‘गो-फर्स्ट’ अधिग्रहणासाठी संयुक्त प्रस्ताव

वृत्तसंस्था / नवी दिल्ली बुडीत खात्यात गेलेली ‘गो-फर्स्ट’ ही प्रवासी विमान कंपनी अधिग्रहित करण्यासाठी दोन प्रस्ताव देण्यात आल्याचे वृत्त आहे. एक प्रस्ताव स्पाईसजेट या कंपनीचे ज्येष्ठ अधिकारी अजय सिंग यांनी दिलेला आहे. तर दुसरा प्रस्ताव ‘बिझी बी एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे जयदीप मीरचंदानी यांनी दिला आहे. हे दोन्ही प्रस्ताव संयुक्तरित्या देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात […]

‘गो-फर्स्ट’ अधिग्रहणासाठी संयुक्त प्रस्ताव

वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बुडीत खात्यात गेलेली ‘गो-फर्स्ट’ ही प्रवासी विमान कंपनी अधिग्रहित करण्यासाठी दोन प्रस्ताव देण्यात आल्याचे वृत्त आहे. एक प्रस्ताव स्पाईसजेट या कंपनीचे ज्येष्ठ अधिकारी अजय सिंग यांनी दिलेला आहे. तर दुसरा प्रस्ताव ‘बिझी बी एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे जयदीप मीरचंदानी यांनी दिला आहे. हे दोन्ही प्रस्ताव संयुक्तरित्या देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
‘गो-फर्स्ट’ ही गेल्या दशकात प्रसिद्ध झालेली प्रवासी विमान कंपनी कालांतराने निष्क्रीय झाली होती. मोठा तोटा झाल्याने ती बुडीत खात्यात जमा झाल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, या कंपनीची क्षमता मोठी असून तिचे योग्य प्रकारे संवर्धन झाल्यास तिचे पुनरुज्जीवन करणे शक्य आहे, असे मत अजय सिंग यांनी व्यक्त केले आहे. स्पाईसजेट या कंपनीकडे या कंपनीचे पुनरुज्जीवन करण्यास सामर्थ्य आहे. त्यामुळे आम्ही प्रस्ताव दिला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
बिझी बीचीही स्पर्धा
स्काय वन आणि बिझी बी एअरवेजचे अध्यक्ष जयदीप मीरचंदानी यांनीही ‘गो-फर्स्ट’चे अधिग्रहण करण्यासाठी प्रस्ताव मांडला आहे. आपला प्रस्ताव दुसऱ्या टप्प्प्यात पोहचल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हा टप्पा ‘ड्यू डिलिजन्स’चा आहे. जागतिक विमान प्रवास क्षेत्रात आमच्या कंपनीला मोठा अनुभव असल्याने आम्ही ही कंपनी पुनरुज्जीवीत करण्यात यश मिळवू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्यावर्षी बुडीत खात्यात
‘गो-फर्स्ट’ ही एकेकाळची प्रसिद्ध कंपनी गेल्या उन्हाळ्यात बंद पडली होती. या कंपनीमध्ये सर्वाधिक भांडवल वाडिया समूहाचे होते. तथापि, वाडिया समूहाने हात वर केल्याने कंपनी बंद पडली. त्यानंतर दिवाळखोरी कायद्याच्या अंतर्गत या कंपनीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. मात्र, अद्याप या प्रयत्नाला यश आलेले नाही. मात्र आता दोन कंपन्यांकडून संयुक्त प्रस्ताव आल्याने या कंपनीच्या पुनरुज्जीवनाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
स्पाईसजेटकडे मुख्य उत्तरदायित्व शक्य
हा संयुक्त प्रस्ताव मान्य झाला तर स्पाईसजेटकडे या कंपनीच्या पुनरुज्जीवनाचे मुख्य उत्तरदायित्व जाण्याची शक्यता आहे. कर्मचारी वर्ग पुरविणे, भांडवलाची गुंतवणूक करणे, विविध सेवा आणि औद्योगिक कौशल्याचा पुरवठा करणे, व्यव्यवस्थापन आणि उत्पन्नवाढ यासाठी प्रयत्न करणे, तसेच या कंपनीची ब्रँड व्हॅल्यू पुन्हा निर्माण करणे, आदी कामे करावी लागणार आहेत.