचण येणार नसल्याने त्यांनी ही योजना सुरू करावी, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली. पीएम विश्वकर्मा योजना राज्य सरकारने राबवली. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्या कारागिरी नुसार साहित्य पुरविण्याचे वचन दिले होते. या अंतर्गत शिंपी (कपडे शिवणारा) लाभार्थ्यांना अजूनही शिलाई मशिन मिळालेले नाहीत. त्यामुळे हे शिलाई मशिन कधी मिळणार, अशी विचारणाही विजय सरदेसाई यांनी केली.
तालुकास्तरीय फार्मिंग मार्केट करा : युरी 
सामुदायिक शेतीसाठी सरकारने प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कारण त्यांना जी रक्कम ठरवलेली आहे, त्यामध्ये वाढ होण्याची गरज आहे. तसेच त्यांना मदत म्हणून शेतीसाठी लागणारे साहित्य व अवजारे पुरविण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत. शेतकऱ्यांचा माल सर्व ठिकाणी विनासायास पोहचण्यासाठी सरकारने तालुकास्तरीय फार्मिंग मार्केट करण्याची गरज आहे. असे झाले तर शेतीत पिकणारा सर्व प्रकारचा भाजीपाला,फळे, दूध आदी उत्पादनास  बाजारपेठ मिळण्यास चांगली संधी आहे. त्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.
कृषी खात्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करा : व्हेन्झी व्हिएगस
मुरगाव तालुक्यातील पाच गावांच्या क्षेत्रात समुद्रकिनारे येतात. या ठिकाणी हस्तकलेतून निर्माण केलेल्या वस्तू विक्रीस ठेवण्यास मदत होईल. याशिवाय कृषी क्षेत्रासाठी सुमारे भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी व्हेन्झी व्हिएगस यांनी सभागृहात केली.
एसटी बांधवांसाठी विशेष अनुदान योजना हवी : रेजिनाल्ड
एसटी बांधवांसाठी केवळ भाजीपाला करण्यासाठी अनुदान योजना राबवावी. त्यांना नोकऱ्या देण्यास सरकारला शक्य होत नसल्यास त्यांना किमान विशेष अनुदानाची सोय करावी, अशी मागणी आलेक्स रेजिनाल्ड यांनी केली.