अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियावर मिळवलेला विजय आश्चर्यकारक नाही, कारण…
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. सध्या सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकात, वेस्ट इंडिजच्या किंग्सटाउन मैदानावर अफगाणिस्तानने बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला हरवून पुन्हा एकदा हे सिद्ध केलं आहे.अफगाणिस्तानच्या या विजयाकडे अनपेक्षित विजय म्हणून बघणं, या विजयाला मोठा उलटफेर म्हणणं हे अफगाणिस्तानच्या संघावर अन्यायकारक ठरणार नाही का? मागच्या काही वर्षांमध्ये अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाने केलेली कामगिरी पाहता, त्यांनी ऑस्ट्रेलियाला हरवणं ही अगदीच अनपेक्षित घटना आहे असं म्हणता येणार नाही.
अफगाणिस्तानच्या पुरुष क्रिकेट संघाचा मागच्या काही वर्षांमधला प्रवास अविश्वसनीय राहिलाय. या संघाने ज्या परिस्थितीत सराव केला, ज्या वेगाने क्रिकेटविश्वात नाव कमावलं ते पाहता अनेकांना या संघाचं कौतुक वाटतं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध जो निकाल लागला, अशा निकालाचे संकेत मागच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकातच मिळाले होते.
राशिद खानच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अफगाणिस्तान संघाने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे.
या सामन्याच्या आधी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात एकूण पाच सामने झाले होते. त्यामध्ये चार एकदिवसीय आणि एका टी-20 सामन्याचा समावेश होता.
23 जून रोजी झालेल्या सहाव्या सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अफगाणिस्तानचा हा दुसराच टी-20 सामना होता.
टी-20 विश्वचषकातील साखळी सामन्यांच्या फेरीत अफगाणिस्तान न्यूझीलंडला हरवलं आहे.
मागच्या वर्षी म्हणजे 2023मध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या सामन्यात अफगाणिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता, पण ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने एकहाती झुंज देत अफगाणिस्तानला विजयापासून दूरच ठेवलं होतं.
त्याही सामन्यात अफगाणिस्तानने सहजासहजी पराभव स्वीकारला नव्हता हे ध्यानात ठेवायला हवं. अफगाणिस्तानचा पराभव करण्यासाठी ग्लेन मॅक्सवेलला ऐतिहासिक खेळी करावी लागली होती.
ऑस्ट्रेलियाच्या इतर फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करलेली असताना, मॅक्सवेलने जखमी अवस्थेत जबरदस्त फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता.
यावेळी मात्र अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी हातात आलेला सामना जाऊ दिला नाही. सुरुवातीपासूनच अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी या सामन्यावर वर्चस्व राखलं होतं.
फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात अफगाणिस्तानचे खेळाडू अव्वल ठरले आणि या सामन्यात अर्धशतक झळकावलेल्या ग्लेन मॅक्सवेलला एकदिवसीय विश्वचषकातील अविस्मरणीय खेळीची पुनरावृत्ती करता आली नाही.
गुरबाज- जादरानची तडाखेबंद फलंदाजी आणि गुलबदीनच्या स्विंगपुढे कांगारू हतबल
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
अफगाणिस्तानच्या डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आलेल्या रहमानुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम जादरान या सलामीवीरांच्या जोडीने आक्रमक फलंदाजी करत 118 धावांची भागीदारी केली.
मात्र, किंग्सटाउनच्या खेळपट्टीवर इब्राहिम आणि रहमानुल्लाहच्या जोडीने 15 ओव्हर आणि चार चेंडूंमध्ये 118 धावा केल्या. यात गुरबाजने 60, जादरानने 51 धावा केल्या. अफगाणिस्तानने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 148 धावा केल्या.
अफगाणिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 127 धावाच करू शकला.
गुलबदिन नायबने चार विकेट घेतल्या. एकवेळ तर अशी आली होती जेंव्हा ऑस्ट्रेलियाने 32 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या.
त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने मार्कस स्टॉइनिससोबत 39 धावांची भागीदारी केली. नायबने स्टॉइनिसला बाद करून ही भागीदारी तोडली आणि हाच या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला.
ऑस्ट्रेलियाचे 8 फलंदाज दुहेरी धावाही करू शकले नाहीत
सुरुवातीच्या पडझडीनंतर फलंदाजीला आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने ज्या पद्धतीने याही सामन्यात अर्धशतक झळकावलं ते पाहून तो पुन्हा एकदा अफगाणिस्ताला विजयापासून दूर घेऊन जाईल की काय असं वाटत होतं.
2023 च्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात मॅक्सवेलने असाच एकहाती किल्ला लढवून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता.
मॅक्सवेल पुन्हा तीच कामगिरी करू शकेल असे वाटत होते, पण गुलबदिनने मॅक्सवेलला बाद करून ऑस्ट्रेलियाच्या आशा धुळीस मिळवल्या.
