ईव्हीएमवर राहुल गांधींकडून पुन्हा संशय

भारतात ईव्हीएमच्या तपासणीची अनुमती नसल्याचा दावा : मस्क यांच्या ट्विटची पार्श्वभूमी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधी पक्षांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा (ईव्हीएम) मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला होता, परंतु निवडणूक निकाल जाहीर होताच हा मुद्दा गायब झाला होता. निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळविता आले नव्हते, तर काँग्रेसच्या मागील वेळच्या तुलनेत जागा वाढल्या होत्या. पण आता […]

ईव्हीएमवर राहुल गांधींकडून पुन्हा संशय

भारतात ईव्हीएमच्या तपासणीची अनुमती नसल्याचा दावा : मस्क यांच्या ट्विटची पार्श्वभूमी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधी पक्षांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा (ईव्हीएम) मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला होता, परंतु निवडणूक निकाल जाहीर होताच हा मुद्दा गायब झाला होता. निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळविता आले नव्हते, तर काँग्रेसच्या मागील वेळच्या तुलनेत जागा वाढल्या होत्या. पण आता हा मुद्दा पुन्हा चर्चेत येत असल्याचे चित्र आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ईव्हीएमवरून पुन्हा सवाल उपस्थित केले आहेत.
राहुल गांधी यांनी जगातील सर्वात धनाढ्या उद्योजक एलॉन मस्क यांच्या ट्विटला रिपोस्ट करत एका वृत्तपत्राचा दाखला देत ‘भारतात ईव्हीएम’ एक ‘ब्लॅक’ बॉक्स’ आहे आणि कुणालाच त्याची तपासणी करण्याची अनुमती नसल्याचा दावा केला आहे. भारताच्या निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेवरून गंभीर चिंता व्यक्त होत आहेत. संस्थांचे उत्तरदायित्व कमी होते, तेव्हा लोकशाही केवळ एक देखावा ठरते आणि फसवणुकीची शक्यता वाढते असे  राहुल गांधी यांनी स्वत:च्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
राहुल गांधी यांनी स्वत:च्या पोस्टमध्ये मुंबईतील कथित घटनेचा उल्लेख केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ईव्हीएमवरून शिवसेनेचे खासदार रविंद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पांडिलकर यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. मुंबईच्या गोरेगाव मतदान केंद्रात बंदी असूनही मोबाइलचा वापर केला होता असा आरोप मंगेश पांडिलकर यांच्यावर आहे. याप्रकरणी पोलिसांनी पांडिलकर सोबत आयोगाच्या एका कर्मचाऱ्यावरही गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी पोलिसांना मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातील अन्य उमेदवारांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याच्या आधारावरच गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या मतदारसंघात पुनर्मतमोजणी होत वायकर केवळ 48 मतांनी विजयी झाले होते. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.
मस्क यांची पोस्ट
मस्क यांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत ईव्हीएमचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स संपुष्टात आणल्या जाव्यात. ईव्हीएम माणूस किंवा एआयद्वारे हॅक केले जाण्याचा धोका आहे. हा धोका कमी असला तरीही तो विचारात घेतला जाणे आवश्यक असल्याचे मस्क यांनी नमूद केले होते. याकरता त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे दावेदार राहिलेले रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांची पोस्ट शेअर केली आहे. प्यूर्टो रिकोच्या प्राथमिक निवडणुकीत ईव्हीएमशी निगडित मतदानात अनेक त्रुटी दिसून आल्याचा दावा त्यांनी केला होता.
भाजप नेत्याकडून प्रत्युत्तर
मस्क यांच्या पोस्टवर भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मस्क यांच्यानुसार कुठलाही वयक्ती एक सुरक्षित डिजिटल हार्डवेअर तयार करू शकत नाही, परंतु त्यांचे हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे.  मस्क यांचा हा दावा अमेरिका आणि अन्य ठिकाणांसाठी योग्य असू शकतो, जेथे ते इंटरनेटशी निगडित मतदान यंत्र निर्माण करण्यासाठी नियमित कॉम्प्युटर प्लॅटफॉर्मचा वापर करतात. परंतु भारतात असे घडत नसल्याचे चंद्रशेखर यांनी स्पष्ट केले आहे.