लोकसभा निवडणुकीसाठी पूर्णत: सज्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, सलग तिसऱ्यांदा विजयी होण्याचा विश्वास केला व्यक्त वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीसह आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पूर्णत: सज्ज आहे. या निवडणुकीतही जनतेचा आशीर्वादाने आम्हीच यशस्वी होणार आहोत, असा विश्वासपूर्वक प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची शनिवारी घोषणा केल्यानंतर त्यांनी आपली […]

लोकसभा निवडणुकीसाठी पूर्णत: सज्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, सलग तिसऱ्यांदा विजयी होण्याचा विश्वास केला व्यक्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीसह आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पूर्णत: सज्ज आहे. या निवडणुकीतही जनतेचा आशीर्वादाने आम्हीच यशस्वी होणार आहोत, असा विश्वासपूर्वक प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची शनिवारी घोषणा केल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी विरोधी पक्षांवरही कडाडून टीका केली. विरोधकांपाशी कोणताही मुद्दा नाही. तसेच निवणुकीला तोंड देण्याचा आत्मविश्वासही नाही. आम्ही गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत. त्यांच्या बळावरच आम्ही मतदारांना सामोरे जात आहोत. गेल्या 10 वर्षांमध्ये भारताच्या स्थितीत मोठे सकारात्मक परिवर्तन झाले आहे. आम्ही देशाला उत्तम प्रशासन दिले आहे. या कामगिरीच्या आधारावरच आम्ही या निवडणुकीच्या संग्रामात भाग घेत आहोत, असे प्रतिपादन त्यांनी ‘एक्स’ वरुन केले आहे.
गरीबी, भ्रष्टाचाराला विरोध
गरीबी आणि भ्रष्टाचार यांच्या विरोधातील आमचा संघर्ष यापुढेही होत राहील. याच दोन बाबींचा देशाच्या प्रगतीत सर्वात मोठा अडथळा आहे. त्यामुळे तो दूर करणे हे आमचे ध्येय आहे. यासंदर्भात आम्ही केलेल्या कामगिरीची माहिती जनतेला आहे. त्यामुळे लोकशाहीच्या या महोत्सवात आम्ही आमची भूमिका ठामपणे आणि निर्धाराने साकारणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
तिसऱ्या कार्याकालातील आव्हाने
भारताचे मतदार आम्हाला सलग तिसरा कालावधीही देतील, असा आमचा विश्वास आहे. या तिसऱ्या काळात आमच्यासमोर मोठी आव्हाने असतील, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. गेल्या दोन कार्यकाळांमध्ये आम्ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया सुदृढ केला आहे. आता तिसऱ्या कालावधीत देशाला प्रगत बनविण्याचे आव्हान आम्ही स्वीकारणार आहोत, अशी मांडणी त्यांनी केली.
आत्मनिर्भरता महत्वाची
खऱ्या प्रगतीसाठी देश आत्मनिर्भर होणे महत्वाचे आहे. शक्य तितक्या क्षेत्रांमध्ये आम्ही स्वयंपूर्णता प्राप्त करणे आणि विदेशी साहाय्य किंवा विदेशी तंत्रज्ञान यांच्यावरील अवलंबित्व कमी करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. आर्थिक प्रगतीची फळे समाजाच्या निम्नस्तरीय वर्गाला मिळावीत यासाठी अनेक योजना आम्ही गेल्या 10 वर्षांमध्ये क्रियान्वित केल्या. अनेक प्रकल्प वेळेआधीच आणि कमी खर्चात पूर्ण केले. प्रशासकीय कार्यसंस्कृतीमध्ये आम्ही मोठे परिवर्तन केले. जनतेला या सर्व प्रयत्नांची माहिती असून मतदारांचा निर्णायक कौल आम्हालाच मिळेल. आमची कार्यतत्परता आम्हाला विजयी करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार
भारत ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आगामी काळात पुढे येणार आहे. या स्थितीची पायाभरणी आम्ही केलेली आहे. आज आपला देश जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. ती येत्या पाच वर्षांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचे कार्य आम्हाला करावयाचे आहे. 2047 पर्यंत, अर्थात भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात भारत एक पूर्ण विकसीत राष्ट्र म्हणून आकाराला येणार असून आम्ही त्यादृष्टीने मार्गक्रमणा करीत आहोत. राजकीयदृष्ट्या भक्कम असलेले सरकार किती झपाट्याने जनहिताची कामे करु शकते, हे जनतेने गेल्या 10 वर्षांमध्ये अनुभवले आहे. त्यामुळे हीच प्रक्रिया पुढे नेण्यासाठी लोक आम्हाला पुन्हा संधी देतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
प्रगतीची प्रक्रिया पुढे नेणार
ड तिसऱ्या कालावधीत देशाला विकसीत बनविण्याचे आव्हान स्वीकारणार
ड गरीबी आणि भ्रष्टाचार यांच्या विरोधातील संघर्ष अविरतपणे केला जाणार
ड विरोधी पक्षांकडे लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचे अवसान नाही
ड शक्य तितक्या क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भरता प्राप्त करण्याचे केंद्र सरकारचे ध्येय