अफगाणिस्तानच्या अचूक गोलंदाजीसमोर मॅक्सवेलशिवाय कोणत्याही खेळाडूला 15 चा आकडाही गाठता आला नाही.
ट्रॅव्हिस हेड (0), डेव्हिड वॉर्नर (3), कर्णधार मिचेल मार्श (12), मार्कस स्टॉइनिस (11), टीम डेव्हिड (2), मॅथ्यू वेड (5), पॅट कमिन्स (3), ॲश्टन अगर (2) आणि ॲडम झाम्पा (9) या सगळ्या फलंदाजांना अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी स्वस्तात तंबूत पाठवलं.
अफगाणिस्तानचा जर आज पराभव झाला असता तर सुपर-8 फेरीतील पहिल्या गटाचं उपांत्य फेरीचं समीकरण सुटसुटीत झालं असतं. पण अफगाणिस्तानच्या या विजयामुळे उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्याची स्पर्धा अत्यंत रोमांचक बनली आहे.
आता ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या दोघांचे प्रत्येकी दोन गुण झाले आहेत.
ऑस्ट्रेलियाला या फेरीतील शेवटचा सामना भारताविरुद्ध 24 तारखेला खेळायचं आहे तर त्याचदिवशी या गटातील शेवटच्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान अशी लढत होणार आहे.
ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान अशा दोन्ही संघांना उपांत्य फेरीत पोहोचायचं असेल तर उरलेल्या सामन्यांमध्ये विजय मिळवणं आवश्यक आहे.
2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तानने चांगली कामगिरी केली होती. मात्र, पहिल्या सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानचा 6 विकेट राखून पराभव केला होता तर दुसऱ्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला होता.
सलग दोन पराभवानंतरही अफगाणिस्तानचं मनोधैर्य खचलं नाही. अफगाणिस्तानने त्यानंतरच्या सामन्यात इंग्लंडला 69 धावांनी पराभूत करून खळबळ उडवून दिली आणि त्यानंतर पाकिस्तानवरील विजय ही अफगाणिस्तान संघासाठी मोठी उपलब्धी ठरली.
पाकिस्तानवर मोठा विजय
एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात अफगाणिस्तानने चेन्नईच्या चेपॉक मैदानावर हशमतुल्ला शाहिदीच्या नेतृत्वाखाली खेळत त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानचा पराभव केला होता.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने कर्णधार बाबर आझम आणि अब्दुल्ला शफीकच्या अर्धशतकांच्या जोरावर 7 विकेट गमावून 282 धावा केल्या होत्या.
अफगाणिस्तानसाठी विश्वचषकातील पहिला सामना खेळत 18 वर्षीय नूर अहमदने सर्वाधिक तीन बळी घेतले.
इब्राहिम जादरान आणि रहमानउल्लाह गुरबाज या सलामीच्या जोडीच्या भागीदारीमुळे अफगाणिस्तानने एक ओव्हर राखून 8 विकेट्सने दणदणीत विजय नोंदवून इतिहास रचला होता.
अफगाणिस्तान संघाने अल्पावधीतच वेगाने प्रगती केली आहे.
भारतात झालेल्या विश्वचषकात अफगाणिस्तानचे मेंटॉर म्हणून काम केलेल्या अजय जडेजा यांना वाटतं की अफगाणी खेळाडूंचा बेदरकारपणा ही त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे.
अफगाणिस्तानचे हे खेळाडू कोणत्याही संघाच्या डोळ्यात डोळे घालून आव्हान उभं करू शकतात.
तालिबानचा इशारा
अफगाणिस्तानचा हा विजय अनेक अर्थांनी खास आहे. अमेरिकेचे सैनिक तालिबानच्या हातात सत्ता देऊन अफगाणिस्तान सोडून जात असतानाचे फोटो अजूनही विस्मृतीत गेलेले नाहीत.
तालिबानच्या रोषापासून वाचण्यासाठी अफगाणिस्तानातील नागरिक देश सोडून पळून जात होते. अनेक नागरिकांनी विमानांच्या पंखांवर बसून अफगाणिस्तान सोडण्याचा प्रयत्न त्यावेळी केल्याचं दिसून आलं होतं.
सध्या अफगाणिस्तानात मानवी संकट आलेलं आहे, जगातील पातळीवर अफगाणिस्तान एकटा पडलेला आहे आणि असं असताना तालिबानच्या सर्वोच्च नेत्यांनी अफगाणिस्तानच्या लोकांच्या पैसे कमवण्यावर किंवा सांसारिक सन्मान मिळवण्यावर निर्बंध घातले आहेत.
अशी परिस्थिती असतानाही अफगाणिस्तानच्या संघाने क्रिकेटविश्वात मिळवलेलं यश वाखाणण्याजोगं आहे.
जगाच्या नकाशावर अफगाणिस्तानचे चित्र अतिशय भयावह आहे.
