मार्चमध्ये विमानप्रवासी संख्येचा उच्चांक

30 हजारांहून अधिक प्रवाशांचा प्रतिसाद : भविष्यात प्रवासीसंख्या वाढण्याची शक्यता बेळगाव : बेळगाव विमानतळावर प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मार्च महिन्यात प्रवासी संख्येने 30 हजाराचा टप्पा गाठला आहे. मागील तीन महिन्यांत तब्बल 90 हजार प्रवाशांनी विमानप्रवास केल्याचे डीजीसीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात ही प्रवासीसंख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. बेळगाव विमानतळावरून देशातील प्रमुख […]

मार्चमध्ये विमानप्रवासी संख्येचा उच्चांक

30 हजारांहून अधिक प्रवाशांचा प्रतिसाद : भविष्यात प्रवासीसंख्या वाढण्याची शक्यता
बेळगाव : बेळगाव विमानतळावर प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मार्च महिन्यात प्रवासी संख्येने 30 हजाराचा टप्पा गाठला आहे. मागील तीन महिन्यांत तब्बल 90 हजार प्रवाशांनी विमानप्रवास केल्याचे डीजीसीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात ही प्रवासीसंख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. बेळगाव विमानतळावरून देशातील प्रमुख दहा शहरांना विमानसेवा सुरू आहे. यामुळे प्रवासीसंख्या प्रत्येक महिन्याला वाढताना दिसत आहे. जानेवारीमध्ये 29,614 प्रवाशांनी विमानप्रवास केला होता. फेब्रुवारी महिन्यात 29,530 प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद आहे. तर मार्च महिन्यात 30,290 प्रवाशांनी प्रवास केला असून 30 हजारांचा टप्पा ओलांडण्यात विमानतळाला यश आले आहे. बेळगाव विमानतळाचा विस्तार केला जात असून यासाठी टेंडरही काढले आहे. विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगची क्षमता वाढविली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विमानतळाप्रमाणे बेळगाव विमानतळाला लूक दिला जाणार आहे. यामुळे प्रवाशांची संख्या वाढत असून कार्गो वाहतूकही वाढली आहे. जानेवारीत 4 मेट्रिक टन, फेब्रुवारीत 1 मेट्रिक टन तर मार्च महिन्यात 2 मेट्रिक टन कार्गो वाहतूक करण्यात आली.
एप्रिलमध्ये प्रवासी संख्येत वाढीची शक्यता
सध्या लोकसभा निवडणुकीचा कालावधी सुरू असताना राजकीय नेते, त्यांचे पदाधिकारी यांची ये-जा सुरू आहे. विशेषत: बेळगाव-बेंगळूर या विमानसेवेला मोठी गर्दी होत असून राजकीय व्यक्तींची ये-जा सुरू झाली आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीला प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रवासी अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात 32 ते 33 हजार प्रवासी विमानप्रवास करतील, अशी शक्यता आहे.