आप खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला झटका वृत्तसंस्था/ जालंधर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला आहे. जालंधरचे आप खासदार सुशील कुमार रिंकू यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत आप आमदार शीतल अंगरुल यांनीही भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. शीतल अंगरुल या जालंधर पश्चिम मतदारसंघाच्या आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिग्गज नेत्यांनी पक्षांतर केल्याने आम आदमी पक्षाला […]

आप खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला झटका
वृत्तसंस्था/ जालंधर
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला आहे. जालंधरचे आप खासदार सुशील कुमार रिंकू यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत आप आमदार शीतल अंगरुल यांनीही भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. शीतल अंगरुल या जालंधर पश्चिम मतदारसंघाच्या आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिग्गज नेत्यांनी पक्षांतर केल्याने आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे.
आप खासदार सुशील कुमार रिंकू हे जालंधरचे प्रतिनिधित्व करत आहेत. पंजाबमधील आपचे ते एकमेव लोकसभा खासदार आहेत. सुशील कुमार रिंकू यांनी मे 2023 मध्ये झालेल्या जालंधर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत विजय मिळविला होता. रिंकू हे यापूर्वी काँग्रेसचे माजी आमदार राहिले आहेत. त्यांनी काँग्रेस पक्षातूनच राजकीय कारकीर्द सुरू केली होती. परंतु लोकसभा पोटनिवडणुकीपूर्वी त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता.
शीतल अंगुरल यांनी 2022 च्या विधानसभा निवडणुकीत सुशील कुमार रिंकू यांना पराभूत केले होते. परंतु या पराभवानंतर रिंकू यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. शीतल सध्या जालंधर पश्चिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. यापूर्वी लुधियानाचे काँग्रेस खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अबकारी धोरण घोटाळ्याप्रकण्री अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर आता आम आदमी पक्षाचे अनेक नेते अन्य पक्षांच्या वाटेवर आहेत. खासकरून पंजाबमध्ये आम आदमी पक्षात गळती होताना दिसून येत आहे. आम आदमी पक्षाने पंजाबमधील 13 पैकी 8 जागांवरील उमेदवार आतापर्यंत घोषित केले असून यात रिंकू यांचे नावही सामील होते. तरीही त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.