शीतयुद्धात अनेक दशके अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांमधील भांडणाचा बळी ठरलेला अफगाणिस्तान चार दशकांपासून उपासमार, गरिबी, असहाय्यता आणि दडपशाहीशी झुंजत आहे.
अफगाणिस्तानमध्ये नैसर्गिक आणि मानवी शोकांतिकेत क्रिकेट हा आशेचा किरण आहे.
क्रिकेटच्या यशामध्ये अफगाण लोक त्यांच्या वेदना विसरण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक विजय त्यांच्या जखमांवर एखाद्या मलमासारखं काम करतो.
पाकिस्तानात क्रिकेट खेळायला शिकलेले खेळाडू आता जगभर डंका वाजवतायत
रशियाने 1979 मध्ये अफगाणिस्तानवर हल्ला केला तेव्हा लाखो अफगाणी लोक पाकिस्तानात पळून गेले होते.
देश सोडून आलेल्या या निर्वासितांनी पाकिस्तानातील छावण्यांमध्ये क्रिकेट बघितलं, ते क्रिकेट शिकले आणि तिथेच खेळायला लागले. रशियाच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात आलेले हे लोक परत त्यांच्या देशात गेले तेंव्हा ते क्रिकेटही सोबत घेऊन गेले आणि अफगाणिस्तानात क्रिकेटची सुरुवात झाली.
1995मध्ये अनेक विरोध आणि अडचणी असताना अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (ACB) स्थापन करण्यात आलं.
सुरुवातीला तालिबानने क्रिकेटवर बंदी घातली होती. पण क्रिकेटच्या लोकप्रियतेकडे बघून 2000साली त्यांनाही या खेळाला मान्यता द्यावी लागली.
त्यानंतर मागच्या दोन दशकांमध्ये अगदी छोट्या लीगमध्ये सुरुवात करून अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी त्यांच्या संघाला कसोटी संघाचा दर्जा मिळवून दिला आहे. त्यांच्यासाठी हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता.
अफगाणिस्तान क्रिकेट संघाने झपाट्याने प्रगती केली आहे. 2010मध्ये पहिल्यांदा आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी हा संघ पात्र ठरला होता.
2012 मध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत पहिला एकदिवसीय सामना खेळला ज्यात त्यांचा 7 विकेट्सनी पराभव झाला. 2013 पर्यंत, अफगाण संघ आयसीसीचा सहयोगी सदस्य देखील बनला.
2017 मध्ये अफगाणिस्तान आणि आयर्लंडलाही कसोटी दर्जा मिळाला होता.
कसोटी दर्जा मिळवणारा अफगाणिस्तान हा 11वा संघ ठरला तर आयर्लंड हा 12वा संघ ठरला. अफगाणिस्तानने भारताविरुद्ध 2018 मध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता.
तालिबानची बंदी ते सर्वाधिक लोकप्रिय खेळ
अफगाणिस्तानमध्ये गेल्या दोन दशकांत क्रिकेटची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. आता क्रिकेट हा तिथे सर्वाधिक पाहिला जाणारा खेळ आहे. अफगाणिस्तान जिंकला की देशात उत्सवासारखे वातावरण असते.
क्रिकेट न समजणारे लोकही अफगाणिस्तानचा झेंडा फडकताना बघण्यासाठी क्रिकेटची मॅच बघत असतात.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानच्या प्रवासात भारत आणि बीसीसीआयने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अफगाणिस्तानला एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळवून देण्यात भारताचा पाठिंबा निर्णायक ठरला होता.
मात्र, अफगाणिस्तानच्या संघाला आयसीसी आणि इतर देशांच्या अधिक समर्थनाची गरज आहे.
त्यांच्याकडे क्रिकेटच्या पायाभूत सुविधा नाहीत. काबूलमध्ये एकच जागतिक दर्जाचे मैदान आहे. मात्र आतापर्यंत येथे एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला नाही. भारत हे अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे दुसरे घर आहे.
आपल्या देशात सुविधांचा अभाव असल्याने अफगाण संघाने लखनौ, ग्रेटर नोएडा आणि डेहराडूनला त्यांचे ‘होम ग्राउंड’ बनवले होते. सध्या अफगाणिस्तानचा संघ दुबईतील शारजात सराव करतो.
अत्यंत बिकट परिस्थितीतून जाणाऱ्या या देशासाठी क्रिकेट हा एक नवीन आशेचा किरण आहे असं आपण म्हणू शकतो. लाखो अफगाणी नागरिकांमध्ये क्रिकेटने देशाभिमान जागृत केला आहे. युद्धग्रस्त अफगाणिस्तानसाठी एका उज्ज्वल भविष्याचं प्रतीक म्हणून क्रिकेटकडे बघितलं जाऊ शकतं.
क्रिकेट हा खेळ अफगाण लोकांच्या समर्पणाचा आणि दृढनिश्चयाचा प्रतीक बनला आहे.
Published By- Priya Dixit