अफगाणिस्तानने उडवला युगांडाचा धुव्वा
अफगाण संघाचा 125 धावांनी विजय : सामनावीर फझलहक फारुखीचे 9 धावांत 5 बळी
वृत्तसंस्था/ गयाना, वेस्ट इंडिज
अफगाणिस्तानने टी 20 वर्ल्डकपमधील मोहिमेला धडाक्यात प्रारंभ करताना युगांडाचा 125 धावांनी धुव्वा उडवला. अफगाण संघाने प्रथम फलंदाजी करताना रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर 20 षटकांत 5 विकेट गमावून 183 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, युगांडाचा संघ केवळ 58 धावांवर ऑलआऊट झाला. या विजयासह अफगाण संघाला दोन गुण मिळाले आहेत. अवघ्या 9 धावांत 5 बळी घेणारा अफगाणिस्तानचा फझलहक फारुखी सामन्याचा शिल्पकार ठरला. विशेष म्हणजे, टी 20 वर्ल्डकपमधील धावांच्या तुलनेत हा चौथ्या क्रमांकाचा विजय ठरला आहे.
प्रारंभी, युगांडाच्या नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र अफगाणिस्तानच्या सलामी फलंदाजांनी त्यांचा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला. रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी शानदार फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी अवघ्या 14.3 षटकात 154 धावांची उत्कृष्ट भागीदारी केली. गुरबाज अतिशय स्फोटक अंदाजात दिसला. त्याने अवघ्या 45 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 76 धावांची खेळी केली. इब्राहिम झद्राननेही 46 चेंडूंत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 70 धावा केल्या. मात्र, हे दोघं बाद होताच अफगाणिस्तानचा डाव गडगडला. एकवेळ असं वाटत होतं की संघ 200 हून अधिक धावा करेल मात्र त्यांना शेवटच्या 5 षटकात केवळ 27 धावा करता आल्या.
184 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युगांडाची सुरुवात खूपच खराब झाली. त्यांचे फलंदाज अफगाणिस्तानच्या गोलंदाजांसमोर पूर्णपणे असहाय दिसले. फजलहक फारुकीने युगांडाला पहिल्याच षटकात दोन मोठे धक्के दिले. यानंतर युगांडानं 21 धावांत 5 विकेट गमावल्या आणि येथून त्यांचा पराभव निश्चित झाला. युगांडाचा डाव 16 षटकांत 58 धावांवर आटोपला. विशेष म्हणजे, अफगाणिस्तानच्या गोलंदाजांसमोर युगांडाचा एकही फलंदाज टिकू शकला नाही. त्यांचे एक एक करून सर्व फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले आणि अफगाणिस्तानने तब्बल 125 धावांनी सहज विजय मिळवला.
संक्षिप्त धावफलक : अफगाणिस्तान 20 षटकांत 5 बाद 183 (रहमानउल्ला गुरबाज 76, इब्राहिम झद्रान 46 चेंडूत 70, मोहम्मद नाबी 14, कायरेटा व मसाबा प्रत्येकी दोन बळी).
युगांडा 16 षटकांत सर्वबाद 58 (रियाजत अली शाह 11, रॉबिन्सन ओ बुया 14, फझलहक फारुखी 9 धावांत 5 बळी, नवीन उल हक व राशीद खान प्रत्येकी दोन बळी).
टी 20 वर्ल्डकपमधील सर्वात मोठे विजय (धावांच्या तुलनेत)
172 धावा : श्रीलंका वि केनिया, 2007
130 धावा : अफगाणिस्तान वि स्कॉटलंड, 2021
130 धावा : द.आफ्रिका वि स्कॉटलंड, 2009
125 धावा : अफगाणिस्तान वि युगांडा, 2024.