नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खुनाची नोंद
तानाजी गल्लीनजीक विहिरीत दिले फेकून, तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर वार
बेळगाव : खून, आत्महत्या, अपघातांच्या घटनांनी नववर्षाच्या प्रारंभालाच गालबोट लागले आहे. तानाजी गल्ली रेल्वेगेटजवळील एका विहिरीत करोशी, ता. चिकोडी येथील युवकाचा खून करून त्याचा मृतदेह टाकण्यात आला आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या अप्रिय घटनांच्या मालिकेने समाजमन अस्वस्थ बनले आहे. हणमंत शिवाप्पा माद्याळी (वय 37) रा. हनुमान मंदिराजवळ, करोशी असे त्याचे नाव आहे. तानाजी गल्ली रेल्वेगेटजवळील पडक्या विहिरीत सोमवारी सकाळी डोकावून पाहिलेल्या स्थानिक नागरिकांना सुरुवातीला पाय दिसले. विहिरीवर रक्ताचा सडाही दिसला. त्यामुळे मार्केट पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनाही पाचारण करण्यात आले. मृतदेह काढल्यानंतर हा खुनाचा प्रकार असल्याचे उघडकीस आले. तीक्ष्ण हत्याराने हणमंतच्या गळ्यावर वार करण्यात आले असून खून करून त्याचा मृतदेह विहिरीत टाकला आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली आहे. मृतदेहाच्या पँटच्या खिशात आढळलेल्या मोबाईल क्रमांकावरून करोशी येथील कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. त्याचे वडील शिवाप्पा माद्याळी बेळगावात दाखल झाल्यानंतर मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर रात्री भादंवि 302 कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती समजताच पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, पोलीस निरीक्षक महंतेश द्यामणावर, उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. विहिरीतून बाहेर काढल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात पाठविण्यात आला.
आठवडाभरात घरी परतण्याचा निरोप
हणमंत हा व्यवसायाने कारचालक होता. दिवाळीनंतर तो बेळगावला आला होता. रिकाम्या बाटल्या गोळा करून काही सहकाऱ्यांसह त्या बाटल्यांची तो विक्री करायचा. गेल्या आठवड्यात वडिलांशी संपर्क साधून आठवडाभरात घरी येणार असल्याचे त्याने सांगितले होते. मात्र, घरी जाण्याआधीच त्याचा खून झाला आहे. त्याचा खून कोणी व कशासाठी केला? याचा तपास करण्यात येत आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात येत असून फुटेजवरून हणमंतच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यात येणार आहे.
Home महत्वाची बातमी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खुनाची नोंद
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खुनाची नोंद
तानाजी गल्लीनजीक विहिरीत दिले फेकून, तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर वार बेळगाव : खून, आत्महत्या, अपघातांच्या घटनांनी नववर्षाच्या प्रारंभालाच गालबोट लागले आहे. तानाजी गल्ली रेल्वेगेटजवळील एका विहिरीत करोशी, ता. चिकोडी येथील युवकाचा खून करून त्याचा मृतदेह टाकण्यात आला आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या अप्रिय घटनांच्या मालिकेने समाजमन अस्वस्थ बनले आहे. हणमंत शिवाप्पा माद्याळी (वय 37) रा. हनुमान […]