खडी घेऊन जाणारा ट्रक रस्त्याशेजारील ट्रान्स्फॉर्मरला धडकून उलटला

सुदैवाने जीवितहानी टळली : मुतगेनजीकची दुर्घटना वार्ताहर /सांबरा गोव्याहून यादवाडला सिमेंट फॅक्टरीला खडी घेऊन जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याशेजारील ट्रान्स्फॉर्मरला जाऊन धडकून पलटी झाला. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना रविवारी सकाळी आठच्या सुमारास मुतगे येथे घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गोव्याहून के ए 22 टी 9363 या […]

खडी घेऊन जाणारा ट्रक रस्त्याशेजारील ट्रान्स्फॉर्मरला धडकून उलटला

सुदैवाने जीवितहानी टळली : मुतगेनजीकची दुर्घटना
वार्ताहर /सांबरा
गोव्याहून यादवाडला सिमेंट फॅक्टरीला खडी घेऊन जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याशेजारील ट्रान्स्फॉर्मरला जाऊन धडकून पलटी झाला. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना रविवारी सकाळी आठच्या सुमारास मुतगे येथे घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गोव्याहून के ए 22 टी 9363 या क्रमांकाचा ट्रक खडी घेऊन यादवाड येथील सिमेंट फॅक्टरीकडे चालला होता. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुतगे येथे ट्रक आल्यानंतर ट्रकवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या ट्रान्स्फॉर्मरला धडकून त्यानंतर पलटी झाला. या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. मात्र रविवारी सकाळच्या वेळी तेवढी वर्दळ नव्हती. त्यामुळे अनर्थ टळला. सुदैवानेच या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. ट्रकच्या धडकेने ट्रान्स्फॉर्मरच्या खांबांचेही नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी ट्रकमधील सर्व खडी विखुरली होती. घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या अपघाताची नोंद मारिहाळ पोलीस स्थानकात झाली आहे.