राहुल गांधींच्या मतदारसंघात ‘इंडिया’ आघाडीत फाटाफूट

वायनाडमधून भाकपच्या अॅनी राजा रिंगणात : शशी थरूर यांच्याविरोधातही उतरवला उमेदवार वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम काँग्रेस नेते राहुल गांधी खासदार असलेल्या केरळमधील वायनाड मतदारसंघात  ‘इंडिया’ आघाडी टिकू शकली नाही. आघाडीचा घटकपक्ष असलेल्या सीपीआयने (भाकप) या जागेसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. अॅनी राजा यांना वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित केल्याची माहिती सीपीआयचे सरचिटणीस डी राजा यांनी दिली […]

राहुल गांधींच्या मतदारसंघात ‘इंडिया’ आघाडीत फाटाफूट

वायनाडमधून भाकपच्या अॅनी राजा रिंगणात : शशी थरूर यांच्याविरोधातही उतरवला उमेदवार
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
काँग्रेस नेते राहुल गांधी खासदार असलेल्या केरळमधील वायनाड मतदारसंघात  ‘इंडिया’ आघाडी टिकू शकली नाही. आघाडीचा घटकपक्ष असलेल्या सीपीआयने (भाकप) या जागेसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. अॅनी राजा यांना वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित केल्याची माहिती सीपीआयचे सरचिटणीस डी राजा यांनी दिली आहे. वायनाड प्रमाणेच शशी थरूर यांच्या तिऊवनंतपुरम मतदारसंघातही भाकपने उमेदवार जाहीर केल्याने ‘इंडिया’च्या वाटचालीबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीदरम्यान अनेक राज्यांमध्ये जागावाटपाबाबत विरोधी आघाडी ‘इंडिया’मधील पक्षांमध्ये एकमत झालेले नाही. याचदरम्यान, सोमवार, 26 फेब्रुवारीला केरळमधील सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटचा (एलडीएफ) भाग असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टीने (भाकप) सार्वत्रिक निवडणुकीसाठी चार उमेदवारांची नावे जाहीर केली. या चार मतदारसंघांमध्ये केरळमधील वायनाड मतदारसंघाचाही समावेश आहे. केरळमध्ये मुख्य लढत एलडीएफ आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोव्रॅटिक फ्रंट (युडीएफ) यांच्यात आहे.
वायनाड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी करत आहेत. हे दोन्ही पक्ष भाजपविरोधात ‘इंडिया’ या विरोधी आघाडीचा भाग आहेत. अशा स्थितीत केरळमध्ये डावे आणि काँग्रेसमध्ये जागावाटप होणार का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या सर्व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर अॅनी राजा यांना वायनाडमधून तिकीट देण्यात आले आहे. अॅनी राजा ह्या सीपीआय सरचिटणीस डी राजा यांच्या पत्नी असून सध्या भारतीय महिला महासंघाच्या सरचिटणीस आहेत. त्या कन्नूरमधील इरिट्टी येथील रहिवासी असून त्यांचा जन्म डाव्या विचारसरणीच्या ख्रिश्चन कुटुंबात झाला आहे. अॅनी राजा शालेय जीवनात सीपीआय ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनमध्ये सदस्य म्हणून सामील झाल्या होत्या. त्यानंतर वयाच्या 22 व्या वषी त्यांनी ऑल इंडिया युथ फेडरेशनमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक अमेठी आणि वायनाडमधून लढवली होती. ते अमेठीमधून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत झाले, परंतु वायनाडमधून 4 लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले होते.
भाकपचे चार उमेदवार जाहीर
अॅनी राजा यांच्याशिवाय सीपीआयने तिऊवनंतपुरममधून माजी खासदार पन्नियान रवींद्रन यांना लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट दिले आहे. या जागेचे प्रतिनिधित्व सध्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर करत आहेत. पक्षाने माजी कृषी मंत्री व्ही. एस. सुनील कुमार आणि पक्षाच्या युवा शाखेचे नेते सी. ए. अऊणकुमार यांना अनुक्रमे त्रिशूर आणि मावेलिक्कारा येथून तिकीट दिले आहे.