लहान मुलीसोबत दुष्कर्म करून हत्या, संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशन पेटवले
पश्चिम बंगालच्या परगणा जिल्ह्यातील एका दलदलीच्या मैदानात एका 10 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला होता, त्यानंतर संतप्त स्थानिकांनी तेथील पोलिस चौकी पेटवली. शुक्रवारी संध्याकाळपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली असून पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवर तातडीने कारवाई केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच आज सकाळी जयनगर परिसरात या मुलीचा मृतदेह स्थानिकांनी मिळताच जमावाने पोलिस चौकी पेटवून दिली आणि पोलिसांवर दगडफेक केली.
मिळालेल्या माहितीनुसार संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर उभ्या असलेल्या अनेक वाहनांची तोडफोड केली आणि पोलिसांना परिसर सोडण्यास भाग पाडले, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकारींनी दिली आहे. परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. तसेच एका स्थानिक रहिवाशाने दावा केला की, “मुलीच्या कुटुंबीयांनी परिसरातील माहिसमारी चौकीत एफआयआर दाखल केली होती, परंतु पोलिसांनी तक्रारीवर त्वरित कारवाई केली नाही.”
तसेच तक्रार मिळाल्यानंतर तत्काळ कारवाई करण्यात आली असून एका आरोपीला मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्येप्रकरणी अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि प्राथमिक तपासानंतर आज सकाळी एका आरोपीला अटक केली आहे. तसेच पोलीस म्हणाले की, तपास सुरू असून आम्ही पीडितेच्या कुटुंबासोबत आहोत. पोलिस चौकीला जाळपोळ झाली आणि सर्व महत्त्वाची कागदपत्रे नष्ट करण्यात आली यामध्ये सहभागी असलेल्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
Edited By- Dhanashri Naik