हनुमाननगरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले

भरदुपारी घडलेल्या घटनेमुळे खळबळ : एपीएमसी पोलिसात घटनेची नोंद प्रतिनिधी/ बेळगाव सिव्हील हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे 3 लाख रु. किमतीचे 20 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून घेऊन पलायन केले आहे. शुक्रवार दि. 6 रोजी दुपारी 4.35 च्या सुमारास हनुमाननगर सर्कल येथील ट्रयो कॅफेनजीक ही घटना घडली आहे. या प्रकरणी जयश्री […]

हनुमाननगरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले

भरदुपारी घडलेल्या घटनेमुळे खळबळ : एपीएमसी पोलिसात घटनेची नोंद
प्रतिनिधी/ बेळगाव
सिव्हील हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे 3 लाख रु. किमतीचे 20 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून घेऊन पलायन केले आहे. शुक्रवार दि. 6 रोजी दुपारी 4.35 च्या सुमारास हनुमाननगर सर्कल येथील ट्रयो कॅफेनजीक ही घटना घडली आहे. या प्रकरणी जयश्री नंजुडय्या कोळुरमठ (वय 45) रा. घर नं. 484 तिसरा क्रॉस, कुमारस्वामी लेआऊट यांनी एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी जयश्री या सिव्हिल
हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम करतात. त्या शुक्रवारी आपले काम संपल्यानंतर घराकडे जाण्यासाठी स्कुटीवरून क्लबरोड मार्गे हनुमाननगर सर्कलकडे जात होत्या. त्यावेळी 4.35 च्या सुमारास ट्रयो कॅफेनजीक त्यांच्या समोरुन मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्याजवळ येऊन मोटारसायकलचा वेग कमी केला. त्यानंतर मागे बसलेल्या एका भामट्याने हिसडा मारून त्यांच्या गळ्यातील सुमारे 3 लाख किमतीचे 20 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून घेऊन पलायन केले.
घटना घडल्यानंतर जयश्री यांनी आरडाओरड केली. मात्र मोटारसायकलवरील भामट्यांनी हनुमाननगर सर्कलच्या दिशेने पलायन केले. भर दुपारी घडलेल्या या चेनस्नॅचिंगच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती समजताच एपीएमसीचे पोलीस निरीक्षक उस्मान आवटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेत चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग होऊ शकला नाही.