अॅड.किवडसण्णावर यांचा अध्यक्षपदाचा षटकार
बार असोसिएशन निवडणूक : समान मते पडल्याने उपाध्यक्षपदी तीन जण, जनरल सेक्रेटरीपदी अॅड. वाय. के. दिवटे
बेळगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून बार असोसिएशनच्या निवडणुकीची रणधुमाळी उडाली होती. या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. मोठ्या चुरशीने प्रचार सुरू होता. त्यामुळे कोण बाजी मारणार? याची जोरदार चर्चा होती. मात्र पुन्हा एकदा अध्यक्षपदासाठी अॅड. एस. एस. किवडसण्णावर विजयी झाले. त्यामुळे ते सहाव्यांदा बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष झाले आहेत. अध्यक्षपदाबरोबरच उपाध्यक्षपदाचीही निवडणूक मोठ्या चुरशीने पार पडली. या पदासाठी बसवराज मल्लाप्पा मुगळी यांची पहिल्यांदाच निवड झाली तर आणखी एका उपाध्यक्षपदासाठी काटे की टक्कर होऊन अॅड. विजय व्ही. पाटील आणि अॅड. शीतल रामशेट्टी या दोघांना समान मते पडली. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांसमोरही मोठा पेच पडला. मात्र दोघांना एक-एक वर्ष हे पद देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार या दोघांनीही त्याला मान्यता दिल्याने आता एकूण तीन उपाध्यक्ष झाले आहेत. बार असोसिएशनच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे.
जनरल सेक्रेटरीपदासाठीही मोठी चुरस निर्माण झाली होती. अॅड. वाय. के. दिवटे आणि अॅड. उमेशगौडा पाटील यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच शेवटपर्यंत पहायला मिळाली. मात्र शेवटी अॅड. वाय. के. दिवटे यांनी बाजी मारली. जॉईंट सेक्रेटरीपदासाठी अनेक जण रिंगणात होते. त्यामध्ये अॅड. विश्वनाथ बसवराज सुलतानपुरी यांनी विजय संपादन केला. सर्वात प्रथम जॉईंट सेक्रेटरीपदाचा निकाल बाहेर पडला. महिला प्रतिनिधीसाठीही यावेळी तब्बल पाच महिला रिंगणात होत्या. अॅड. अश्विनी विजय हवालदार आणि अॅड. चैत्रा संजयकुमार पाटील यांच्यामध्ये शेवटपर्यंत चढाओढ लागली होती. अॅड. अश्विनी हवालदार यांनी बाजी मारली आहे. यावेळी कमिटी सदस्यांसाठीही चुरस होती. एकूण 13 जण रिंगणात होते. त्यामध्ये अॅड. अनिल शंकरगौडा पाटील, अॅड. सुमितकुमार अगसगी, अॅड. ईराप्पा पुजेरी, अॅड. विनायक कल्लाप्पा निंगनुरे, अॅड. सुरेश के. नागनुरी हे पाच जण विजयी झाले आहेत.
विजयी होताच समर्थकांनी एकच जल्लोष केला. गुलालाच्या उधळणीबरोबरच फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. बेळगाव बार असोसिएशनच्या मतदानाला शुक्रवारी सकाळी 10 वाजता सुरुवात झाली. एक दिवसापूर्वीच निवडणूक अधिकारी अॅड. आर. बी. मिरजकर यांनी सर्व ती तयारी पूर्ण केली होती. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. सायंकाळी 6.30 वाजता मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ झाला. यावेळी पहिल्यांदाच नोटाचाही वापर करण्यात आला. त्यामुळे यावेळी काही मते बाद ठरली आहेत. परिणामी याचा फटका काही उमेदवारांनाही बसला आहे. सकाळपासूनच मतदान करण्यासाठी वकिलांनी गर्दी केली होती. अत्यंत शिस्तबद्धरित्या मतदान झाले. एकूण 2 हजार 116 मतदार होते. त्यामधील 1 हजार 632 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 77.12 टक्के मतदान झाले. बेळगाव बार असोसिएशनची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. 15 दिवसांपूर्वी ही निवडणूक जाहीर झाली होती. एकूण 11 जागांसाठी 37 जण निवडणूक रिंगणात होते. गेल्या आठ दिवसांपासून तर प्रचाराचा धुरळा उडाला होता. अखेर शुक्रवारी मध्यरात्री निकाल जाहीर झाला. त्यानंतर उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. यावेळी निवडणुकीसाठी पोलीसदेखील तैनात नव्हते. अत्यंत शांततेने मतदान व मतमोजणी पार पडली.
अंध मतदारांनीही बजावला हक्क
वृद्ध झालेल्या चार अंध मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पहिल्यांदाच आवाजाने त्यांचे मतदान या निवडणुकीत घेण्यात आले. या निवडणुकीसाठी गेल्या आठ दिवसांपासून अॅड. सुधीर सकरी, अॅड. अमृत कोल्हटकर, अॅड. प्रवीण रांगोळी, अॅड. बी. बी. तळवार, अॅड. विजयकुमार बेळगावी, अॅड. गजानन पाटील, अॅड. सुधीर गावडे यांच्यासह 15 जण कार्यरत होते. त्या सर्वांनी निवडणूक अधिकाऱ्यांना सहकार्य केले.
उमेदवारांनी घेतलेली मते-
अध्यक्ष अॅड. एस. एस. किवडसण्णावर यांनी 914
उपाध्यक्ष अॅड. बसवराज एम. मुगळी यांनी 899
उपाध्यक्ष अॅड. विजय पाटील 521
उपाध्यक्ष अॅड. शीतल रामशेट्टी 521
जनरल सेक्रेटरी अॅड. वाय. के. दिवटे 544